बुधवार, २७ मे, २०२६

 

राष्ट्रीय खत विक्री आराखड्यांतर्गत आयएफएमएस व ॲग्रीस्टॅक प्रणालीचे एकत्रीकरण

खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता वाढणार
खतांच्या मागणीसाठी सोईचे ॲप उपलब्ध होणार
अमरावती, दि. २७ : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा (National Fertilizer Sale Framework) प्रकल्पांतर्गत IFMS व AgriStack प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात येत असून, खत विक्री प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुलभता व शेतकरी हित साध्य करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र शासनामार्फत “Fertilizer Sale Application System (FSAS)” हे मोबाईल आधारित अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना QR कोडद्वारे खतांचे ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. शेतकऱ्यांनी केलेले QR कोड आधारित बुकिंग तीन दिवसांसाठी वैध राहणार असून, संबंधित शेतकरी त्यांच्या सोयीनुसार निवडलेल्या खत विक्रेत्याकडे जाऊन खत खरेदी करू शकतील. अशी माहिती कृषी संचालक सुनील बोरकर यांनी एका पत्राद्वारे दिली आहे.
या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच, आवश्यक त्या खतांचे आगाऊ बुकिंग करता येणार असल्याने दुकानदारांकडून इतर अनावश्यक खतांची सक्ती होण्याची शक्यता कमी होणार आहे. परिणामी, खत विक्री प्रक्रियेत अधिक सुलभता व पारदर्शकता निर्माण होणार आहे.
सद्यस्थितीत विविध दुकानांमध्ये खतसाठा उपलब्ध आहे अथवा नाही, याबाबत शेतकऱ्यांना अचूक माहिती उपलब्ध होत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. नव्या प्रणालीमुळे खत उपलब्धतेची माहिती वेळेवर मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचण्यास मदत होणार आहे.
या नव्या वितरण प्रणालीची केंद्र शासनाच्या तज्ज्ञ पथकाने पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील अष्टापूर येथे यशस्वी चाचणी केली आहे. तसेच, राज्यातील कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांची केंद्र शासनाने पथदर्शी प्रकल्पासाठी निवड केली असून, खरीप हंगामापासून “Fertilizer Sale Application System” प्रणालीद्वारे खत विक्रीस प्रारंभ करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे खत वितरण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होऊन शेतकऱ्यांना अधिक पारदर्शक, सुलभ व वेळेवर सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे कृषी आयुक्तालयाद्वारे कळविण्यात आले आहे.
See less

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा