महाराष्ट्रातील मागील पाच वर्षांत टँकरद्वारे #पाणीपुरवठा करावा लागलेल्या पाणी टंचाईग्रस्त गावांचा #जलयुक्तशिवारअभियान ३.० मध्ये प्राधान्याने समावेश करून या गावांमध्ये जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृद व जलसंधारण व्यवस्थापन संदर्भात वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत दिले.
बैठकीस मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यातील जलसंधारणाची कामे, जलस्रोतांचे बळकटीकरण तसेच विविध विभागांच्या समन्वयातून जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
राज्यातील सूक्ष्म #पाणलोट क्षेत्रांचा विकास आणि जलस्रोतांचे बळकटीकरण याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. ज्या प्रकल्पांची कामे निश्चित करण्यात आली आहेत, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. या कामांना प्राधान्याने गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे. त्यामुळे जलसंधारणाची कामे अधिक परिणामकारकपणे आणि थेट पद्धतीने पूर्ण करता येतील, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मागील पाच वर्षांत ज्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला, अशा गावांचे विशेष सर्वेक्षण करून त्यांना जलयुक्त शिवार अभियान ३.० मध्ये प्राधान्य द्यावे. या गावांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन जलसंधारणाची कामे निश्चित करावीत. जलस्रोतांच्या बळकटीकरणामुळे निर्माण झालेला सकारात्मक परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जलसंधारणाशी संबंधित यशकथा तयार करून त्यांचा प्रभावी प्रसार करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
#जलसंधारण


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा