गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन पूर्ण - ऊर्जामंत्री बावनकुळे




भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन पूर्ण

                                                                          - ऊर्जामंत्री बावनकुळे

Ø पथदिवे व नळ योजना सौरऊर्जेवर आणणार

अमरावती, दि. 27 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन दिले होते, ते आश्वासन आम्ही पाळले आहे. गावठाण फिडर वेगळे नसेल किंवा तांत्रिक बिघाड असेल तरच वीजपुरवठा खंडित असतो. ते भारनियमन नव्हे, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अंजनगाव सुर्जी येथे केले.
महापारेषणच्या अंजनगाव सुर्जी २२० केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण आणि धारणी येथील १३२ केव्ही उपकेंद्राचे  ई-लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार रमेश बुंदीले, नगराध्यक्ष कमलकांत लडोळे, विजय काळमेघ, प्रवीण तायडे, श्री. दळू, महापारेषणचे संचालक गणपत मुंडे, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, भाऊराव राऊत, सुहास मेत्रे, मनोहर माहूरे उपस्थित होते.
श्री. बावनकुळे म्हणाले, अंजनगाव सुर्जीचे उपकेंद्र 2008 मध्येच सुरू झाले होते, परंतू पूर्ण झाले नव्हते. राज्य सरकारने या केंद्राचे काम सुरू केले आणि आज पूर्णही केले आहे. यासाठी ११३ कोटी खर्च करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौभाग्य योजना राबवून 18 लाख नागरिकांच्या घरातील अंधार संपवला आहे. शासन आणि प्रशासन ही दोन चाके आहेत. आम्ही धोरण ठरवतो प्रशासनाने त्याची सकारात्मक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. या शासनाने सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना विजेची जोडणी दिली आहे आणि येत्या काळात अडीच लाख शेतकऱ्यांना नव्याने वीज जोडणी देण्यात येणार आहे.
त्‍याचबरोबर शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जोडणी दिली जाणार आहेत. त्यासाठी अमरावती जिल्ह्यात गव्हाणकुंड येथे 20 मेगावॅटचा सौर प्रकल्प सुरू आहे. अशाच प्रकारचे सौरप्रकल्प उभारण्यासाठी सरपंचांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ५ ते १० एकर जागा उपलब्ध करून दिल्यास याठिकाणीही सौर ऊर्जेचे प्रकल्प उभे करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात येईल. तसेच पाणीपुरवठा नळयोजना आणि पथदिवेही सौर ऊर्जेवर सुरू करण्यात येतील. वीज पोहचली नसेल अशा ठिकाणी शेतकऱ्यांना साडेतीन लाख रूपयांचा सौर कृषीपंप केवळ 20 हजार रूपयांत मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यात एक हजार सौरकृषीपंप देण्यात येणार आहे.
श्री. पोटे म्हणाले, परिसरातील 12 हजार शेतकऱ्यांचे वीज जोडणी बाकी होती. राज्य शासनाने चार वर्षांत 24 हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली आहे. तसेच उच्च दाब वीज जोडणी योजनेतून चार हजार शेतकऱ्यांना जोडणी दिली जाणार आहे. जिल्ह्यात सहा हजार 300 नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्याचे भरीव काम करण्यात आले आहे.
श्री. बुंदीले म्हणाले, या उपकेंद्रामुळे नागरिकांना योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळणार आहे. चार उपकेंद्रांची कामे पुर्ण झाली असून तीन उपकेंद्राचे काम सुरू आहे. परिसरात 165 नवे ट्रान्सफॉर्मर लावण्यात आले असून 95 ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविण्यात आली आहे.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा