दिव्यांग व दुर्बल घटकांच्या उत्थानाकरीता मनरेगा योजना लाभदायी
-दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चुभाऊ कडू
रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या कार्याचे कौतुक
अमरावती, दि. 29 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेचा लाभ घेऊन शेतकरी बांधवांनी व भूमिहीन कुटुंबांनी आर्थिकरित्या समृध्द व्हावे. दिव्यांग व दुर्बल घटकांच्या उत्ताथासाठी मनरेगा योजना लाभदायी असल्याचे प्रतिपादन दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चुभाऊ कडू यांनी केले.
मनरेगा योजनेंतर्गत दिव्यांग, विधवा तसेच दिव्यांग महिला शेतकरी आदींच्या शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर वृक्ष लागवड, फळबाग लागवड करणे तसेच आंबा अतिधन लागवड ते निर्यात या विषयावर तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शनपर कार्यशाळा कुरुळपूर्णा येथील विठ्ठन जिनींग येथे नुकतीच सपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार बच्चुभाऊ कडू व रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आंबा लागवडी तज्ज्ञ डॉ.भगवानराव कापसे तसेच क्षमता बांधणी सदस्य सुमित गोरले, राम पराडकर, श्रीमती प्रियंका ढवळे, शक्तिकुमार तायडे, तुषार लोखंडे, श्रीमती सीमा ताकसांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले की, रोहयो विभागाच्या 25 मेच्या शासन निर्णयानुसार मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायती मार्फत रोपवन संरक्षण व संगोपन योजना प्रायोगिक तत्त्वावर अचलपूर आणि चांदुरबाजार तालुक्यात राबविण्यात येणार आहे. यासाठी रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांचे त्यांनी अभिनंदन केले व शासनाचे आभार मानले. श्री. नंदकुमार यांनी शेतकऱ्यांचा सर्वांगिण हिताचा विचार करुन तत्काळ शासन निर्णय निर्गमित केला. अशाप्रकारे शेतकरी हिताचा विचार करणारे व कृषी विकासाबाबत दूरदृष्टी असणारे ते एकमेव सचिव आहेत, असे कौतुक श्री. कडू यांनी अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्याप्रती केले.
कार्यशाळेत मनरेगा योजनेत क्षमता बांधनी करताना तज्ज्ञ व्यक्तींकडून मनरेगाची ओळख, रोहयो म्हणजे काय? मनरेगा म्हणजे काय? व मनरेगाची उ्दिष्टे तसेच वैशिष्टये, अगोदरची रोहयो योजना आणि आताची मनरेगा यातील फरक या संदर्भात उपस्थित शेतकरी बांधवांना, नागरिकांना सविस्तर माहिती दिली. मनरेगा अंतर्गत शेतकरी, भूमिहीन, व्यावसायिक कुटूंबासाठी तसेच दिव्यांग महिलासाठी, बचतगटांव्दारे कोणती कामे केली जाऊ शकतात याबाबत मार्गदर्शन केले.
मनरेगाच्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक कामातून शाश्वत स्वरूपाची मत्ता निर्माण करून सुविधा संपन्न होण्यासाठी मनरेगाची मदत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मनरेगा योजने अंतर्गत कामे करून सुविधा संपन्न झालेल्या कुटुबांची यशोगाथाची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. त्यात गिरगुटी येथील सार्वजनिक वृक्ष लागवडीतून महिला सक्षमीकरण, खोमारपाडा येथील शेततळे आणि मत्स्य व्यवसाय, जामखेड तालुक्यातील पेरू बागेच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी या तीन शेतकऱ्यांचा यशोगाथा उपस्थितांना दाखविण्यात आल्या.
मनरेगातर्फे अभिसरण आणि संयोजन, एनजीओ संस्थांची मदत, फळबाग लागवडीसाठी घटकनिहाय दिला जाणारा खर्च, किमान व कमाल क्षेत्र मर्यादा, अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, लागवडीसाठी कार्यान्वयन यंत्रणा, लागवडीसाठी लागणारी फळझाडे, वृक्ष, औषधी पिके/फुल, मसाला पिकांची माहिती, पिकनिहाय अनुदान रक्कम आदीबाबत कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. फळबाग लागवडीची पूर्व तयारी मध्ये जमिनीची निवड, हवामान क्षेत्रानुसार लागवड, कलम /रोपाची उपलब्धता, फळबाग लागवडीच्या विविध पद्धती, लागवडीनंतर काळजी इत्यादीबाबत क्षमता बांधणी सदस्य सुमित गोरले, राम पराडकर, श्रीमती प्रियंका ढवळे, शक्तिकुमार तायडे, तुषार लोखंडे, श्रीमती सीमा ताकसांडे आदींनी उपस्थितांना मागर्दर्शन केले.
डॉ.भगवानराव कापसे यांनी आंबा लागवडीच्या विविध पद्धती, विविध जाती, देशानुसार उत्पादन आणि उत्पन्न यावर मार्गदर्शन करून महाराष्ट्रामध्ये आंबा अतिधन लागवड करून उत्पादन आणि उत्पन्न मध्ये कशी वाढ करता येऊ शकते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत चांदुरबाजार व अचलपूर क्षेत्रातील दिव्यांग, विधवा, शेतकरी महिला तसेच भूमीहीन आणि पुरुष शेतकरी यांच्यासह शेकडो संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मनरेगा अंतर्गत विविध योजनांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. भगवानराव कापसे, मनरेगाचे क्षमता बांधणी सदस्य, चांदूरबाजारचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, रोहयो विभागाची यंत्रणा व चांदुरबाजारचे संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. मनरेगा योजनेच्या कार्यान्वयन यंत्रणेत काम करणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा