उन्नत शेती-समृध्द शेतकरी
मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण
संकेत स्थळावर
अर्जाचा नमुना उपलब्ध
अमरावती, दि. 26 : ‘उन्नत
शेती-समृध्द शेतकरी’ मोहीमअंतर्गत कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या
प्रमाणात चालना देण्याचे राज्य शासनाने ठरविले असुन त्याअंतर्गत पॉवर टिलर,
रोटाव्हेटर, मोगडा (कल्टीव्हेटर), सर्वप्रकारचे प्लांटर (खत बी टोकन यंत्र), भात
लावणी यंत्र (ट्रान्सप्लांटर), पॉवर विडर, रिपर कम बाईडर, भात मळणी यंत्र, मिनी
भात मिल, दाल मिल व पुरक यंत्र संच (डी-स्टोनर, पॉलीशिंग, गेडींग, पॅकींग इत्यादी),
कापूस पऱ्हाटी श्रेडर, ऊस पाचट कुट्टी, श्रेडर,मल्चर,ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्र
(बुम स्प्रेअर), मिस्ट ब्लोअर, सबसॉईलर, ब्रश कटर तसेच सोबत सहपत्रित केलेल्या
यादीतील औजारे घेण्याकरिता कृषि विभागामार्फत अनुदान दिले जाणार आहे. वर नमुद इतर
औजारांकरिता अ.जमाती, अ.जाती,अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी व महिला
लाभार्थ्यांसाठी उच्चतम अनुदान मर्यादेत किंमतीच्या 50 टक्के व इतर
लाभार्थ्यांसाठी किंमतीच्या 40 टक्के अनुदान देय राहील. ट्रॅक्टर चलीत यंत्र,
औजरांकरिता अर्ज करतांना अर्जासोबत ट्रॅक्टर असल्याबाबतचा पुरावा (आर.सी.बुक) सादर
करणे अनिवार्य राहील.
पुर्वसंमती मिळालेल्या लाभार्थ्यांनी बाजारातील अधिकृत
विक्रेत्याकडून यंत्र,औजारांची खरेदी करावी तसेच स्वत:च्या बँक खात्यातून
इलेक्ट्रॅनिक पध्दतीने, धनादेश विक्रेत्यास रक्कम अदा करणे बंधणकारक राहील. केंद्र
व राज्य शासनाच्या अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी ज्या यंत्र, अवजाराचे रीतसर
परीक्षण (Testing)
करुन ते BIS अथवा अन्य सक्षम संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार
(Standards) तांत्रीक निकषानुसार असल्याचे प्रमाणीत केले असेल त्याच यंत्र,
औजाराची पूर्वसंमती प्राप्त लाभार्थी शेतकऱ्यांनी खरेदी करावयाची आहे. अनुदानाची
रक्कम लाभार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाईल.
कृषि यांत्रिकीकरण करिता विविध योजनेअंतर्गत जिल्ह्यास
प्राप्त होणाऱ्या निधीच्या लक्षांकाच्या मर्यादेत लाभार्थ्यांची निवड करण्यात
येईल. प्रत्येक औजारासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक
असून, ज्या औजारास जास्तीत जास्त अनुदान देय आहे त्या एकाच यंत्र, औजारास अनुदान
दिले जाईल. शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज मार्च 2018 पर्यंत कृषि सहाय्यक,
कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे जमा करावेत.
अर्जाचा विहीत नमुना तालुका कृषि अधिकारी कार्यालय व कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. जिल्ह्यास प्राप्त आर्थिक
लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांची निवड तालुका हा घटक
मानुन सोडत पध्दतीने करण्यात येईल. इच्छूक शेतकऱ्यांनी अर्ज सादर करुन योजनेचा लाभ
घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अमरावती यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा