शुक्रवार, २ जून, २०२३

जिल्ह्याचा विकास आराखडा साकार करण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे - प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे

 जिल्ह्याच्या विकासप्रक्रियेत सहभागी व्हा! जिल्हा प्रशासनाचे नागरिक व संस्थांना आवाहन

 

जिल्ह्याचा विकास आराखडा साकार करण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे

-         प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे

 

अमरावती, दि. 22 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाला 2047 पर्यंत ‘विकसित भारत @2047’  करण्याचा संकल्प केंद्र शासनाने केला आहे. त्यासाठी स्थानिक वैशिष्ट्ये व गरजा लक्षात घेऊन जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. हा आराखडा परिपूर्ण होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक, संस्था व आस्थापनांनी त्यांच्या सूचना, संकल्पना, अभिप्राय प्रशासनाला कळविण्याचे आवाहन प्र. जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी केले आहे.

 

केंद्र शासनाने 2047 पर्यंत भारत विकसित देश करण्याचा संकल्प केला असून, सन 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्द‍िष्ट जाहीर केले आहे. विकसित भारताची ही उद्द‍िष्टे साध्य करताना राज्यांचा विकास गतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलीयन डॉलर, सन 2037 पर्यत 2.5 ट्रिलीयन डॉलर व सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे राज्याचे मुख्य ध्येय आहे.

हे उद्दिष्ट गाठण्यासाठी विकासाचे केंद्र म्हणुन जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक विकासासाठी व सर्वसमावेशक दृष्टिकोन विकसित करणे शक्य होईल. जिल्हाकेंद्री नियोजनामुळे शाश्वत विकास उद्द‍िष्टे साध्य करण्यासही मदत होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती आण‍ि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता, तसेच जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा विकास आराखडा आकारास येणार आहे. आराखडा परिपूर्ण होण्यासाठी लोकसहभागही तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील आस्थापना, संस्था व नागरिकांनी आराखडा तयार करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. 

अमरावती जिल्ह्यायातील विकासाच्या संभाव्य संधी ओळखून संभाव्य गुंतवणुकीला व विकासाला चालना देऊ शकणा-या बाबींविषयी नागरिकांनी सूचना द्याव्यात. विकासासाठी कृषी व संलग्न सेवा, उद्योग (वस्तुनिर्माणसह), जलसंधारण, पायाभुत सुविधा, शिक्षण,आरोग्य,कौशल्य विकास, पर्यटन आदी विविध क्षेत्रांची वृध्दी होण्याच्या अनुषंगाने संकल्पना, सूचना द्याव्यात. याबाबतच्या मार्गदर्शक सुचना  https://drive.google.com/file/d/1erHWFXadeK3AasoN28K_sDCuwSZfZjfF/view?usp=share_link  या लिंकवर पाहता येतील. संस्था, आस्थापना व नागरिकांनी अभिप्राय dpoamt.amravati@gmail.com या ई- मेलवर लेखी स्वरुपात दि.5 जूनपर्यंत कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा