जनगणना-2027 अंतर्गत पहिल्या टप्प्यास प्रारंभ ;
नागरिकांनी स्व-गणना उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा
अमरावती,दि. 27 : भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना 2027 अंतर्गत पहिला टप्पा अर्थात घर सूचीकरण व गृहनिर्माण जनगणना (House Listing & Housing Census) राज्यभर राबविण्यात येत आहे. हा राष्ट्रीय उपक्रम महत्त्वाच्या असून भविष्यातील नियोजन, धोरणनिर्मिती तसेच संसाधनांचे न्याय्य वितरण यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे.
महाराष्ट्र राज्यात या पहिल्या टप्प्यांतर्गत स्व-गणना कालावधी (Self-Enumeration Period) दि. 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत पार पडला असून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
यानंतर प्रत्यक्ष घरभेटीमार्फत गणना (Field Enumeration – House to House) दि. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या कालावधीत जनगणना अधिकारी, प्रगणक व पर्यवेक्षक नागरिकांच्या घरांना भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करतील.
जनगणना अधिनियम, 1948 व त्याअंतर्गत नियमांनुसार अचूक माहिती प्रदान करणे बंधनकारक असून नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नागरिकांना जनगणना 2027 उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जनगणना प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.
०००००


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा