बुधवार, २८ जून, २०२३

पेरणीची घाई करू नका; कृषी विभागाचा शेतकरी बांधवांना सल्ला

 पेरणीची घाई करू नका; कृषी विभागाचा शेतकरी बांधवांना सल्ला

अमरावती,दि. 28 : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांनी केले आहे.

अमरावती जिल्ह्यातील सरासरी 145.7 मि.मि. पर्जन्यमानाच्या तुलनेत दि. 27 जूनअखेर  54 मि.मि. अर्थात सरासरीच्या 37.1 टक्के पाऊस झाला आहे. मान्सूनच्या आगमनास विलंब व हवामान बदलामुळे सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या हवामान अंदाजानुसार दि. 2 ते 8 जुलै दरम्यान कमी पाऊस पडण्याची व पावसात खंड निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे.

 त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी घाई करु नये. सर्वसामान्यतः 80 ते 100 मिमि. पर्यत पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये. जमिनीत पेरणीसाठी योग्य ओल असल्याची खात्री करावी. पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. ज्या शेतक-यांनी पेरणी केली आहे, त्यांनी पिकांसाठी संरक्षित सिंचनाचा वापर करावा. जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादनासारख्या (मल्चिंग) तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन एसएओ श्री. सातपुते यांनी केले.

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा