दिवाणखेड तेथील अमृत सरोवराच्या परिसरात योगदिन साजरा
योगाच्या माध्यमातून उपस्थितांना प्रसन्नतेची अनुभूती
अमरावती, दि. २१ : अमृत सरोवराचा निसर्गसुंदर परिसर, विस्तीर्ण जलाशय, पहाटेची आल्हाददायक हवा, निरामय शांततेत योग, प्रार्थना व ध्यानधारणा अशा चित्तवृत्ती उल्हसित करणाऱ्या वातावरणाचा प्रसन्न अनुभव आज उपस्थितांनी घेतला. तिवसा तालुक्यातील दिवाणखेड येथील अमृत सरोवर येथे जागतिक योगदिनाचे निमित्त साधून योगदिन साजरा करण्यात आला.
रोहयो उपायुक्त विजय भाकरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण जोशी, उपजिल्हाधिकारी राम लंके, तहसीलदार वैभव फरतारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनील जाधव, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास घोडके, गटविकास अधिकारी उज्ज्वला ढाले, नायब तहसीलदार आशिष नागरे, नरेंद्र कुरळकर, गोपाळ कडू, दिवाणखेडचे सरपंच बाळूभाऊ उईके यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, योगप्रेमी, ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी झाले होते. योग प्रशिक्षक अशोक बेंडे, राहूल दोडके, सचिन पांडे यांनी सहभागींना योगाचे धडे दिले. यावेळी प्राणायाम, श्वसनपद्धती, विविध आसनक्रियांची प्रात्यक्षिके करण्यात आली. विविध आसने, ध्यानधारणा, ओंकार, प्रार्थनेद्वारे प्रसन्नतेची अनुभूती उपस्थितांना यावेळी मिळाली.
रोहयो उपायुक्त श्री. भाकरे म्हणाले की, चांगल्या जीवनासाठी शरीर व मन दोन्ही सुदृढ असणे आवश्यक आहे. मन आणि शरीराचे संतुलन योगातून साधले जाते. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी सर्वांनी योगाचा अवलंब करावा.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरे निर्माण करण्यात येत आहेत. अमरावती जिल्ह्यातही 75 सरोवरे विकसित करण्यात येत असून, 42 ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. अमृत सरोवराचा परिसर पर्यावरणदृष्ट्या अत्यंत सुंदर, शांत, प्रसन्न असल्यामुळे योग साधना करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. हे लक्षात घेऊन आजचा जागतिक योगदान सरोवराच्या परिसरात साजरा करण्यात आला, असे उपजिल्हाधिकारी श्री. लंके यांनी यावेळी सांगितले. तिवसा तहसील कार्यालयाचे प्रशांत जायदे, बबलू ढोक, गुरूदेव गटरी, रितेश चेले, राजू चेले आदींनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
०००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा