बुधवार, २१ जून, २०२३

 मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरु

यादीत सुधारणा करण्यासाठी सहकार्य करावे,

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन

 

        अमरावती, दि. 2 : भारत निवडणूक आयोगाने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांनी दुबार नोंदणी, मयत मतदार व स्थलांतरित मतदार यांची माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना देऊन यादीत सुधारणा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

            निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यातील पूर्व उपक्रमात त्यानुसार मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण दि. 20 जुलैपूर्वी घेण्यात येईल. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, मतदार यादीत सुधारणा करणे आदी कामे दि. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबरदरम्यान करण्यात येतील. त्यानंतर 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान नमुना १-८ तयार करणे, अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारूप यादी तयार होईल.

पुनरीक्षण उपक्रमात 17 ऑक्टोबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. हरकती व दावे स्वीकारण्याचा कालावधी दि. 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर असेल. दि. 26 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढल्या जातील. डाटाबेस अद्ययावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई 1 जानेवारी 2024 पर्यंत केली जाई व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी रोजी केली जाईल.  

दुबार मतदार, स्थलांतरित मतदार व मयत मतदारांची 100 टक्के वगळणी करण्यासाठी नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना माहिती द्यावी. हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी नेमलेल्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  (बीएलओ) यांना सर्व सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले.

०००


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा