बुधवार, ८ जुलै, २०२६

 

विशेष वृत्त 


‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या लाभासाठी महत्त्वाचे पाऊल

फार्मर आयडी, आधार संलग्नीकरण आणि पीक कर्ज खात्याची माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहन


वाशिम,दि.७ जुलै (जिमाका)राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी अॅग्रीस्टॅक (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी तयार करणे तसेच आवश्यक माहिती अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर आयडी तयार करून घ्यावा आणि पीक कर्ज खाते आधारशी संलग्न असल्याची खात्री करावी.

अॅग्रीस्टॅक ही शेतकऱ्यांची डिजिटल माहिती प्रणाली असून, यामध्ये शेतकऱ्याची ओळख, जमिनीची माहिती आणि इतर आवश्यक तपशील एकत्रित स्वरूपात उपलब्ध राहतात. यामुळे विविध कृषी योजनांमधील लाभार्थ्यांची पडताळणी अधिक सुलभ होते आणि योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येते.

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'चा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचावा, यासाठी पीक कर्ज खाते आधारशी संलग्न असणे, आधार व मोबाईल क्रमांक अद्ययावत असणे आणि अॅग्रीस्टॅकअंतर्गत फार्मर आयडी तयार असणे उपयुक्त ठरणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केलेली नाही, त्यांनी जवळच्या महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत स्तरावरील सुविधा केंद्र, संबंधित बँक शाखा किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी.

राज्य शासनाच्या कृषी क्षेत्रातील डिजिटल उपक्रमांना बळकटी देतानाच शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा, यासाठी प्रत्येक पात्र शेतकऱ्याने अॅग्रीस्टॅक नोंदणी, फार्मर आयडी निर्मिती आणि पीक कर्ज खाते आधारशी संलग्न करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा