शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२६

 

शासकीय योजनांतून आदिवासींचा संपूर्ण विकास साधणार - महसूल मंत्री तथा 

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पालकमंत्र्यांच्या हस्ते जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहाचा शुभारंभ

निमकुंड गावाच्या विकासाठी ४ कोटी निधींची घोषणा

पालकमंत्र्यांनी अशोक आठवले यांच्या घरी केला दिवाळीचा फराळ



अमरावती, दि. 12 : निमकुंडसह मेळघाटातील सर्व #आदिवासी कुटुंबापर्यंत क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंती निमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवा सप्ताहात केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पोचविण्यात येणार आहे.निमकुंड गावासाठी ३.४४ कोटी खर्चातून पिण्याच्या पाण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात येईल व ५० लाखांच्या निधीतून या गावात विविध विकास कामे राबविण्यात येतील असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.



या गावातील अशोक चिताराम आठवले यांच्या घरी पालकमंत्र्यांनी दिवाळीचा फराळ केला व शेतकऱ्यांसोबतच शासन आदिवासींच्या पाठीशीही खंबीरपणे उभे असल्याचा संदेश त्यांनी दिला.

अचलपूर तालुक्यातील दुर्गम व आदिवासी निमकुंड गावात पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून गृहोपयोगी साहित्याचे वाटप केले आणि जिल्ह्यात 'जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहा'चा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला.यावेळी आमदार सर्वश्री प्रवीण पोटे,केवलराम काळे, प्रवीण तायडे,अचलपूरच्या नगराध्यक्ष रुपाली माथने,निमकुंडच्या सरपंच रत्ना नागले, उपसरपंच अनिल अकोले,जिल्हाधिकारी आशिष येरेकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, पोलीस अधीक्षक निकेतन कदम आदी यावेळी उपस्थित होते.




पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांनी त्याग, संघर्ष आणि स्वातंत्र्य लढ्यातील अतुलनीय योगदानातून आदिवासी समाजा समोर मोठा आदर्श निर्माण केला आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध कल्याणकारी योजना आखल्या आहेत.या योजनांचा लाभ प्रत्येक आदिवासी कुटुंबापर्यंत पोचविण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करीत आहे.११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह साजरा होत असून या सप्ताहात निमकुंडसह मेळघाटातील सर्व आदिवासी गावांमध्ये शासनाच्या सर्व योजना पोचविण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

00000

#भगवानबिरसामुंडा #जनजातीयगौरवदिन

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा