15 ते 21 ऑगस्टदरम्यान 'जलसंधारण सप्ताह'; विविध उपक्रमांचे आयोजन
21 ऑगस्टला 'वॉक फॉर वॉटर' वॉकेथॉनचे आयोजन ;
जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
जलसंधारणावर आधारित सर्वोत्कृष्ट 'रील्स' बनवणाऱ्यांना
25 हजार रुपयांपर्यंतची पारितोषिके
अमरावती, दि.13 : जिल्ह्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ऑगस्ट रोजी ‘वॉक फॉर वॉटर -वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले असून नागरीकांनी मोठया संख्येत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. युवा पिढीच्या कल्पकतेला मंच उपलब्ध करून देत जलसंधारणावर आधारीत रील्ससाठी आकर्षक पारितोषिकही प्रदान करण्यात येणार आहेत.
मृद व जलसंधारण विभागामार्फत संपूर्ण राज्यात 15 ते 21 ऑगस्ट या कालावधीत 'जलसंधारण सप्ताह' राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील आयोजनाच्या पूर्व तयारीसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात जलसंधारण सप्ताह अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध उपक्रमांची घोषणाही केली. या अंतर्गत ‘पाणी बचत’ आणि ‘जलसंधारणाचा व्यापक संदेश देण्या’साठी 21 ऑगस्ट रोजी 'वॉक फॉर वॉटर' ही विशेष वॉकेथॉन आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिक, तरुण, विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
युवा पिढीला या अभियानात जोडण्यासाठी आणि जलसंधारणाचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया 'रील्स स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. जलसंधारणावर आधारित सर्वोत्कृष्ट रील्स तयार करणाऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे 25 हजारांचे प्रथम पारितोषिक, 15 हजारांचे द्वितीय तर 10 हजारांचे तृतिय पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार असल्याचे श्री. येरेकर यांनी सांगितले.
जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात वृक्षलागवड, श्रमदान, जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये व वॉकेथॉनमध्ये हिरिरीने सहभागी होऊन जलसंधारण सप्ताह यशस्वी करण्याचे आवाहन श्री. येरेकर यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा