इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
सुरू
अमरावती,
दि. ५ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे तर्फे
घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) जून-जुलै २०२६ पुरवणी
परीक्षेसाठी आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले
आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेचा निकाल दि. २ मे २०२६ रोजी ऑनलाईन जाहीर
झाल्यानंतर ही पुरवणी परीक्षा जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणार आहे.
पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी
विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थी तसेच ITI विषय घेणारे विद्यार्थी
यांना या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in वर भरावीत, असे पुणे
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
नियमित शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची मुदत
५ ते १५ मे २०२६ असून, विलंब शुल्कासह
१६ ते २० मे २०२६ पर्यंत अर्ज करता
येणार आहे. महाविद्यालयांनी RTGS/NEFT द्वारे परीक्षा शुल्क २१ मे पर्यंत जमा करणे
आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांची यादी व प्रिलिस्ट २५ मे पर्यंत विभागीय मंडळाकडे
सादर करावी लागणार आहे.
अर्ज सबमिट केल्यानंतर
महाविद्यालयांना ‘कॉलेज लॉगिन’मधून प्रिलिस्ट उपलब्ध होणार असून, त्याची पडताळणी
करून विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या घेणे आवश्यक राहणार आहे. तसेच प्राचार्यांनी
प्रत्येक पानावर शिक्का व स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे.
ऑनलाईन अर्ज भरताना फेब्रुवारी-मार्च
२०२६ परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची माहिती स्वयंचलितपणे उपलब्ध होणार आहे.
श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सलग तीन संधी (जून-जुलै २०२६,
फेब्रुवारी-मार्च २०२७, जून-जुलै २०२७) दिल्या जाणार आहेत.
शुल्क भरण्यासाठी ICICI बँकेच्या
व्हर्च्युअल खात्यात NEFT/RTGS द्वारेच रक्कम जमा करावी लागणार असून, जुन्या बँक
चलनांचा वापर करता येणार नाही. तसेच रोख स्वरूपात शुल्क स्वीकारले जाणार नाही.
विहित शुल्क न भरल्यास
विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. तसेच अर्ज भरण्याच्या
मुदतीत कोणतीही वाढ दिली जाणार नसल्याचे मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी स्पष्ट
केले आहे.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा