जिल्ह्यातील दुष्काळी भागातील
9 हजार 302 विद्यार्थ्यांना
मोफत एस. टी. प्रवास
योजनेचा लाभ
अमरावती,
दि. 13 : राज्य शासनाने
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास सवलतीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार जिल्ह्यातील
एकूण 9 हजार 302 विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून पासचे वितरण करण्यात
आले आहे. या सवलतीमुळे टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला
आहे.
जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात 2 हजार 551,
अंजनगाव सुर्जी तालुक्यात 545, चिखलदरा तालुक्यातील 80, मोर्शीतील 2 हजार 267 आणि वरुडमधील 3 हजार 859 अशा एकूण 9
हजार 302 विद्यार्थ्यांना पास वितरीत
करण्यात आल्या आहेत.
शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण
घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीच्या मासिक पाससाठी 66.67 टक्के इतकी सवलत देण्यात
येते. मात्र दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरित
शैक्षणिक वर्षासाठी 100 टक्के प्रवास सवलत मिळणार आहे. या सवलतीसाठी एसटी महामंडळाच्या
अमरावती विभागावर सुमारे 39 लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असला तरीही अडचणीच्या
काळात शेतकरी बांधवांना मदत करणे हे एसटीचे कर्तव्य असल्याचे मानून ही सवलत देण्यात
येत आहे, अशी माहिती विभागीय नियंत्रक श्रीकांत गभने यांनी दिली आहे.
पावसाअभावी शेतकरी बांधव अडचणीत आहेत. ग्रामीण
भागातील शेतमजूर व छोटे व्यावसायिकही दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत आहेत. एस.
टी. हे शेतकरी आणि ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांच्या प्रवासाचे साधन आहे. एस.
टी. ला ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानले जाते. एस. टी. तून प्रवास
करणा-यांत शेतकरी बांधव व ग्रामीण नागरिकांची संख्या मोठी आहे. एक प्रकारे ते
एसटीचे अन्नदाते आहेत. त्यामुळे हा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. त्याचा लाभ
शिक्षणासाठी शहरे किंवा मोठ्या गावांत जाणा-या खेड्यापाड्यातील शेकडो
विद्यार्थ्यांना होत आहे, असेही श्री गभने यांनी सांगितले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा