शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

ध्वजदिन निधी संकलनाला आरंभ सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील


ध्वजदिन निधी संकलनाला आरंभ

सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी
-         पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील
अमरावती, दि. 15 : ध्वजदिन निधी संकलन ही सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असून, त्यानुसार सर्वांनी या निधी संकलनाला योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आज येथे केले.
जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. नियोजनभवनात आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस आयुक्त संजय बावीस्कर, जिल्हा पोलीस अधिक्षक(ग्रामीण) दिलीप झळके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे, कर्नल घाले व कॅप्टन चांडक आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, देशसीमेवर खडा पहारा देणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुरक्षित जीवन जगत असतो. लष्करातील जवान आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता देशाच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात असतात. या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी ध्वजनिधी संकलनातून मिळते.
                              ते पुढे म्हणाले की, सैन्यात भरती होऊन देशाचे रक्षण करणे ही केवळ नोकरी नसून देशसेवेचे व्रत होय. त्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यागी व समर्पित जीवन जगणाऱ्या लष्करातील सैनिक जवानांचे आपल्यावर ऋण आहे. त्या ऋणभावनेतून ध्वजनिधी संकलित करणे आपले कर्तव्य आहे.
                              श्री. देशमुख म्हणाले की, सीमेवर अतिशय प्रतिकुल परिस्थितीत वीर जवान आपल्या देशाचे रक्षण करतात. देशासाठी वीरमरण पत्करणाऱ्या जवानांच्या कुटूंबियांसाठी शासन विविध योजना राबवत असते. त्याच्या भरीव अंमलबजावणीसह सैनिक बांधवांचे इतरही प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध राहील.
                      यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. श्री. चरडे यांनी प्रास्ताविक केले. नूतन महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. कॅ. पाठारे यांनी सूत्रसंचालन केले.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा