सोमवार, १४ जानेवारी, २०१९

पोलीस व्यायाम शाळेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पोलीसांनी आरोग्याप्रती जागरुक राहावे -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील





पोलीस व्यायाम शाळेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन  
पोलीसांनी आरोग्याप्रती जागरुक राहावे
-पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील

अमरावती, दि.14 जानेवारी : पोलीस विभाग हा जनतेच्या सुरक्षिततेसाठी 24 तास कर्तव्यावर असतो. दिवस-रात्र सेवा बजावत असतांना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आजार जडतात. पोलीसांचे आरोग्य नेहमी तंदुरस्त राहण्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहे. पोलीस व्यायाम शाळेच्या उभारणीमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी आज केले.
जोग स्टेडीयम येथे नव्याने उभारण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे उद्घाटन पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त संजयकुमार बावीस्कर, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके (झोन-1), शशिकांत सातव (झोन-2), प्रदीप चव्हाण (मुख्यालय), जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. पोटे पाटील म्हणाले, जनतेचा सुरक्षेचा व्रत घेऊन पोलीस विभाग अहोरात्र काम करीत असतो. ज्याप्रमाणे सामान्य व्यक्तींना त्यांचे कुटुंब असते त्याप्रमाणे पोलीसांना सुध्दा त्यांचे कुटुंब असते. वेळी अवेळी सेवा बजावत असतांना त्यांचे स्वत:च्या कुटुंबाकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यामुळे पोलीसांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होऊन अनेक व्याधी त्यांना जडतात. पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे आरोग्य चांगले व शरीर सदृढ राहण्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहे. व्यायाम शाळेच्या माध्यमातून पोलीसांना त्यांच्यावरील ताण गमाविण्यासाठी साधन प्राप्त झाले आहे. नियमित व्यायाम केल्यास मनुष्याचे शरीर सदृढ राहून आरोग्य चांगले राहते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, पोलीस विभागांकडून नागरिकांच्या अपेक्षा जास्त आहे. पोलीसांप्रती लोकांच्या भावना चांगल्या होण्यासाठी पोलीसांनी सामान्य लोकांसोबत सौजन्यांने वागून जनतेमध्ये आपल्या विभागाची प्रतिमा चांगली करावी. लोकांचे म्हणने ऐकून घेऊन त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी व गुन्हेगारांना काबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असेही श्री. पोटे पाटील यांनी यावेळी सांगितले. पोलीस विभागाच्या प्रश्न सोडविण्यासाठी शासन नेहमी पाठीशी राहणार असल्याची ग्वाही श्री. पोटे पाटील यांनी दिली.
पोलीस आयुक्त संजयकुमार बावीस्कर म्हणाले, पोलीस दलाकडून लोकांच्या अपेक्षा अधिक आहेत. परंतू पोलीस विभागात काम करीत असतांना गुन्हेगारांचा शोध, दोषींना शिक्षा व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीसांना खूप कसरत करावी लागते. हे काम अतिशय जिकरीचे असून रात्री बेरात्री डयूटीवर जावे लागते. कर्तव्य बजावत असतांना कुठली वेळ कशी येणार हे सांगता येत नाही. कोणी व्यक्ती किंवा गुन्हेगार कसा चढाई करुन येणार याची कल्पनाही राहत नाही. अशा परिस्थितीत पोलीसींग करुन जनतेला सुरक्षितता पुरवीणे व न्याय मिळवून देण्याचे कौशल्य पोलीसांना दिले असते.  पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला तात्काळ न्याय पाहिजे असते. न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर त्याठिकाणी फक्त निकाल दिला जात असतो. गुन्हेगारांना कमी जास्त मारहाण झाली किंवा कस्टडीमध्ये मृत्यू पावल्यास मानवाधिकार आयोगाकडून चौकशी करण्यात येते. पोलीसांनी मानवाधिकाराचे उल्लंघन केले असल्याचे पोलीस विभागावर ताशेरे ओढले जातात. अशा परिस्थितीत पोलीस अधिकारी कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतो. जनतेला सुरक्षित असल्याचा विश्वास पोलीस विभाग नेहमी देत असतो.
यावेळी कार्यक्रमात सन 2018 वर्षभरात उत्कृष्ठ काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला पोलीस आयुक्त कार्यालया अंतर्गत सेवारत अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव तर पोलीस उपायुक्त प्रवीण चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा