रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६


गडचिरोली

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त #गडचिरोली येथे आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या २४६ विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील २२ आश्रमशाळा व वसतिगृहांशी संबंधित सुविधांचाही समावेश आहे. पीएम जनमन आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना घरे, पाणी, वीज, रस्ते, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

लोकार्पण करण्यात आलेले प्रकल्प : ३८ एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS), १ आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्र (TMMC) आदिवासी संशोधन संस्थेची इमारत, इटानगर रोपुइलियानी आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालय, १८ आश्रमशाळा प्रकल्प, २ क्षमता विकास केंद्रे (Centres of Competence), पायाभूत सुविधा प्रकल्प (३ बहुउद्देशीय केंद्रे – MPC आणि ९ अन्य पायाभूत सुविधा प्रकल्प), PM-JANMAN अंतर्गत १०० बहुउद्देशीय केंद्रे (MPCs)

भूमिपूजन करण्यात आलेले प्रकल्प : १९ एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS), १२ आदिवासी बहुउद्देशीय विपणन केंद्रे (TMMCs), २२ आश्रमशाळा प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्प (६ वसतिगृहे आणि १४ अन्य पायाभूत सुविधा प्रकल्प)

या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुएल ओराम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वूईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या.

नक्षलवादाच्या छायेतून बाहेर पडत आदिवासीबहुल भाग विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत आहेत. दुर्गम भागांपर्यंत शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पायाभूत सुविधा पोहोचवून आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यावर शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. 

पीएम जनमन आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना घरे, पाणी, वीज, रस्ते, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा येथील तीन आदिवासी लाभार्थ्यांशी संवाद साधून शासकीय योजनांमुळे त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती घेतली.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आदिवासी समाजाचा विकास करताना त्यांची संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि स्वाभिमान जपण्याची आवश्यकता अधोरेखित केली. शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि उपजीविकेच्या समान संधी उपलब्ध करून देतानाच पारंपरिक लोककला, नृत्य, संगीत व हस्तकलेचे संवर्धन करावे, असे आवाहन राज्यपाल वर्मा यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीची नक्षलग्रस्त जिल्हा ही जुनी ओळख बदलत असून जिल्हा विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात पहिला ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. जिल्ह्यातील खनिज संपत्तीच्या आधारे गडचिरोलीला देशाची प्रमुख स्टील सिटी म्हणून विकसित करण्याचा शासनाचा संकल्प असून औद्योगिक गुंतवणूक, रोजगार, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र, जल, जंगल आणि जमिनीचे संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आदिवासी गावांच्या स्वशासनासाठी पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुएल ओराम यांनी आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीला देशातील प्रमुख स्टील हब बनविण्यासाठी उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यात येणार असल्याचे सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकलव्य निवासी शाळा, आश्रमशाळा आणि उच्च शिक्षणाच्या सुविधा विकसित करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या सोहळ्यात यवतमाळचे कोलाम आदिवासी लाभार्थी कृष्णा टेकाम यांनी पीएम जनमन अभियानातून मिळालेल्या पक्क्या घरामुळे जीवनात झालेला बदल सांगितला. गुजरातमधील वजीरभाई कोतवालिया यांनी बांबू हस्तकलेच्या प्रशिक्षणातून उत्पन्नात झालेली वाढ, तर तेलंगणातील सबावत अन्वेष याने एकलव्य निवासी शाळेतून शिक्षण घेऊन आयआयटी कानपूरमध्ये मिळविलेल्या प्रवेशाचा अनुभव कथन केला. हे अनुभव आदिवासी समाजाच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचे प्रधानमंत्र्यांनी नमूद केले.

आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, शौर्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाला राष्ट्रीय सन्मान मिळवून देण्यात जनजातीय गौरव दिनाचे महत्त्व असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी प्रास्ताविकात सांगितले. 

यावेळी #भगवानबिरसामुंडा यांच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक आदिवासी नृत्य आणि जनजातीय गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा