मराठी माणसाच्या जीवनातील संघर्ष, वास्तव, मर्यादा, दुःख आणि आनंद हे अशोक सराफ यांच्या कलाकृतींमध्ये दिसतात. सर्वसामान्यांच्या जीवनातील या भावभावनांना त्यांनी आपल्या अभिनयातून हास्याची आणि आनंदाची किनार दिली. मराठी सिनेमा खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करून या सिनेमाला वेगळी उंची प्राप्त करून देण्याचे कार्य अभिनेते अशोक सराफ यांनी केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ज्येष्ठ चित्रपट अभिनेते महाराष्ट्रभूषण पद्मश्री अशोक सराफ यांचा नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात नागरी सत्कार करण्यात आला. नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धीविनायक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कायर्क्रम आयोजित करण्यात आला.
महापौर नीता ठाकरे, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष, माजी आमदार संदीप जोशी, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यावेळी उपस्थित होते.
अशोक सराफ यांच्यासारखे कलाकार लाभणे ही मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कलेचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आजचा नागरी सत्कार हा नागपूरकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आजच्या इतका भव्य सत्कार माझा आजवर झाला नाही, पण प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही आहोत, अशी भावना सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
प्रारंभी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी सराफ यांची प्रकट मुलाखत घेतली.
#महाराष्ट्रभूषण
#अशोकसराफ
#नागरीसत्कार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा