आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या जनजागृती अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
२१ ऑगस्ट रोजी सकाळी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन- वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले आहे. या वॉकेथॉनमध्ये तरुणांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलसंधारणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा. जलसंधारणाचा संदेश प्रभावीपणे युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी रील्स स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत युवा पिढीने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक जलसंधारण मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या जाहिराती तसेच समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेला अधिकृत क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा. “चला, एकत्र येऊया, जलदूत बनून पाण्यासाठी चालूया. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मूलमंत्राला जगवूया,” असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा