सोमवार, १४ जानेवारी, २०१९

अमरावती पारपत्र सेवा केंद्राचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते उद्घाटन प्रभावी संपर्कयंत्रणा व सुविधांत भर - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील







अमरावती पारपत्र सेवा केंद्राचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते उद्घाटन
प्रभावी संपर्कयंत्रणा व सुविधांत भर
-         पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

अमरावती, दि.14 : खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विशेष प्रयत्नातून अमरावती येथे पासपोर्ट सेवा केंद्र स्थापन झाले असून, त्यामुळे अमरावतीच्या नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे. केंद्र व राज्य शासनाकडून सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रभावी संपर्कयंत्रणा निर्माण करण्यात येत असून, अमरावती येथून  विमानसेवाही लवकरच कार्यान्वित होईल, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे सांगितले.
मुख्य डाकघर यांच्याव्दारे पारपत्र (पासपोर्ट) सेवा केंद्राचे खासदार आनंदराव अडसूळ यांचे हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. उद्योग राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार श्रीकांत देशपांडे, पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभायेपासपोर्ट कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक सी.एल.गौतम, प्रवर अधीक्षक व्ही. के. सिंग, वरिष्ठ पोस्टमास्टर श्री. टेंभरे, एमआयडीसी असो. चे किरण पातूरकर, माजी महापौर विलास इंगोले यांच्यासह पोस्टल विभागाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, खासदार श्री. अडसूळ यांनी प्रयत्नपूर्वक रेल्वे सुधारणा व इतर सुविधा अमरावती जिल्ह्यात घडवून आणल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांसाठी  अमरावती- पुणे ही नवी रेल्वे गाडी, तसेच नागपूर –मुंबई दुरांतो गाडीचा थांबा बडनेरा येथे मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

              पारपत्राची संपूर्ण प्रक्रिया अमरावतीतच :  खा. अडसूळ
अमरावती विभागातील व जिल्ह्यातील उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी तसेच मुस्लीम बांधवांना हजला जाण्यासाठी पारपत्राची आवश्यकता असते. अमरावती येथील सेवा केंद्रामुळे नागरिकांना आवश्यक महत्वाचा दस्तऐवज पारपत्र सहजरीतीने उपलब्ध होणार असल्याचे श्री. अडसूळ यावेळी म्हणाले. 
ते पुढे म्हणाले की, पोस्टाच्या सर्व योजना, रेल्वे, दूरसंचार व इतर विभागाच्या केंद्रीय योजनांच्या संदर्भातील लाभ अमरावतीच्या नागरिकांना प्रथमत: मिळावा असा माझा प्रयत्न असतो. विदेश मंत्रालय व डाकघर यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती मुख्य डाकघर येथे नागरिकांच्या सोयीसाठी पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यात आले.
पारपत्र उपलब्धतेला प्राधान्य
परराष्ट्र मंत्रालयाने देशातील नागरिकांना शिक्षण, उपचार, पर्यटन, व्यवसायासाठी जगाचे दालन खुले व्हावे यासाठी पासपोर्ट उपलब्धतेला अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे देशभरात 331 पासपोर्ट कार्यालये आतापर्यंत सुरू करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी, व्यावसायिक व नागरिकांना परदेशात नोकरी व व्यवसायाच्या वृध्दीसाठी परदेशात जावे लागते. मुस्लीम बांधवांना पवित्र हजसाठी बाहेर देशात जावे लागते. या केंद्रामुळे आदींना नागपूर येथे जावे लागणार नसून अमरावतीतच मुलाखत घेऊन पासपोर्ट प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. जनतेची अनेक वर्षाची मागणी या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे पूर्ण झाली असून याचा सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये दरदिवशी 25 मुलाखतीचा स्लॉट देण्यात आला आहे, अशी माहिती श्री. अडसूळ यांनी यावेळी दिली.
                                                सर्वांसाठी उपयुक्त : श्री. देशमुख
पासपोर्ट काढण्यासाठीची प्रक्रिया कशी असते व किती वेळ लागते याविषयी यावेळी आमदार श्री. देशमुख यांनी अनुभवकथन केले. या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे जिल्ह्यासह विभागातील नागरिकांना लाभ होणार आहे, असे ते म्हणाले.
 श्री. जायभाये यांनी प्रास्ताविक केले.
                                                           पासपोर्ट काढण्याची प्रक्रीया !
            ज्यांच्याकडे पासपोर्ट नाही त्यांना पासपोर्ट काढायचा असेल तर ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन आहे. यासाठी ऑनलाईन सुविधा असणाऱ्या केंद्राची मदत घ्यावी लागते www.passportindia.gov.in या साइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्‍यक आहे. ऑनलाइन पेमेंट झाल्यानंतर अमरावती येथे सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट सुविधा केंद्रामध्ये मुलाखतीसाठी कधी यायचे याचा एसएमएस मोबाईलवर येतो. त्या तारखेला मूळ व झेरॉक्स प्रतींमध्ये कागदपत्रे घेऊन तपासणीसाठी जावे लागते. या ठिकाणी संगणकावर छायाचित्र घेतले जाते. तसेच बोटांचे ठसे घेतले जातात. याशिवाय आपले ऑनलाईन भरलेले कागदपत्रे तपासली जातात. ही प्रक्रिया झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतात त्या हद्दीतील पोलीस स्टेशन मार्फत चारित्र पडताळणी करण्यात येते. त्यामुळे अमरावती येथील कार्यालयात कागदांची तपासणी, छायाचित्र व बोटांचे ठसे घेतल्यानंतर किमान पंधरा दिवसानंतर पासपोर्ट आपल्याला मिळू शकतो.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा