बुधवार, ३० जानेवारी, २०१९

आरोग्य विभागात पदभरतीसह आमुलाग्र बदल - सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे


आरोग्य विभागात पदभरतीसह आमुलाग्र बदल
                                        - सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे

अमरावती, दि.30 : राज्याची सार्वजनिक आरोग्य सेवा अधिकाधिक सक्षम होण्यासाठी रिक्त पदांच्या भरतीसह विविध आमुलाग्र बदल करण्यात येत आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
खासदार आनंदराव अडसूळ यांच्या पुढाकाराने डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना श्री. शिंदे बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार कॅ. अभिजित अडसूळ, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, पदाधिकारी जयंत डेहणकर, शिवराय कुलकर्णी, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले, डॉ. पारीख, किरण पातुरकर आदी यावेळी उपस्थित होते.
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा सक्षमपणे पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील एएसआय मानांकन प्राप्त रुग्णालयांची श्रेणीवाढ होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सोळाशे कोटीचा निधी मिळवून देण्यासाठी राज्य शासन पाठपुरावा करत आहे. आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजूंना शस्त्रक्रियेसाठी मदत होत आहे. अतिदुर्गम भागात बाईक ॲन्बूलन्सच्या सहाय्याने रुग्णांना उपचार होत आहेत. गरीब रुग्णांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याकरीता राज्यात बाळासाहेब ठाकरे मदत कक्ष उभारण्यात आले आहेत. मेळघाटातील कुपोषण निमुर्लनासाठी उच्चस्तरीय समितीची बैठक घेऊन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
विभागातील डॉक्टर, नर्सेस व आशा वर्करच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करू. येत्या काळात विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू. महाआरोग्य शिबिरे औषधे देण्यापुरतीच मर्यादित राहणार नसून गरजू रुग्णांवर शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यात येणार आहे.   







 
श्री. शिंदे पुढे म्हणाले की, गरीब व वंचित घटकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार श्री. अडसूळ यांनी सामाजिक बांधिलकीतून शिबिराचे अतिशय नेटके नियोजन केले आहे. यापुढेही दिव्यांग व्यक्तींच्या सहाय्यतेसाठी तसेच त्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी दिव्यांग सहायता शिबिराचे आयोजनही जिल्ह्यात होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
                        शेवटच्या घटकाला लाभ मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन - पालकमंत्री
पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, जिल्ह्यात महाआरोग्य शिबिराची आवश्यकता होती. ती गरज खा. अडसूळ यांच्या पुढाकाराने शिबिराच्या आयोजनातून पूर्ण झाली आहे. शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी येत्या काळात दर तीन महिन्याला एक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा शासनाचा मानस आहे.    
टेलीमेडिसीन उपक्रमाद्वारे मेळघाटातील दुर्गम भागातील रुग्णांना मोठ्या शहरातील डॉक्टरांकडून उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.  शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलद्वारे आतापर्यंत पाच रुग्णांवर यशस्वीरित्या मुत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आहे, असेही श्री. पोटे पाटील यांनी यावेळी सांगितले.
खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले की, केंद्र सरकारकडून प्राप्त निधीतून आरोग्य शिबिराचे जिल्ह्यात पाच ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. भातकुली, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, सेमाडोह या शिबिराच्या ठिकाणी तीन हजारावर रुग्णांना आरोग्य सुविधांचा लाभ दिला आहे. यामध्ये ह्दयरोग तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया व इतर आजार असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर चांगल्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अंध, अपंग व दिव्यांगांची दखल घेवून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी गरजू रुग्णांसाठी कर्णयंत्र, चष्मे, जयपुर फुट, तीनचाकी वाहन, अंध व्यक्तींसाठी काठी यासह विविध सहाय्यभूत ठरणारी साहित्य वितरीत करण्यात येणार आहे.
     श्री. अडसूळ पुढे म्हणाले की, आतापर्यंत जिल्ह्यातील पाच हजारांवर चष्म्यांचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता गरजू रुग्णांवर उपचार करण्यासाठी न्यूरोलॉजिस्ट तज्ञाची जिल्ह्याला आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
 या महाआरोग्य शिबिरात 25 विविध आजाराशी निगडीत स्टॉल उभारण्यात आले होते. मोफत नेत्र तपासणी व चष्मे वितरण स्टॉलला नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता.  शिबिर 31 जानेवारी सायंकाळपर्यंत सुरु राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

000000
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा