बुधवार, १३ मे, २०२६

 

 मुरघास संयंत्र वाटप योजनेंतर्गत पशुपालकांकडून प्रस्ताव आमंत्रित

          अमरावती दि. 13 : पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिकतेची जोड देऊन पशुपालकांना उद्योजक बनवण्यासाठी शासनाकडून मुरघास संयंत्र वाटप ही महत्त्वपूर्ण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे पशुपालकांना मुरघास हार्वेस्टर व बेलर संयंत्रावर अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार असून, जास्तीत जास्त पात्र पशुपालक व शेतकरी समुहगटांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकाच वेळी चार ओळी हार्वेस्ट करणारे मुरघास हार्वेस्टर आणि मुरघास बेलर संयंत्र दिले जाणार आहे. या उपकरणाची मर्यादा 26 लाख रुपयांपर्यंत असून, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान (कमाल रु. 13 लाख) तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी 75 टक्के अनुदान (कमाल रु. 19.50 लाख) मिळणार आहे.

लाभार्थी पात्रता निकष : योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे पुढीलप्रमाणे बाबी असणे आवश्यक आहे. पशुपालकांकडे किमान 10 मोठे पशुधन किंवा 100 शेळ्या/मेंढ्या असणे आवश्यक, स्वत:चा किमान 50 HP चा ट्रॅक्टर असणे आवश्यक, निवडीमध्ये अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, वनहक्क धारक व महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाईल. दिव्यांगांसाठी 5 टक्के व महिलांसाठी 30 टक्के आरक्षण लागू असेल.  

या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी पशुपालकांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांचे पशुधन संख्या प्रमाणपत्र, ट्रॅक्टरचे आरसी कार्ड स्वत:च्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावे, बँकेचे कर्ज मंजुरी पत्र किंवा स्वनिधीतून खरेदी करणार असल्यास स्व-हिश्श्याची रक्कम बँक खात्यात असल्याचे एक महिन्याचे बँक स्टेटमेंट, दिव्यांग असल्यास UDID प्रमाणपत्र व बचत गट सदस्य असल्यास संबंधित प्रमाणपत्र.

निवड झालेल्या लाभार्थ्यांने जिल्हा उपायुक्तांनी कळवल्यापासून एका महिन्यात रकमेचा भरणा करणे आवश्यक राहील. मंजुरीनंतर 3 महिन्यांच्या आत संयंत्र खरेदी करणे बंधनकारक राहील. अन्यथा प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवाराला संधी दिली जाईल.

उपकरणाच्या किंमतीत निर्धारीत खर्चापेक्षा जास्त खर्च झाल्यास, फरकाची रक्कम लाभार्थ्यांला स्वत: भरावी लागेल. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाईल, याप्रमाणे अटी पूर्ण करणे अनिवार्य राहील.

‘वैरण विकास योजना’ अंतर्गत ‘मुरघास संयंत्र वाटप योजनेद्वारे उद्योजकता विकास करणे’ या योजनेमध्ये पुढीलप्रमाणे शेतकरी समुहगटाचाही समावेश करण्यात आला आहे. त्यात सहकार अधिनियम / धर्मादाय आयुक्त अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी उत्पादक संस्था /सहकारी संस्था, कंपनी कायदा, 2013 अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, आत्मा अंतर्गत (तालुका कृषि अधिकारी यांचे नोंदणी प्रमाणपत्र असलेला नोंदणीकृत संस्था शेतकरी समुह गट, महिला आर्थिक विकास महावितरण नोंदणीकृत समूह आधारीत संसाधन केंद्र (सामुदायिक व्यवस्थापित संसाधन केंद्र), उमेद अंतर्गत नोंदणीकृत प्रभाग संघ आदींचा समावेश राहील.

या योजनेंतर्गत लाभासाठी संस्थेचे किमान 50 शेतकरी सदस्य असावेत, संस्थेचे भागभांडवल / खेळते भागभांडवल किमान रु. 5 लक्ष असावे, संस्थेचे लगतच्या मागील 3 वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असावे, लेखापरीक्षण अहवालानुसार संस्था नफ्यात असावी, याप्रमाणे पात्रता आवश्यक आहे.

या योजनेंतर्गत प्राप्त होणारे लाभधारकांचे अर्ज विचारात घेऊन वरील समुह गटांना प्राधान्य देण्यात येईल. ‘वैरण विकास योजना’ अंतर्गत ‘मुरघास संयंत्र वाटप योजनेद्वारे उद्योजकता विकास करणे’ या योजनेमध्ये नमूद इतर अटी जसाच्या तशा लागू राहतील. ही योजना पशुपालकांना चारा टंचाईवर मात करण्यासाठी व स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुवर्णसंधी आहे. पात्र पशुपालक व शेतकरी समूह गटांनी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांचे कार्यालयाशी संपर्क साधून सर्व अटी व शर्तीची पूर्तता करत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा