आयआयएचटी बरगढ व वेंकटगिरी येथे हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशाबाबत सुचना जारी
१० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
अमरावती, दि. ८ : केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेत (IIHT) सन २०२६-२७ या शैक्षणिक सत्रासाठी तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या (Diploma in Handloom and Textile Technology) प्रथम सत्राच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील पात्र उमेदवारांकडून १० जून २०२६ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
महाराष्ट्र राज्यासाठी ओडिशा राज्यातील बरगढ येथील भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेत १३+१ जागा उपलब्ध असून, आंध्र प्रदेशातील वेंकटगिरी येथील संस्थेसाठी २ जागा काउन्सिलिंग प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. या प्रवेश प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले परिपूर्ण अर्ज प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई व औरंगाबाद कार्यालयामार्फत सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० जून २०२६ असून अर्ज कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत.
अर्जाचा नमुना, पात्रता निकष तसेच इतर आवश्यक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावरही माहिती प्रदर्शित करण्यात आली असल्याचे वस्त्रोद्योग विभागाव्दारे कळविण्यात आले आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत क्र. २, ८ वा माळा, ‘बी’ विंग, सिव्हील लाईन्स, नागपूर -४४०००१ येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी दूरध्वनी ०७१२-२५३७९२७ यावर संपर्क साधावा विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून या व्यावसायिक शिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाव्दारे करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा