शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

 




राज्य माहिती आयोगात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


अमरावती, दि. १५ : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्य माहिती आयोगाच्या अमरावती येथील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अमरावती येथील राज्य माहिती आयुक्त श्री. रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राज्य माहिती आयोगाचे उपसचिव श्री. देविसिंग डाबेराव, मधुसुदन देशमुख,आशिष मन्वर यांच्यासह आयोगातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालय परिसरात उत्साहाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग, संघर्ष आणि बलिदान यांचे स्मरण करून देणारा हा दिवस आहे. स्वातंत्र्याबरोबरच देशाची लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी संविधानिक मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

माहितीचा अधिकार हा नागरिकांना शासनाच्या कामकाजाबाबत माहिती मिळवून देणारा तसेच प्रशासनात पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढविणारा महत्त्वपूर्ण कायदा आहे. नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचे संरक्षण आणि लोकाभिमुख प्रशासनाला चालना देण्यामध्ये राज्य माहिती आयोगाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या अनुषंगाने आयोगातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि उत्तरदायी सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्ये जपण्यासोबतच आपल्या शासकीय कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन करण्याचा संकल्प केला. राष्ट्रप्रेम, संविधानिक मूल्ये आणि देशसेवेची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

#स्वातंत्र्यदिन
#स्वातंत्र्यदिन२०२६
#IndependenceDay2026
#IndependenceDay See less See less

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा