यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या
उन्हाळी परीक्षा २७ मेपासून;
एआय-आधारित सीसीटीव्ही निगराणीखाली परीक्षा प्रक्रिया
अमरावती, दि. 21 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या उन्हाळी मे-जून २०२६ परीक्षांना २७ मेपासून प्रारंभ होत असून अमरावती विभागांतर्गत एकूण ८४ परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. परीक्षा शिस्तबद्ध, पारदर्शक व कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून यंदा अनेक महत्त्वपूर्ण आणि कठोर उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
कुलगुरू डॉ. राजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, परीक्षा नियंत्रक बटूप्रसाद पाटील तसेच विभागीय संचालक डॉ. जयंत वडते यांच्या सहकार्याने परीक्षा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.
यंदाच्या परीक्षेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सर्व परीक्षा केंद्रांवर प्रथमच एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय. या यंत्रणेचे नियंत्रण परीक्षा विभाग, नाशिक तसेच विभागीय केंद्रामार्फत ठेवण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यापासून ते उत्तरपत्रिका सीलिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही देखरेखीखाली राहणार असल्याने परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे. विद्यापीठाचा हा निर्णय सर्व स्तरांतून स्वागतार्ह मानला जात असून परीक्षा व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न मानला जात आहे.
मागील जानेवारी-२०२६ हिवाळी परीक्षेदरम्यान काही संवेदनशील केंद्रांवर अमरावती विभागीय केंद्रामार्फत ‘बैठे भरारी पथक’ संकल्पना राबविण्यात आली होती. या उपक्रमाबाबत विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, मे-जून २०२६ परीक्षेसाठी भरारी पथकांमध्ये प्राचार्य दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून नीट सेट व पीएचडी पात्रता धारकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सर्व पर्यवेक्षक व पथक सदस्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन त्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक व भरारी पथक सदस्यांच्या नियुक्त्यांना विद्यापीठाची पूर्वमान्यता घेण्यात आली असून परीक्षा आयोजनाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती अमरावती विभागाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार यांनी दिली आहे. उन्हाळी मे-जून २०२६ परीक्षा नियमबद्ध, पारदर्शक, शिस्तबद्ध आणि विद्यार्थीकेंद्रित तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर :
यंदाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये पारदर्शकता, शिस्त व कॉपीमुक्त वातावरण सुनिश्चित करण्यासाठी विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर प्रथमच एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचे थेट नियंत्रण नाशिक परीक्षा विभाग व विभागीय केंद्राकडून राहणार आहे.
प्रश्नपत्रिका डाउनलोडपासून ते उत्तरपत्रिका सीलिंगपर्यंत संपूर्ण परीक्षा प्रक्रिया या सीसीटीव्ही निगराणीखाली राहणार आहे. यामुळे कोणतीही अनियमितता होण्यास प्रतिबंध होऊन पारदर्शकता अधिक बळकट होईल.
या तांत्रिक उपाययोजनांमुळे परीक्षा व्यवस्थापन अधिक सक्षम, सुरक्षित व विश्वासार्ह होईल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा