कौशल्य विकासावर आधारीत शिक्षणातूनच रोजगार निर्मिती
* शिक्षण मंत्र्यांचा संस्थाचालक, प्राध्यापकांशी संवाद
अमरावती, दि. 4 : येत्या वीस वर्षात औद्योगिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या गरजा लक्षात घेवून विद्यार्थ्यांना कौशल्यविकासावर आधारीत शिक्षण देण्यात यावे, त्यादृष्टीने शिक्षण पद्धतीत आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. केवळ पदवीघेऊन बेरोजगारी निर्माण करण्यापेक्षा कौशल्य विकासावर आधारीत शिक्षणातून रोजगार निर्मिती करण्यात येत असल्याचेउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या संगीतसुर्य केशवराव भोसलेसभागृहात प्राध्यापकांशी त्यांनी थेट संवाद साधला.
यावेळी पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. जाधव, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. कळंबे, डॉ.कुमार, डॉ. इंगळे, प्रा. दिनेश सुर्यवंशी, शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेचे संचालक एस. जी. गुप्ता आदी उपस्थित होते.
शिक्षणमंत्री म्हणाले, इयत्ता दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी असते. अनुत्तीर्णविद्यार्थ्यांच्या अभ्यासविषयक समस्या जाणून घेवून त्यावर उपाययोजना म्हणून दहावीची परीक्षा कृती पत्रिकांवर आधारीतकरण्यात आली आहे. यामुळे पाठांतरापेक्षा विषयाचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करण्याला महत्त्व आले आहे. तसेच प्राध्यापकांचीभरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी मुलाखतींचे चित्रिकरण करण्यात येईल. विद्यापीठ अधिनियम लागूकरण्यात आला असल्यामुळे महाविद्यालय आणि विद्यापीठांमधील निवडणुकीदरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.तसेच समाजातील समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी संशोधन करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
नॅक मानांकन प्राप्त महाविद्यालयांची भूमिका, विद्यापीठ निवडणुकीमध्ये सुलभ मतदान प्रक्रिया,महाविद्यालयातील शिक्षण आणि शिक्षकेतर रिक्त पदांची भरती, अभियांत्रिकीसाठी आकारण्यात येणारे शिक्षण शुल्क दोन टप्प्यांमध्ये भरता यावे, अमरावती विद्यापीठात आचार्य पदवीसाठीचे शुल्क कमी करणे आदी शंकांचे निरसन श्री. तावडे यांनी केले.
अमरावती विद्यापीठात संस्थाचालकांशी संवाद
दरम्यान श्री. तावडे यांनी संत गाडगेबाबा विद्यापीठात संस्थाचालकांशी संवाद साधला. यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. अजय देशपांडे आदी उपस्थित होते.
राज्यातील शैक्षणिक पद्धती, भविष्यातील संधीचा वेध घेऊन त्यानुरूप विद्यार्थी घडविण्याचे कार्य संस्थाचालकांनी करावे,असे आवाहन करून श्री. तावडे म्हणाले, कालबाह्य अभ्यासक्रम रद्द करून त्याजागी नवीन अभ्यासक्रम आणणे आवश्यक आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी काही महाविद्यालयांनी एकत्र येऊन अभिमत विद्यापीठ स्थापनेत पुढाकार घ्यावा. विद्यापीठ मानांकनात आवश्यक असलेल्या बाबींची पुर्तता करून त्या समितीसमोर मांडल्यास गुण मिळविण्यास मदत होईल. शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी शिक्षकांची 40 टक्के तर शिक्षकेतर प्रवर्गातील संपूर्ण पदे भरण्याची मान्यता देण्यात येणार आहे. राष्ट्री य उच्च शिक्षा, नॅकसाठी सहकार्य आणि नवीन अभ्यासक्रमाला मान्यता देण्यासाठी गतीने कार्य करण्यात येईल. शिष्यवृत्तीची रक्कम त्याच वर्षी मिळावी, यासाठी ऑनलाईन पद्धती स्विकारण्यात आली आहे. त्यासोबतच तासिका तत्वावरील पदे, त्यातील सुधारणा आदींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी हर्षवर्धन देशमुख, दिवाकर पांडे, वसंत घुईखेडकर, परमानंद अग्रवाल, डॉ. संतोष ठाकरे, रामलाल काळे आदींनी संस्थाचालकांच्या वतीने समस्या मांडल्या.
थेट संवादापूर्वी श्री. तावडे यांनी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी – 20 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा