सामाजिक न्यायाच्या योजनांचे लाभ सर्वांपर्यंत पोहचवा
-सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले
297
लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वाटप
अमरावती, दि.16 जानेवारी : राज्य शासनाने गेल्या चार वर्षात सामाजिक
न्यायाच्या विविध योजना अग्रक्रमाने राबविल्या आहेत. गरजूंना या योजनांचा लाभ
व्हावा, यासाठी काही अटी शिथील केल्या आणि भरीव तरतूद उपलब्ध करुन दिली. या योजनांचा लाभ तळागळातील जनतेला होण्यासाठी विभागातील अधिकारी कर्मचारी
यांनी मनापासून काम करावे, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार
बडोले यांनी आज केले.
येथील ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सामाजिक न्याय
विभागाच्यावतीने अमरावती विभागातील लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वाटप
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. उद्योग राज्यमंत्री तथा
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रविण पोटे पाटील, आमदार डॉ. अनिल बोंडे, रमेश बुंदिले,
प्रभुदास भिलावेकर, अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी. एच. थुल,
बार्टीचे संचालक कैलाश कणसे, समाजकल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, प्रादेशिक उपायुक्त
विजय साळवे, सहाय्यक आयुक्त मंगला मून, विजयजी मून आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील
दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी संविधानामध्ये तरतूद करुन त्यांना
न्याय दिला आहे. मागासवर्गीय समाजातील
व्यक्ती सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत. हे परिवर्तन घडलेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
लिहून ठेवलेल्या घटनेमुळेच. त्यांनी समता, न्याय, एकात्मता, बंधुता या समताधिष्ठीत
विचाराने लिहीलेल्या घटनेमुळेच मागासवर्गीय समाज सर्वच क्षेत्रात अग्रेसर ठरला
आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या विचारांवर राज्याचा सामाजिक न्याय
विभाग मार्गक्रमण करीत आहे.
राज्यात सरकार स्थापित झाल्यावर सामाजिक न्याय विभागाच्या
विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. सव्वाशेव्या जयंती
वर्षाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त
करण्यासाठी त्यांनी वास्तव्य केलेले लंडन येथील घर महाराष्ट्र शासनाने घर विकत
घेतले, इंदू मिल येथे साडे बाराशे एकर जमीनीवर डॉ. आंबेडकरांचे स्मारक
उभारण्यासाठी 709 कोटी रुपयाचा विकास आराखडा, नागपूर येथील दिक्षाभूमीचा विकास
करण्यासाठी 100 कोटी रुपये मंजूर, ड्रॅगन पॅलेस उभारण्यासाठी 25 कोटी रुपये, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कॅन्व्हेंशन सेंटरसाठी 128 कोटी रुपये तरतूद करण्यात आली.
सर्वच
थोर पुरुषांच्या जन्मस्थळांच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे निधी उपलब्ध
करुन देण्यात येणार आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना
अंतर्गत अनुसूचीत जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्र्य रेषेखालील भूमीहीन
शेतमजूरांसाठी चार एकर कोरडवाहू जमीन तर दोन एकर बागायती जमीनी जुन्या अटी रद्द
करुन शंभर टक्के अनुदानावर संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2430 लाभार्थ्यांना
9 हजार 335 हेक्टर जमीनीचे भूमीहीनांना वाटप करण्यात आले आहे. समाजातील गोरगरीब
विद्यार्थ्याला शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार
योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना लाभ, रमाई घरकुल आवास योजना अन्वये स्वत:चे घर,
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व
उपसाधने पुरवठा, आंतरजातीय विवाहास प्रात्सोहनपर आर्थिक सहाय्य, दिव्यांगाकरीता
विविध आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध
महामंडळांतर्फे मागासवर्गीयांना उद्योग उभारणीसाठी आर्थिक सहाय्य, अनु. जातीच्या
उद्योजकांसाठी एमआयडीसी मध्ये राखीव भूखंड, अनु. जातीच्या विद्यार्थ्यांसाठी
परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आदी योजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यात
येत आहे. मागील वर्षी 75 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करुन
शिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. जगातील शंभर नामांकित विद्यापीठामध्ये
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सहाय्य करण्यात येत आहे. या
योजनांचा जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता यावा यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी
मनापासून काम करावे, असे आवाहनही श्री. बडोले यांनी केले.
समाजाला दिशा देण्याचे काम महामानवाने केले-
पालकमंत्री
पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, सामाजिक न्याय
विभागाच्यावतीने विभागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ सामाजिक
न्याय मंत्र्यांच्या हस्ते वितरीत करण्यात येत आहे. हा अतिशय महत्वाचा दिवस आहे.
समाजातील वंचित व शोषित घटकाला दिशा देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
घटनेच्या माध्यमातून अधिकार बहाल केले. त्यांनी दिलेल्या या अधिकारामुळेच
मागासवर्गींय समाज सर्वच क्षेत्रात अग्रेसर होत आहे. समाजातील उच्च पदावर
पोहोचलेल्या व्यक्तीने ज्याप्रमाणे समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे,
त्याचप्रमाणे समाजातील इतर गोरगरीब जनतेला, होतकरुन विद्यार्थ्याला सहाय्य करुन
समोर आणावे, असे आवाहन श्री. पोटे पाटील यांनी यावेळी केले.
योग्य न्यायासाठी मागासवर्गीय अधिकाऱ्यांची नियुक्ती-
खा. अडसूळ
खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले की, घटनेचे शिल्पकार डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी आरक्षणाच्या माध्यमातून
तरतूद केली आहे. मागासवर्गीयांचा सर्वच क्षेत्रात विकास होण्याच्यादृष्टीने
त्यांनी दुरदृष्टी ठेवून त्यावेळी घटनेत मांडणी केली आहे. त्यांचा हा विचार
सामाजिक न्याय मंत्रालयाव्दारे निरंतर प्रवाहात राहण्यसाठी तसेच मागासर्गीयांच्या
प्रश्न व अडचणींची जाणीव राहण्यासाठी मंत्रालयात मागासवर्गीय अधिकाऱ्यांची
नियुक्ती करण्यात येते. आज आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सांस्कृतिक भवन भरगच्च भरलेले
दिसल्यामुळे खरोखरच योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला, हे दिसून
येते.
या कार्यक्रमात एकूण 297 लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते
लाभाचे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील
योजनानिहाय लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे-
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने
अंतर्गत एकूण 61 लाभार्थी, स्वाधार योजना-30 लाभार्थी, रमाई घरकुल योजना-34,
दिव्यांग पाच टक्के निधी (झेरॉक्स मशीन)-7, दिव्यांग अपंग व्यक्तीच्या विवाहीत
जोडप्यांना आर्थिक सहाय्य- 48
महामंडळाव्दारे आर्थिक
सहाय्य
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अमरावती-8 लाभार्थी,
साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महा. अमरावती- 7, संत रोहीदास
चर्मोद्योग विकास महा, अमरावती-6, महा. राज्य. अपंग वित्त व विकास महा- 13
लाभार्थी
आंतरजातीय विवाह योजना-40 लाभार्थी, मिनी टॅक्टर योजना-36 ,
गुणवंत खेळाडू- 2, जात प्रमाणपत्र पडताळणी -5
यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या जनसंपर्क अधिकारी मंगला
देशमुख यांचेसह विभागाचे अधिकारी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व
नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा