विशेष वृत्त
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी
वाशिम, दि. ११ जुलै (जिमाका): राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' जाहीर केली आहे. या योजनेमुळे वाशिम जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ मधील लाभार्थी शेतकऱ्यांना यापूर्वी असलेली ५० हजारांची कर्जमाफीची मर्यादा रद्द करून आता २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या लाभासाठी २०२६-२७ चा नियम लागू होणार नसल्याने अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि इतर पिकांचे उत्पादन घेणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारभावातील अनिश्चिततेमुळे आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून नव्या हंगामासाठी आर्थिक बळ देणारा ठरणार आहे.
कर्जमाफीमुळे पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड सुलभ होण्यास मदत होईल. तसेच बियाणे, खते, कीडनाशके आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक आर्थिक क्षमता निर्माण होईल. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शासनाकडून योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा सविस्तर शासन निर्णय, लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवून आवश्यक तयारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' ही राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी महत्त्वाकांक्षी योजना ठरणार असून, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला नवसंजीवनी देण्यास ती निश्चितच उपयुक्त ठरेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा