बुधवार, ११ फेब्रुवारी, २०२६

 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Ø  50 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य ; 40 विद्यार्थ्यांची निवड

Ø शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन

 

अमरावती, दि. 11 : राज्यातील अनुसूचित जमातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध असून आदिवासी विकास विभागामार्फत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत 40 पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी तत्काळ ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन आदिवासी विकास अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी केले आहे. 

            शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे : उमेदवार व उमेदवाराचे आई, वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावे. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अद्यायावत (2026 मधील) क्यूएस वर्ल्ड रँकिंग 200 च्या आत असणे बंधनकारक आहे. विहीत निकषानुसार पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास क्यूएस वर्ल्ड रँकिंग 200 पासून पुढे चढत्या क्रमाने 300 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.

या शिष्यवृत्तीमध्ये शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निवास व भोजन खर्च, शैक्षणिक साहित्य व अनुषंगिक खर्च, विमान प्रवास खर्च, व्हीसा शुल्क, आरोग्य विमा तसेच इतर आवश्यक खर्चाचा समावेश करण्यात आला आहे. एका विद्यार्थ्यासाठी कमाल 50 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार असून, दरवर्षी एकूण 40 अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

उमेदवाराच्या पालकांचे, कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरुन सर्व मार्गानी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील (2025-26 मधील) एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावे. विहीत निकषानुसार पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास कुटुंबाची उत्पन्न मर्यादा 10 लाखापर्यंत शिथील केली जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षण संस्थेत पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवलेला असणे आवश्यक आहे. तसेच परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या TOEFL, IELTS किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

या योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुज्ञेय लाभ, निवड कार्यपद्धती, इत्यादी माहितीसाठी आदिवासी विभागाच्या https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा व मुळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करावीत. ऑनलाइन अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. शिष्यवृत्ती अर्जाबाबत अर्जदारांना सर्व माहिती, सूचना ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या ईमेलद्वारे देण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

कोट :

राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पीएचडी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या परदेशातील उच्च शिक्षण घेण्याच्या स्वप्नांना बळ मिळते. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात 40 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करावेत.

- आयुषी सिंह (भा.प्र.से.)अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती

-----------------------------------------------------------------------------------------------------


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा