महाज्योतीकडून
पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती
लवकरच
जाहिरात प्रसिध्द होणार
विद्यार्थ्यांनी
कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये
महाज्योतीकडून
आवाहन
अमरावती, दि. 13 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण
संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेकडून इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या
जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पीएचडीकरिता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती
देण्याची योजना सन 2021 पासून सुरु करण्यात आली आहे. सन 2021 मध्ये 756
उमेदवारांना तर सन 2022 मध्ये 1236 उमेदवारांना अधिछात्रवृत्ती मंजूर करण्यात आली
असून संबंधित विद्यार्थ्यांना नियमानुसार सहामाही अधिछात्रवृत्तीची रक्कम प्रदान
देखील करण्यात आली आहे. महाज्योती ही संस्था सन 2023 या वर्षासाठी लवकरच पीएचडी
अधिछात्रवृत्ती योजनेकरिता अर्ज मागविण्याची जाहिरात प्रसिद्ध करणार आहे.
महाज्योती,
नागपूर संस्थेने सन 2023 या वर्षासाठी पीएचडी अधिछात्रवृत्ती योजनेकरिता अर्ज
मागविण्याची जाहिरात तयार केलेली होती, मात्र बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय
व अमृत संस्थांमार्फत चालू असलेल्या योजनांचा फेरविचार करणे व कालानुरूप रोजगाराभिमुख
घोरण राबविण्यासाठी नवीन धोरण आखणे या सर्व बाबींचा विचार करून मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य यांनी सर्व संस्थांच्या बाबत एकसमान सर्वकष धोरण तयार करण्याचे
निर्देश दिले आहेत, त्या अनुषंगाने मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या
अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आलेली आहे. समितीच्या बैठका
वेळोवेळी पार पडलेल्या आहेत.
सदर
बैठकीत निश्चित विद्यार्थी संख्या, अर्थसहाय्य स्वरूप, अधिछात्रवृत्ती नोंदणी
दिनांकापासून द्यावी की अवार्ड दिनांकापासून द्यावी, तसेच इतर अनुषंगिक बाबींवर
सविस्तर चर्चा झालेली आहे. याबाबतचा अहवाल उच्चाधिकार समिती मा.मंत्रिमंडळ यांना
सादर करणार आहे व त्यानुसार पीएचडी अधिछात्रवृत्ती योजनेत निश्चित विद्यार्थी
संख्या, अर्थसहाय्य स्वरूप, अधिछात्रवृत्ती नोंदणी दिनांकापासून द्यावी की अवार्ड
दिनांकापासून द्यावी, तसेच इतर अनुषंगिक बाबींवर शासन मार्गदर्शक सूचना देणार आहे.
महाज्योतीकडून
सन 2023 या वर्षासाठी लवकरच पीएचडी अधिछात्रवृत्ती योजनेकरिता अर्ज मागविण्याची
जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी निश्चित विद्यार्थी संख्या, अर्थसहाय्य स्वरूप,
अधिछात्रवृत्ती नोंदणी दिनांकापासून द्यावी की अवार्ड दिनांकापासून द्यावी, तसेच
इतर अनुषंगिक बाबीं निश्चित करणे आवश्यक आहे. या बाबीविषयी शासनाच्या मार्गदर्शक
सूचना प्राप्त होताच लवकरच जाहिरात काढण्यात येणार आहे.
सदर
प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आलेली आहे, या बाबीचा सुगावा लागल्याने काही
व्यक्तींची श्रेयवादासाठी विद्यार्थ्यांना आंदोलनात खेचण्याची तयारी सुरु आहे.
जेणेकरून आम्ही आंदोलन केल्याने शासनाने आमची मागणी मान्य केली असे चित्र समाजात
पोहचेल आणि श्रेय लाटता येईल अशी या व्यक्तींची भूमिका असल्याचे दिसून येते.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या भूलथापांना अजिबात बळी पडू नये तसेच व्यक्तिगत
स्वार्थासाठी श्रेयवादाची लढाई करणाऱ्या व्यक्तींच्या मागे आंदोलनात फरफट जाऊन
शैक्षणिक नुकसान करून घेऊ नये असे महाज्योती मार्फत आवाहन करण्यात येत आहे.
सर्व
संबंधित विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी कृपया कोणत्याही भूलथापांना
बळी पडू नये शासनाकडून सर्व समावेशक निकष प्राप्त होताच सन 2023 करिता महात्मा
फुले संशोधन अधिछात्रवृत्तीकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया महाज्योतीद्वारे सुरु
करण्यात येणार आहे, असे व्यवस्थापकीय संचालक, राजेश खवले, महात्मा ज्योतिबा फुले
संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा