सोमवार, ४ मे, २०२६

 सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘टेक- वारी २.०’ अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताह कार्यक्रमात ‘टेक वारी तालरंग’ या वाद्यांच्या कार्यक्रमाने मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यांना मंत्रमुग्ध केले. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित तालरंग कार्यक्रमाच्या माध्यमातून ढोलकी-संबळच्या ठेक्याने परिसर दणाणून गेला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही ढोलकी, संबळ वाद्यांचा स्वरध्वनींचा आनंद घेतला. कलाकार निलेश परब (ढोलकी-संबळ वादक) आणि कृष्णा मुसळे (ढोलकी वादक) यांनी आपल्या सादरीकरणातून तालरंगाची रंगत अधिक खुलवली.

कार्यक्रमाची सांगता निलेश परब आणि कृष्णा मुसळे यांच्या ढोलकी वादनाच्या जुगलबंदीने झाली. या जुगलबंदीस उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त दाद दिली. टेक वारी २.० या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत टाळांच्या गजरात करण्यात आले. तर तालरंगची सुरुवात गणपती वंदनेने करण्यात आली. या कार्यक्रमात ढोलकी, ढोल, संबळ, बासरी आदी वाद्यांच्या सहाय्याने गोंधळ गीत, कोळीगीताच्या सादरीकरणातून उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले.
तालरंग या कार्यक्रमास मंत्रालयातील विविध विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा