वृत्त क्र. 08 दिनांक- 09 जानेवारी 2019
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून
सुधारला 11 हजार 955 हेक्टर जमिनीचा पोत
Ø 11 हजार 527 शेतकऱ्यांनी घेतला लाभ
अमरावती, दि. 9 : राज्य शासनाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत विभागातील पाचही जिल्ह्याच्या धरणातील गाळ काढणे, नदी-नाला खोलीकरण, पाझर तलाव गाळ काढणे आदी कामे मोठया प्रमाणावर करण्यात आली. या योजनेअंतर्गत 595 लघु व मध्यम प्रकल्पातून 69 लाख 90 हजार 675 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. धरणातून काढण्यात आलेला हा गाळ 11 हजार 572 शेतकऱ्यांनी 11 हजार 955 हेक्टर शेतजमिनीवर टाकल्याने शेतजमिनीचा पोत सुधारुन उत्पन्नात भरीव वाढ होण्यास मदत होत आहे. राज्य शासनाने धरण, तलाव गाळमुक्त आणि शिवार गाळयुक्त व्हावे, यासाठी योजना, उपक्रम सुरु केले आहेत.
धरणामधील सुपिक गाळाची उपयुक्तता शेतकऱ्यांना कायम लक्षात आहे. पूर्वी शासनाला रॉयल्टी भरून शेजारील तलावातील गाळ शेतकरी घेऊन जात असत. शासनाने आता हा गाळ कोणत्याही मोबदल्याशिवाय देण्याचे ठरविले आहे. शासनाच्या या योजने अंतर्गत प्रशासकीय यंत्रणा तसेच अशासकीय संस्था पोकलेन मशीनचा पुरवठा नि:शुल्क करतात. गाळ उपसण्यासाठी आवश्यक असलेली यंत्र सामग्री व इंधनावरील खर्च शासनाकडून तसेच सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून आणि लोकसहभागातून करण्यात येतो. शेतकऱ्यांना केवळ धरणापासून शेतापर्यंत गाळ वाहून नेण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. शासनाने हे अभियान जाहिर करताच यास शेतकऱ्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. शेतकरी स्वखर्चाने धरण-तलावातील गाळ घेऊन जातात.
विभागांतर्गत अमरावती जिल्ह्यातील 122 लघु व मध्यम प्रकल्प, पाझर तलावातून 949 शेतकऱ्यांनी 4 लाख 10 हजार 109 घनमीटर गाळ उपसा करुन 644 हेक्टर शेतजमिनीवर टाकला. अकोला जिल्ह्यातील 58 प्रकल्पातून 228 शेतकऱ्यांनी 1 लाख 7 हजार 515 घनमीटर गाळाचा उपसा करुन 220 हेक्टर शेतजमिनीवर टाकण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 101 प्रकल्पातून 2065 शेतकऱ्यांनी 10 लाख 91 हजार 799 घनमीटर गाळ उपसा केला असून 5 हजार 299 हेक्टर जमीनीवर टाकण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 122 प्रकल्पातून 6239 शेतकऱ्यांनी 45 लाख 53 हजार 615 घनमीटर गाळ उपसा करुन 3 हजार 11 हेक्टर शेतजमिनीवर टाकण्यात आला आहे तर वाशिम जिल्ह्यातील 192 प्रकल्पातून 2091 शेतकऱ्यांनी 8 लाख 27 हजार 637 घनमीटर गाळ उपसा करुन 2 हजार 781 हेक्टर शेतजमिनीवर गाळ पसरविण्यात आला आहे. धरण, पाझर तलाव व जलाशयातील गाळ काढल्यामुळे प्रकल्पांच्या स्थापित क्षमतेमध्ये पाणी साठवणूक क्षमता वाढणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा