आरोग्य विभागाची गरुडझेप : २८ बालकांना थॅलेसिमियामुक्त नवजीवन!
जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त ‘एचएलए’ तपासणी शिबिर संपन्न
अमरावती, दि. १२ : एका आईच्या डोळ्यांतील आनंदाश्रू, वडिलांच्या चेहऱ्यावर उमललेले हास्य आणि रक्ताच्या बाटल्यांपासून मुक्त झालेलं बालपण... हे सुखद चित्र आज अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामुळे साकार झाले आहे. 'जागतिक थॅलेसिमिया दिनाचे' औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरात अमरावती आरोग्य विभागाने थॅलेसिमियामुक्तीच्या दिशेने एक आशादायी पाऊल टाकले असून, आतापर्यंत २८ बालकांना यशस्वी बोन मॅरो ट्रान्सप्लांटद्वारे नवे आयुष्य मिळाले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील डे केअर युनिट आणि संकल्प इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त मोफत एचएलए (HLA) तपासणी शिबिर नुकतेच पार पडले. बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या तपासणीमुळे अनेक बालकांना भविष्यात थॅलेसिमियामुक्त जीवन जगण्याची नवी आशा मिळाली आहे. या शिबिरात २० बालकांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, ज्या रुग्णांना अधिक गुंतागुंतीच्या चाचण्यांची गरज आहे, त्यांचे नमुने जर्मनी येथे पाठवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याला मिळालेली नवसंजीवनी आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्प इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमाने थॅलेसिमियाशी झुंज देणाऱ्या कुटुंबांना नवआयुष्याची उमेद मिळाली आहे.
दरवर्षी 8 मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसीमिया दिन साजरा केला जातो. ‘थॅलेसीमिया’ हा एक आनुवंशिक रक्ताचा आजार आहे, जो आई वडीलांपासून मुलांना येतो. या आजाराचे लक्षण जवळपास 3 महिन्या नंतर कळून येतात. या आजारामध्ये बाळाच्या अंगात रक्ताची कमी होऊ लागते. जेणेकरून त्याला बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो. त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता येते. वारंवार रक्त द्यावे लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोह तत्त्व जमा होतं जे पुढच्या आयुष्यात हृदयासाठी प्राणघातक ठरू शकतं.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डे केअर युनिटमार्फत सीएमसी वेल्लोर, बंगळुरू, अहमदाबाद, SRCC मुंबई व इतर नामांकित रुग्णालयांमध्ये आतापर्यंत २८ बालकांचे यशस्वी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यात आले असून ही सर्व बालके आज निरोगी आणि थॅलेसिमियामुक्त आयुष्य जगत आहेत. या कृतीमुळे बालकांच्या पालकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि संकल्प इंडिया फाउंडेशनप्रती कृतज्ञता व्यक्त केली. थॅलेसिमियाविरुद्धची ही लढाई आता केवळ उपचारापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती अनेक निष्पाप बालकांना नवजीवन देणारी आशेची चळवळ बनली आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
आरोग्य विभागाची प्रभावी कामगिरी (सी.एस. डॉ. विनोद पवार यांचे कोट)
"राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्या संकल्पनेनुसार आम्ही जिल्ह्यात थॅलेसिमियामुक्तीसाठी कटिबद्ध आहोत. "थॅलेसिमियाग्रस्त बालकांसाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून, ती त्यांच्या आयुष्याला मिळालेली नवसंजीवनी आहे." - डॉ. विनोद पवार, जिल्हा शल्यचिकित्सक
--------------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डे केअर युनिटव्दारे आयोजित शिबिरात २४७ रुग्णांना अपंग प्रमाणपत्र तर ३५४ रुग्णांना SBTC कार्ड वितरित करण्यात आले. तसेच ६२ मातांची CVS तपासणी करण्यात आली, ज्याद्वारे ४६ बालके थॅलेसिमियामुक्त असल्याचे जन्मापूर्वीच निष्पन्न झाले. संकल्प इंडिया फाउंडेशनच्या टीमने २० रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांचे रक्तनमुने संकलित करून पुढील तपासणीसाठी बंगळुरू येथे पाठविले आहेत. आवश्यकतेनुसार काही रुग्णांना पुढील विशेष तपासणीसाठी जर्मनी येथे पाठविण्याची प्रक्रिया देखील करण्यात येणार, अशी माहिती हिमेटोलॉजी समुपदेशक मनोज सहारे यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. संदीप हेडाऊ सर (निवासी वैद्यकीय अधिकारी), डॉ. सोळंके सर (RMO), डॉ. मनीष पाडिया (संकल्प इंडिया फाउंडेशन, अकोला), डॉ. सोनाली शिरभाते मॅडम (बालरोग विभाग प्रमुख), डॉ. श्याम गावंडे (मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष) तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनोज सहारे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी त्रिशिला सरदार, डॉ. वासनकर मॅडम, डॉ. काबळे मॅडम (भौतिकोपचार), ललिता अग्रवाल (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), चव्हाण सिस्टर तसेच डे केअर युनिटच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
#आरोग्य

.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा