गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारत आणि जगाची जोडणी करण्यासाठी महाराष्ट्र हे प्रवेशद्वार आहे. भविष्यातील विविध क्षेत्रातील गरजा लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन आणि विकास, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर यासोबत पायाभूत सुविधांची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र हे आवडते डेस्टिनेशन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील विविध क्षेत्रातील संधीचा लाभ घेत अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना, संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावे. महाराष्ट्र शासन त्यांना येथील बाजारपेठ, पायाभूत सुविधा, कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देईल. त्यामुळे त्यांनी राज्यात गुंतवणूक करावी असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने मुंबईत हॉटेल ललित येथे राष्ट्रीय परिषद २०२६ चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर भारतातील अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर, उत्तर प्रदेशाचे राज्यमंत्री दिनेश प्रताप सिंह, इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय अध्यक्ष अनुप आचार्य, कार्यकारी उपाध्यक्ष प्रशांत कृष्णन, उपासना अरोरा, अवनीश अवस्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सध्या अमेरिका आणि भारतातील भागीदारी ही २१ व्या शतकातील अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदारीपैकी एक आहे. या भागीदारीचा पुढील टप्पा हा धोरणात्मक आणि अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग वाढविण्याचा आहे. या टप्प्यामध्ये महाराष्ट्र हा केंद्रस्थानी असणार आहे. हे दशक भारत आणि अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारीचे आहे.
इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सने या परिषदेसाठी 'भारत-अमेरिका सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीची पुनर्रचना' हा अत्यंत महत्वाचा विषय घेतला आहे. ही परिषद भारत आणि अमेरिकेतील गुंतवणूक, संशोधन, निर्माण आणि विकास यामध्ये सहकार्य वाढविण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
महाराष्ट्र ही ६६० बिलियन डॉलर अर्थव्यवस्था असून मागील सात वर्षांपासून १०.२ टक्के दराने विकास करीत आहे. राज्यात एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के लोकसंख्या ही २७ वर्ष वयापर्यंत आहे. जगाच्या दृष्टीने विचार केला, तर महाराष्ट्र ही जगातील पहिल्या २० देशांमधील अर्थव्यवस्था आहे. भारत हा जगामध्ये सर्वात तरुण देश आहे आणि या तरुण देशांमध्ये महाराष्ट्र हे तरुणाईचे आकर्षण आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही वैविध्यपूर्ण आहे. उत्पादन क्षेत्रापासून ते मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रांचा वाढता सहभाग राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नवी मुंबई परिसरात १६५ एकर क्षेत्रावर महाराष्ट्र मेडिसिटी विकसित करीत आहे. जागतिक दर्जाची अद्ययावत रुग्णालय या ठिकाणी उभारण्यात येत आहे. यासोबतच डिजिटल पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये मुंबई आणि नवी मुंबई परिसर विकसित होत आहे. भारताच्या एकूण डिजिटल पायाभूत सुविधांपैकी ६५ टक्के सुविधा या महाराष्ट्रामध्ये आहेत. संपूर्ण डिजिटल परिसंस्था राज्यामध्ये विकसित होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांना महाराष्ट्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. या संपूर्ण विकासाच्या बळावर भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीवर विश्वसनीय जागतिक पुरवठा साखळी बनविणे शक्य आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
#IACC
See less


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा