अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा
शाळांमधून ‘इट राइट’ मोहिम प्रभावीपणे राबवा
- आरडीसी विवेक घोडके
अमरावती, दि. 21 : ‘जंक फूड’मुळे कमी वयात अनेकांना आजार जडल्याचे आढळून येत आहे. बालकांमध्येही दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सुरू केलेली ‘इट राइट’ (योग्य खा) मोहिम शाळांमध्ये प्रभावीपणे राबवावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी आज केली.
अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सहआयुक्त गणेश परळीकर, सहायक आयुक्त शरद कोलते, पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार अमरावती जिल्ह्यात हायजीन रेटिंग, इट राईट कॅम्पस, इट राईट स्कूल, फॉसटॅक ट्रेनिंग आदी कार्यक्रम राबवावयाचे आहेत. बालकांना आरोग्यदायी व पोषक अन्न मिळावे या दृष्टीने विद्यार्थी व पालक दोहोंची जाणीवजागृती करावी, असे आरडीसी श्री. घोडके यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तपासावयाचे अन्न नमुने प्रलंबित राहतात, अशी तक्रार आहे. त्याच्या निराकरणासाठी तत्काळ कार्यवाही व्हावी, असेही त्यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरात केलेल्या कारवाईचा आढावा यावेळी घेण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने दि. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत अन्नपदार्थाच्या 218 तपासण्या केल्या. कारवाईत 22 लक्ष 65 हजार 842 रू. किंमतीच्या पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे, 1 एप्रिल 2023 ते 21 जून 2023 या कालावधीत 23 तपासण्या व 30 हजार 400 रू. किंमतीचा पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
०००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा