शुक्रवार, २ जून, २०२३

जप्त केलेली वाळू तत्काळ आवास योजनेच्या लाभार्थ्यांना वितरीत

 जप्त केलेली वाळू तत्काळ आवास योजनेच्या लाभार्थ्यांना वितरीत

महसूल प्रशासनाची गतिमान कार्यवाही

अमरावती, दि. 28 : चांदूर बाजार येथील महसूल पथकाने तालुक्यातील बेलुरा गढी येथे आज 42 ब्रास अवैध रेतीसाठा जप्त केला. आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत वाळू विनामूल्य देण्याची तरतूद आहे. त्यानुसार घरकुल लाभार्थ्यांना ही वाळू तत्काळ वितरितही करण्यात आली.

अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूकीला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या निर्देशानुसार विविध तालुक्यात महसूल पथकांकडून गतिमान कार्यवाही होत आहे. बेलुरा गढी येथे अवैध रेतीसाठा असल्याची माहिती मिळताच चांदूर बाजार तहसील पथकाने आज साडेदहाच्या सुमारास तिथे पोहोचून कारवाई केली. त्यात 42 ब्रास वाळू पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.

जप्त केलेली वाळू चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे पथकाने तुळजापूर गढी येथील ग्रामपंचायत सचिवांकडून घरकुल लाभार्थ्यांची यादी मिळवली. या यादीतील लाभार्थ्यांना उपलब्ध वाळूमधून त्यांच्या मागणीनुसार वाळू वितरित करण्यात आली. एकूण 17 लाभार्थ्यांना ही 42 ब्रास वाळू वितरित करण्यात आली.

प्रधानमंत्री आवास योजना व इतर राज्य पुरस्कृत आवास योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्तींना विनामूल्य पाच ब्रास वाळू मिळण्याची तरतूद आहे. त्यानुसार ही कार्यवाही झाली. पथकात उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्या मार्गदर्शनात ना. तहसीलदार प्रथमेश मोहोड, मंडळ अधिकारी एस. आर. धांडे, तलाठी अतुल पाटील, हरिष लळित, स्वप्नील पचारे यांचा समावेश होता.

वाळूचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक कुठेही होता कामा नये. उपविभागीय अधिका-यांनी स्वत: या बाबीचे संनियंत्रण करावे. भरारी पथकांनी सातत्याने निगराणी ठेवावी. तपासणी व कार्यवाहीत हयगय होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

०००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा