डॉ. पंजाबराव
देशमुख ऑ़डिटोरियमचे भूमिपूजन
वंचितांना
आरोग्यसेवा पुरविण्यासाठी शासन कटिबध्द
- वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष
महाजन
Ø प्रसुतीशास्त्र अतिदक्षता
विभागाची सुरुवात
Ø सीटी स्कॅन विभागाचा शुभारंभ
अमरावती, दि. 15 : शिक्षणाची गंगा गोरगरीबांपर्यंत पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने डॉ.
पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली होती.
शिक्षणासोबतच आरोग्य सुविधा गरजूपर्यंत पोहोचण्यासाठी संस्थेतर्फे
रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. गरीब जनतेला अल्प दरात आरोग्य सुविधा
पुरविण्याचे भाऊसाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार
असल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिले.
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब
देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात डॉ. पंजाबराव देशमुख ऑडिटोरियमचे
भुमिपूजन आणि प्रसुतीशास्त्र अतिदक्षता विभाग, सोळा स्लाईस सी टी स्कॅन विभागाचा
शुभारंभ श्री. महाजन यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी
व्यासपीठावर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, श्री
शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे,
रामचंद्र शेळके, गजानन पुंडकर व कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्यासह संस्थेचे सर्व
पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते.
श्री. महाजन म्हणाले की, अमरावती
ही संत गाडगेमहाराज, संत गुलाबराव महाराज, संत तुकडोजी महाराज, संत अच्युत महाराज
या संताची भूमी आहे. डॉ. पंजाबराव देशमुखांसारखे प्रेरणादायी व्यक्तिमत्व या भूमीत
होऊन गेले. त्यांनी समाजातील गरीब मुलांना शिक्षण घेण्यासाठी शिक्षण संस्थेच्या
माध्यमातून प्रचंड काम उभे केले. त्यांनी लावलेल्या रोपाचे रुपांतर भल्यामोठ्या
वटवृक्षात झाले आहे. विदर्भात सुमारे 350 शाखा, 10 हजार शैक्षणिक कर्मचारी व दीड
लाखाच्यावर विद्यार्थी त्यांच्या या विविध अभ्यासक्रमांच्या शिक्षण संस्थेत शिक्षण
घेत आहेत. त्यांनी खऱ्या अर्थाने बहुजनांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविली आहे.
त्यांनी शिक्षणाचे व्यावसायिकीकरण केले नाही. संस्थेची कार्यकारिणी त्यांचा वसा
प्रामाणिकपणे पुढे नेत आहे.
मेडिकल कॉलेजच्या परिसरात
उभारण्यात येणाऱ्या वातानुकूलित ऑडीटोरियमच्या बांधकामासाठी 12 कोटी रुपये खर्च
अपेक्षित आहे. या कामासाठी संस्थेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुमारे सहा
कोटी रुपयाचा निधी उभारुन दिला. एखाद्या संस्थेच्या भरभराटीसाठी स्वयंस्फूर्तीने
लोक पुढे येतात, ही अत्यंत कौतुकाची बाब आहे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, पूर्वी
अभिमत विद्यापीठात फक्त श्रीमंत कुटुंबातील मुलांचेच प्रवेश होत होते. एखाद्या
गरीब विद्यार्थ्याला प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यासाठी डोनेशन द्यावे लागत होते.
सर्वच वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयात गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविता यावा,
यासाठी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून वैद्यकीय पूर्व प्रवेश परीक्षा
(नीट) बंधनकारक करण्यात आली. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना सुध्दा नामांकित
वैद्यकीय शिक्षण संस्थेत प्रवेश मिळविता आला.
यापुढेही राज्यातील गोरगरीब
जनतेला मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज
निर्माण करण्यात येत आहे. विदर्भात गोंदिया, चंद्रपुर यासह एकूण सात मेडिकल
कॉलेजची निर्मिती करण्यात येणार आहे. गोरगरीब रुग्णांवर उपचार, मोठ्या
शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्यात येते. महात्मा
फुले जनआरोग्य योजनेतून सुध्दा गरजू रुग्णांवर उपचार करण्यात येते. केंद्र
शासनाच्या सहकार्याने पाच लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय मदत मिळवून देण्याची
योजनाही राबवली जाते. अशा योजनांतून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण, संवर्धन
करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.
संस्थेच्या रुग्णालयात सुरु झालेल्या सी. टी. स्कॅनमुळे गरीब
रुग्णांची सोय झाली आहे. संस्थेचे विविध उपक्रम व जनहिताची भूमिका कौतुकास्पद
असल्याचे आमदार श्री. देशमुख म्हणाले.
येथील वैद्यकीय महाविद्यालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पाच
वर्षांची मान्यता लाभली आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमता 100 वरून 150 पर्यंत
वाढविण्याचा संस्थेचा प्रस्ताव आहे. तो मंजूर व्हावा, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष
श्री. देशमुख यांनी केली.
डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी
प्रास्ताविक केले. राजेश मिरगे यांनी सूत्रसंचालन केले. शेषराव खाडे यांनी आभार
मानले.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा