गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

लेख- आरोग्य व स्वच्छतेची जनजागृती करणारी अस्मिता योजना

लेख

आरोग्य व स्वच्छतेची जनजागृती करणारी अस्मिता योजना
किशोरवयीन मूलींच्या, ग्रामीण महिलांच्या आरोग्य, स्वच्छतेच्या संवेदनशिनल विषयाबाबत प्रबोधन करण्यासाठी राज्यशासनाच्यावतीने अस्मिता योजना राबविण्यात येत आहे. महिला सक्षमीकरण, महिला आरोग्य, सर्वांगीण विकास या त्रिसूत्रीचा अवलंब करत अस्मिता योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या किशोरवयीन मुलींना फक्त पाच रुपये दरामध्ये 8 सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध होणार आहेत. या नॅपकिन्सचा पुरवठा करण्याची जबाबदारी बचतगटांना देण्यात आली आहे.
अमरावती जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील  14 हजार 127 मुलींची अस्मिता योजनेकरिता नोंदणी झाली आहे. जिल्हयातील 1 हजार 687 गावांतील मूली व महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. जिल्हयातील 6 हजार 633 मुलींना अस्मिता कार्ड वितरीत करण्यात आले  आहे. धारणी तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे 2 हजार 877 शाळकरी मुलींनी अस्मिता ॲप वर नोंदणी केली आहे. चिखलदरा तालुक्यातील 1 हजार 452, तर नांदगाव खंडेश्वारच्या 1 हजार 191 किशोरवयीन मुली स्वच्छतेच्याबाबतीत या योजनेतून जागरुक झाल्या आहेत.जिल्हा परिषद शाळेतील मुलींसाठी ही योजना प्राथमि‍क शिक्षण विभागाच्या मदतीने राबविण्यात येत आहे. तर ग्रामीण भागात ही योजना उमेद पुरस्कृत स्वयंसहायता समूहामार्फत राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांना 240 मीमी पॅडचे पॅकेट 24 रुपयाला व 280 मी मी पॅडचे पॅकेट 29 रुपयाला देण्यात येत आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीत बचत गटाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी सर्वप्रथम गटाला नोंदणीसाठी अस्मिता मोबाइल ॲप डाउनलोड करावे लागते. या ॲपद्वारे नॅपकिन्सची विक्री करणाऱ्या गटाची नोंद केली जाते. जि. प. च्या शाळेतील मुलींची नोंदणी प्रकियेसाठी प्रत्ये‍क मुलीची पाच रुपये नोंदणी फी आकारुन आपले सरकार सेवा केंद्राच्या मदतीने अस्मिता योजनेत नोंदणी केली जाते. महिला व अस्मिता कार्डधारक मुलींमार्फत ॲप वर मागणी नोंदविण्यात येते. 485 केंद्रावर 765 स्वयंसहायता गटांतील महिलांची नोंदणी झाली असून 211 महिलांनी  इ वॅलेट मध्ये रकम जमा केली आहे.
नुकतेच पॅडमॅन चित्रपटातून अभिनेता अक्षय कुमारने स्त्रियांची कोंडी करणार्या या विषयाला हात घातला. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली व ग्रामीण महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेविषयीच्या सवयी समज, गैरसमज याबाबीवर अधिक जनजागृती करण्याच्या उद्देशाने जि.प. च्या 12 हजार 517 मुलींना पॅडमॅन चित्रपट दाखविण्यात आला. त्यातही धारणी चिखलदरा तालुक्यातील सर्वाधिक 3 हजार 150विदयार्थीनींनी हा चित्रपट पाहीला आहे.
शाळेतील विदयार्थीनी म्हणतात, अस्मिता म्हणजे आम्हा मुलींना स्वाभिमान मिळवून देणारी योजना आहे. आत्मविश्वास वाढविण्यास व आरोग्य सुधरविण्यास या योजनेची मदत होत आहे.

                                                                                                                  पल्लवी अनिल धारव,
                                                                                                                   विभागीय माहिती कार्यालय,
                                                                                                                               अमरावती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा