सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६

 




महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण, वन व हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली.

महाराष्ट्रातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रकल्प आणि केंद्र सरकारकडून अपेक्षित सहकार्याबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री यांना राज्यातील प्रशासनाची सद्यस्थिती तसेच केंद्राच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
राज्यातील विविध प्रकल्प वेगवेगळ्या टप्प्यांवर असून, त्यांना अधिक गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबाबतचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना दिले. महामार्ग, रेल्वे, मेट्रो, नदीजोड प्रकल्प तसेच उत्तन-विरार कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा झाली.
पुणे मेट्रो-३ प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या त्याची चाचणी सुरू आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही देशातील नवीन धोरणांतर्गत पहिली सार्वजनिक - खाजगी भागीदारी पद्धतीची मेट्रो आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना निमंत्रण दिले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुंबई-वाढवण एक्स्प्रेसवे कनेक्टिव्हिटी अर्थात उत्तन-विरार कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर विशेष चर्चा झाली. सुमारे ५५ हजार कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीमार्फत (जायका) वित्तीय सहाय्य मिळविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने सादर केला आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या भेटीत महाराष्ट्रातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण व वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा