भारताचा प्राचीन ज्ञानवारसा आता डिजिटल स्वरूपात ; 'ज्ञानभारतम्' मोहिमेचा देशभरात शुभारंभ !
विभागीय आयुक्तांकडून नागरिकांना सहभागाचे आवाहन
जिल्हानिहाय समन्वयकांची नेमणूक
हस्तलिखितांची माहिती नोंदविण्यासाठी ‘ज्ञानभारतम्’ मोबाईल ॲप
अमरावती, दि. 11 : भारताचा समृद्ध आणि मौल्यवान हस्तलिखितांचा वारसा जतन करण्यासाठी केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने ‘ज्ञानभारतम्’ ही महत्त्वाकांक्षी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत देशभरातून एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला 16 मार्च पासून सुरुवात झाली आहे. या मोहिमेत अमरावती विभागातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
भारताला हस्तलिखितांचा मोठा वारसा लाभलेला आहे. ही हस्तलिखिते विविध ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आहेत. हे सर्व ज्ञानभंडार एकत्र करून एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अंतर्गत हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार केला जाणार आहे. यात हस्तलिखितांचा 'राष्ट्रीय डिजिटल संग्रह' (National Digital Repository) तयार करण्यात येणार असून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या प्रक्रियेत हस्तलिखितांची मालकी ही मूळ संस्था, ग्रंथालय किंवा खासगी संग्राहक यांच्याकडेच राहणार आहे. मात्र, स्वखुशीने ही हस्तलिखिते शासनाकडे सुपूर्द करायची असल्यास शासन स्विकारणार आहे.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान आदींच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जाणार आहे. प्रकल्पासाठी राज्याची नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालयाची नियुक्ती करण्यात आली असून कवि कालिदास संस्कृत विद्यापीठ नागपूरला क्लस्टर केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहे. या केंद्राचे डॉ. राजेंद्र जैन (मो.9372071292) यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
या सर्वेक्षणासाठी ‘ग्यान भारतम्’ (Gyan Bharatam) हे विशेष मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. त्याद्वारे हस्तलिखितांचे मूल्यांकन, पडताळणी व दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याव्दारे संबंधित जिल्ह्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांची ज्ञानभारतम प्रकल्प जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित जिल्हा नोडल अधिकारी आणि जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून विविध मंदिरे, मठ, धार्मिक संस्था, विद्यापीठे, ग्रंथालये, शैक्षणिक संस्था व खासगी संग्राहकांना या मोहिमेत जोडून घेतले जात आहे. या मोहिमेत विद्यार्थी, संशोधक, पारंपरिक पंडित, एनसीसी आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
ज्ञानभारतम् मोहिमेकरीता जिल्हानिहाय नेमणूक केलेल्या नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकाऱ्यांची यादी व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे : अमरावती व अकोला जिल्ह्याकरीता श्री. दीपक पाटील (मो.9423102051) व डॉ. प्रशांत सोनवणे (मो.8600751897), वाशिम जिल्ह्यासाठी श्री. गजानन शेळके (मो.7767802263) व श्याम बोरकर (मो.9405500812), बुलडाणाकरीता गजानन शेळके व डॉ. प्रशांत सोनवणे तर यवतमाळ जिल्ह्यासाठी श्रीमती गीता सानगरवार (मो.9370150911) व श्याम बोरकर आदी अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहतील.
नागरिकांकडे अथवा संस्था, मंदिरे, ग्रंथालये किंवा खासगी संग्रहात जुनी हस्तलिखिते उपलब्ध असल्यास, त्याची माहिती ‘ग्यान भारतम्’ या मोबाईल अॅपवर अपलोड करावीत. या अमूल्य ज्ञानवारशाचे जतन करण्याच्या कार्यात नागरिक, संस्था आणि संशोधकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

%20(1).jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा