विशेष लेख
आचार्य
बाळशास्त्री जांभेकर : समाजप्रबोधनाचा ध्यास
एकोणिसाव्या शतकाच्या
सुरुवातीच्या काळात ‘दर्पण’ आणि ‘दिग्दर्शन’ या नियतकालिकांच्या माध्यमातून समाज
प्रबोधनासाठी लेखणीचा वापर प्रबोधनाचे आयुध म्हणून करणारे झंझावाती संपादक तसेच
अनेक भाषांची जाण व विविध विषयांमध्ये तज्ज्ञ असणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे
आचार्य बाळशास्त्री जांभेकर. अध्यापक, पत्रकार, संपादक, लेखक, संशोधक आणि कृतीशील
समाजसुधारक व समाज प्रबोधनकार अशा अनेक भूमिका त्यांनी समर्थपणे निभावल्या. आधुनिक
महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे असून त्यांच्या
जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला हा थोडक्यात मागोवा…
कौटुंबिक पार्श्वभूमी
२० फेब्रुवारी १८१२ रोजी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात पोंभूर्ले येथे बाळशास्त्री जांभेकर यांचा
जन्म झाला. त्यांचे वडील उत्तम संस्कृत पंडित व पुराणिक होते, तर आई सगुणाबाई
प्रेमळ, धर्मनिष्ठ आणि संस्कारक्षम होत्या. पतीसोबत काशी यात्रेला असताना १८३०
च्या सुमारास त्यांचे निधन झाले. बाळशास्त्रींना दोन बहिणी व एक भाऊ अशी तीन
भावंडे होती.
बालपण व प्राथमिक शिक्षण
त्या काळात पोंभूर्ले येथे
प्राथमिक शाळा नसल्याने बाळशास्त्रींचे शिक्षण वडिलांच्या मार्गदर्शनाखाली घरीच
झाले. जन्मजात बुद्धिमत्ता, अफाट स्मरणशक्ती आणि अभ्यासाची आवड हे त्यांचे विशेष
गुण होते. सकाळी लवकर उठून वाचन, त्यानंतर दैनंदिन आवराआवर अशी शिस्तबद्ध दिनचर्या
त्यांनी लहानपणापासून अंगीकारली होती. एकपाठी अभ्यासामुळे पंचक्रोशीत त्यांची
‘बालबृहस्पती’ म्हणून ओळख निर्माण झाली.
मराठी वाचन-लेखन,
व्यावहारिक गणित, तोंडी हिशेब, संत रामदास, तुकाराम, वामन, मोरोपंत यांच्या निवडक
कविता, रामायण, महाभारत, बखरी आणि चरित्रकथा यांमध्ये ते आठव्या वर्षीच पारंगत
झाले. पुढे वेदपठण, संस्कृत स्तोत्रे, भगवद्गीता, अमरकोश, लघुकौमुदी, पंचमहाकाव्ये
यांचे अध्ययन त्यांनी बाराव्या वर्षापर्यंत पूर्ण केले.
मुंबईतील शिक्षण व प्रारंभिक वाटचाल
वयाच्या तेराव्या वर्षी
पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. त्यांची बुद्धिमत्ता सदाशिव छत्रे यांच्या
लक्षात आल्यामुळे इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले. १८२५ मध्ये
ते सोसायटीच्या इंग्रजी शाळेत दाखल झाले. इंग्रजीचा अभ्यास करतानाच त्यांनी गणित व
अन्य विषयांत प्रयत्नाने प्रावीण्य मिळवले. त्यामुळे अवघ्या तीन वर्षांतच, १८२९
मध्ये त्याच शाळेत त्यांची गणित अध्यापक म्हणून दरमहा १५ रुपयांवर नियुक्ती झाली.
मुंबई नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत प्रमुख जबाबदारी
२० फेब्रुवारी १८३० रोजी
त्यांनी मुंबई नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी कॅप्टन जॉर्ज जर्व्हिस यांना
इंग्रजीत अर्ज सादर केला. या अर्जात मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषांवरील
प्रभुत्वासह गुजराती, बंगाली व फार्सीचे प्राथमिक ज्ञान असल्याचा त्यांनी उल्लेख
केला होता. आत्मविश्वासपूर्ण अर्ज आणि गुणवत्तेच्या जोरावर अवघ्या १८ व्या वर्षी
त्यांची ‘डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी’ म्हणून नियुक्ती झाली.
प्राध्यापक म्हणून ठसा
बाळशास्त्री यांची
बुद्धिमत्ता, निष्ठा व कर्तृत्व पाहून दोन वर्षांतच त्यांची नेटिव्ह सेक्रेटरीपदी
नेमणूक झाली. १८३५ मध्ये जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांच्या पुढाकाराने एल्फिन्स्टन
कॉलेज सुरू झाले. तेथे दरमहा १५० रुपयांवर पहिले सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक
होण्याचा मान त्यांना मिळाला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले मराठी भारतीय होते.
अध्यापनातील कौशल्यामुळे पुढे त्यांचा पगार इंग्रज प्राध्यापकांइतका करण्यात आला.
१८४२ ते १८४४ या काळात ‘ॲक्टिंग प्रोफेसर’ म्हणून त्यांनी जितके विद्यार्थी घडवले
तितके पूर्वी कधीही घडवले नव्हते, असा गौरव प्रोफेसर ऑर्लेबार यांनी केला होता. दादाभाई नौरोजी, शोराबजी शापूरजी यांच्यासारखे दिग्गज त्यांचे विद्यार्थी
होते.
शिक्षणप्रसारातील योगदान
एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये
कार्यरत असतानाच त्यांना दक्षिण कोकण व दक्षिण महाराष्ट्रातील सरकारी शाळांचे
अधीक्षकपद देण्यात आले. नवीन शाळा सुरू करण्याचे नियम त्यांनी तयार केले आणि अनेक
गावांत शाळांना मान्यता दिली. परदेशातील अध्यापक शिक्षण प्रणालीचा अभ्यास करून
त्यांनी १८४५ मध्ये पहिली अध्यापक शाळा सुरू केली. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व
सुसंस्कार रुजावेत यासाठी त्यांनी वसतिगृहही सुरू केले.
‘दर्पण’ व ‘दिग्दर्शन’ : समाजप्रबोधनाचे साधन
६ जानेवारी १८३२ रोजी सुरू
झालेले मुंबई दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र असल्याचे मराठी
वृत्तपत्रसृष्टीतील इतिहासात नमूद प्रचलित पुराव्यांवरून मानले जाते. ‘स्वदेशी
लोकांमध्ये परदेशातील विद्यांचा अभ्यास, देशाची समृद्धी व लोककल्याण’ हा त्यामागचा
उद्देश होता. सुरुवातीला पाक्षिक असलेले दर्पण नंतर साप्ताहिक झाले. दिग्दर्शन या
पहिल्या मराठी मासिकातून त्यांनी ज्ञान व माहितीप्रधान असे अभ्यासू लेखन केले.
विज्ञान व सामाजिक सुधारणा:
दर्पणमधून त्यांनी
विज्ञान, तंत्रज्ञान, छापखाना, वाफेचे इंजिन, वैज्ञानिक शोधांची माहिती दिली.
अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरांवर परखड टीका केली. सरकारच्या धोरणांतील त्रुटी
दाखवून सुधारणा सुचवल्या. शेती, उद्योग, व्यापार, बँकिंग, स्त्री-पुरुष समानता,
विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण अशा विषयांवर त्यांनी निर्भीडपणे लेखन केले.
मानसन्मान व संशोधन:
रॉयल जिऑग्राफिकल व रॉयल
एशियाटिक सोसायटीशी संबंधित असलेले ते एकमेव भारतीय विद्वान होते. भारतीय शिलालेख
व ताम्रपटांवरील त्यांचे अकरा शोध निबंध रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेच्या
पत्रिकेत प्रसिद्ध झाले. 1845 मध्ये त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह लायब्ररी’ सुरू केली.
तसेच त्यांनी ‘नेटिव्ह इम्प्रूमेंट सोसायटी’ या संस्थेचीही स्थापना केली.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन १८४० मध्ये ‘जस्टिस ऑफ दि पीस’ या सन्माननीय पदावर
त्यांची नियुक्ती झाली.
आचार्य बाळशास्त्री
जांभेकर यांनी अल्पायुष्यातही शिक्षण, पत्रकारिता व समाज प्रबोधन या माध्यमातून आधुनिक
महाराष्ट्राच्या वैचारिक पायाभरणीचे मोलाचे कार्य केले. त्यांच्या विचारांची धार
आजही तितकीच तेजस्वी आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण करणे हीच त्यांच्या विचारांना
खरी आदरांजली ठरेल..
संदर्भ :
1) महाराष्ट्राचे शिल्पकार बाळशास्त्री
जांभेकर – प्रा. डॉ शिवकुमार सोनाळकर
2) दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर
कर्तृत्वाचा एक शोध – खंड 1
लेखन व संपादन – रविंद्र बेडकिहाळ
3) आचार्य बाळशास्त्री जांभेकर- व्ही. ए.
पाटील
०००
·
वृषाली मिलिंद पाटील, सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा