“हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमात आत्मसमाधानासाठी योगदान द्यावे
-विभागीय आयुक्त
डॉ.विजय सूर्यवंशी
नवी मुंबई,दि.13(विमाका): श्री
गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम
शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद दी चादर’ या ऐतिहासिक व प्रेरणादायी
कार्यक्रमाच्या आयोजनात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी
प्रशासनाने दक्षतेने व समन्वयाने काम करावे, आपण केवळ काम
म्हणून नव्हे तर आत्मसमाधानासाठी भरीव योगदान
द्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
नवी मुंबई, सेक्टर 29
खारघर येथील ओवे मैदान येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी
समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद दी चादर’ या
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा विभागीय आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी घेतला.
राज्य शासनाच्या
अल्पसंख्याक विभागाच्या मार्गदर्शनाखाली “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 वा शहिदी समागम
कार्यक्रम समितीच्या तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन
संप्रदाय आणि भगत नामदेव, वारकरी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील
खारघर येथील ओवे मैदानावर 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी
हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक
सोहळ्याच्या यशस्वीततेसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. कार्यक्रमाच्या
सुयोग्य नियोजनासाठी अधिकारी, गुरुद्वारा प्रशासन तसेच विविध समाजघटकांच्या सहभागातून 26 समित्यांची
स्थापना करण्यात आली आहे.
आढावा बैठकीस रायगडचे
जिल्हाधिकारी किशन जावळे, अपर आयुक्त फरोग मुकादम, रविंद्र पवार,पनवेल
महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, पनवेल
प्रांताधिकारी पवन चांडक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प संचालक तेजस्विनी गलांडे, उपजिल्हाधिकारी
(रोहयो) तथा नवी मुंबई समागम कार्यक्रम समन्वयक रविंद्र राठोड यांच्यासह महसूल, शिक्षण, आरोग्य, महानगरपालिका, पोलीस विभागाचे
अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या
माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा त्याग, शौर्याचा
संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन
आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांनी यावेळी केले. नागपूर व नांदेड येथे हा शहीदी समागम
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला असून, खारघर येथे होणाऱ्या या ऐतिहासिक
कार्यक्रमासाठीही अत्यंत शिस्तबद्ध आणि सूक्ष्म नियोजन करण्यात येत असल्याचे
त्यांनी सांगितले.
नागरिकांना कोणतीही
गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घेऊन कार्यक्रम शिस्तबद्ध, शांततापूर्ण व
उत्साहात पार पाडावा, यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. तसेच सर्व संबंधित
विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, प्रत्येक
विभागाने प्रचार व प्रसाराचे नियोजन करावे, असे निर्देशही
त्यांनी सर्व यंत्रणांना दिले. ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या
माध्यमातून सामाजिक ऐक्य, सद्भावना व ऐतिहासिक मूल्यांची जाणीव निर्माण होईल, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला.
रायगडचे जिल्हाधिकारी
किशन जावळे यांनी "हिंद दी चादर" कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या
तयारीबाबत सविस्तर माहिती दिली, तसेच त्यांनीही समिती
प्रमुखांशी कार्यक्रमाच्या
नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली.
या कार्यक्रमासाठी नवी
मुंबईसह मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून तसेच परदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक
उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा, स्वच्छता, भोजन, निवास, प्रसिद्धी, जलपुरवठा, विद्युत
व्यवस्था आदी सर्व बाबींसाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या असून
त्यानुषंगाने प्रशासनाद्वारे सर्वंकष तयारी करण्यात येत आहे. बैठकीचे सूत्रसंचालन
उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा नवी मुंबई समागम कार्यक्रम समन्वयक रविंद्र राठोड
यांनी केले.
0000000

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा