गुरुवार, १ मे, २०२५
शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह प्राधान्याने उभारावेत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
अमरावती, दि. १ : शासनाचा शाळांमधील पटसंख्या वाढवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ही पटसंख्या वाढवताना दर्जेदार शिक्षणासोबतच शाळांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ प्रसाधनगृहे, ई सुविधा प्राधान्याने उभारावीत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, शिक्षणाधिकारी अनिल मोहोरे, प्रिया देशमुख आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. भुसे म्हणाले, विद्यार्थ्यांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपल्याकडे भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. काही ठिकाणी यात सुधारणा कराव्या लागतील. यासाठी आवश्यक असणारा निधी उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना, सीएसआर फंड, तसेच नागरिकांच्या योगदानातून शाळांना आवश्यक असणाऱ्या सोयी उपलब्ध कराव्यात. रोजगार हमी योजनेतून शाळांना संरक्षक भिंती, वृक्ष लागवड करण्यात यावी.
राज्यभर आयडॉल शिक्षकांशी संवाद साधण्यात येत आहे. यातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमधील शिक्षक नावीन्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. विविध क्रीडा, कला आणि स्पर्धा परीक्षांमध्येही विद्यार्थी यश प्राप्त करीत आहेत. ही परंपरा कायम राहावी, यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाची उत्कृष्ट सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यावर्षीपासून सीबीएससी शाळांमधील चांगल्या गोष्टींचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या शाळा भेटीमधून शाळांच्या छोट्या समस्या निकाली निघू शकतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नियमितपणे भेटी द्याव्यात. या भेटीमधून शाळांमध्ये सुधारणा घडवून आणाव्यात. शाळांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी पालकांचा सहभाग जाणीवपूर्वक घेण्यात यावा. शिक्षकांना जागतिक पातळीवरील ज्ञानाच्या पद्धती अभ्यासण्यासाठी विदेश दौरे आयोजित करण्यात येतात. येत्या काळात शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधील प्रतिनिधींचाही यात समावेश केला जाईल. त्यामुळे शिक्षणविषयक प्रशिक्षण देताना लाभ होईल.
येत्या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करतील. तसेच राज्यभरातील प्रत्येक अधिकारी एका शाळेत उपस्थित राहणार आहेत. या शाळा संबंधित अधिकाऱ्यांना दत्तक दिल्या जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून शाळांमधील प्रश्न, समस्या सोडविण्यात येणार आहे. राज्यभरातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, असे अमुलाग्र बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
००००००
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन
अमरावती, दि. 1: जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या स्थापनानिमित्त आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, सूचना प्रसारण अधिकारी मनिष फुलझेले, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, नगर प्रशासन अधिकारी सुमेध अलोणे, तहसिलदार निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000
शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा ६६ वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
अमरावती , दि. १ : शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने पोलीस मुख्यालय, अमरावती शहर परेड मैदान येथे मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे बोलत होते .
विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नागरिकांना मार्गदर्शन करण्यापूर्वी श्री. भुसे यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री. भुसे म्हणाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून आतापर्यंत पावणे तीन लाख शेतकऱ्यांना १ कोटी ६५ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून ८६ शेतकऱ्यांना १ कोटी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
राज्य शासनाने पारदर्शी आणि गतिमानतेचे धोरण स्वीकारले आहे. सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा मिळाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजाचे समाधान शिबिर राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने 'संवाद' हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. हा प्लॅटफॉर्म नागरिकांना समस्या मांडण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. जिल्हा प्रशासनाला 'मिशन 28 मेळघाट ' आणि महिला व बाल संरक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ही बाब प्रशंसनीय आहे. अमरावतीच्या विकासासाठी विमानतळ सुरू झाले आहे. याशिवाय या ठिकाणी दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शहरात वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करून यावर्षीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे .
राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा विहित वेळेत मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या १५ ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व शासकीय सेवा ऑनलाईन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सध्या सेवा हमी विधेयकाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.
सौर ऊर्जा प्रकल्पांवर भर देण्यात येत आहे. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेत जिल्ह्यात १० हजार २७३ ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत, ज्यामुळे ४३.७३ मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता निर्माण झाली आहे.
राज्यात नवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात झाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कार्यवाही करत, राज्य अभ्यासक्रमात सीबीएसईच्या चांगल्या गोष्टींचा समावेश केला जाणार आहे. शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगावा, असे आवाहन श्री. भुसे यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळा
विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . श्रुतिका औगड व उन्नती ओगले ( गोल्डन ॲरो चाचणी परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल), अक्षय पंत (प्रामाणिकपणा व सचोटी ), योगेश ठाकरे (फायरमन), सय्यद अन्वर सै अकबर (लीडिंग फायरमन), प्रीती ठाकरे ( अवैध गौण खनिज विरुद्ध कार्यवाही), पोलीस आयुक्तालयातील दिनेश नेमाडे, अली खुर्शीद अली सय्यद, विनोद सिंग चव्हाण, संगीता सिरसाम यांना उत्कृष्ट कार्याबाबत गौरविण्यात आले.
प्रारंभी विविध शासकीय विभागामार्फत परेड संचलन करण्यात आले. मंत्री श्री. भुसे यांनी परेड संचलनाचे निरीक्षण केले. परेडचे संचलन परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे, राखीव पोलीस निरीक्षक श्रीधर गुळसुदरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन देशमुख यांनी केले.
मुख्यमंत्री सहायता कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत आणि मदत कक्षाचे उद्घाटन
मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत आणि मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांना मदत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या सहायाची माहिती देण्यात आली.
**
प्रशासकीय गुणांकनात महिला व बालविकास विभाग प्रथम क्रमांकावर - महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
प्रशासकीय गुणांकनात महिला व बालविकास विभाग प्रथम क्रमांकावर
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई दि. 1 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून व संकल्पनेतून शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी राबविलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रम अंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविकेची, प्रत्येक लाभार्थिनीची आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची कर्तव्यनिष्ठा आहे. सर्व सहकारी, महिला व बालविकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री. कैलास पगारे, महिला व बाल विकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे, जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या योगदानाने हे उद्दिष्ट गाठता आले असल्याचे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.
भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत वेबसाईट कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा-सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करून विभागाने 80 टक्के गुण प्राप्त केले असल्याची माहिती त्यांनी दिली.
विभागाची वेबसाइट कंटेंट मॅनेजमेंट सिस्टमचा वापर करून विभागाच्या सर्व योजनाही अद्यावत करण्यात आल्या आहेत, तसेच माहितीचा अधिकार अंतर्गत देखील सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळाचे सिक्युरिटी ऑडिट, त्याचबरोबर Right to Service Act खाली अधिसूचित सेवांची यादी, केंद्र शासनाशी संपर्क साधून 13 हजार 11 मिनी अंगणवाडी केंद्रांचे अंगणवाडीत रूपांतर करण्यात आले आहे. तसेच 9 हजार 664 अंगणवाडी केंद्रांना शौचालयाची व्यवस्था पुरवण्यात आली, केंद्र सरकारच्या प्रशिक्षणाच्या धोरणानुसार 37 हजार अंगणवाडी सेविकांना "पोषण भी, पढाई भी" चे प्रशिक्षण व FSSAI चे प्रशिक्षण दिले आहे. नवीन 10 one stop centre ला मान्यता देण्यात आली आहे. केंद्राने दिलेल्या सर्व लक्षांक महाराष्ट्र शासनाने पूर्ण करून पोषण पखवाडीमध्ये महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळवला. 17 हजार 254 अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. 13 हजार 595 अंगणवाडी केंद्रांचे सक्षम अंगणवाडी केंद्रामध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्याचबरोबर दत्तक प्रक्रियेमध्ये 537 बालके कायदेशीररित्या हस्तांतर करुन देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त निधीतून कार्यालयीन कामकाजाबाबत स्वच्छता, तक्रार निवारण, जुन्या वाहनाचे निर्लेखन, जुन्या दस्तऐवजांचे निर्लेखन, कार्यालयीन सोयीसुविधा यावर लक्ष देत कामात सुधारणा करण्यात आली आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमतेसाठी प्रोत्साहन देण्यात आले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. UCDC व महिला व बालविकास भवन यासारखे देखील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. असे विविध उपक्रम राबवून व दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून सांघिक कार्याने महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम ठरला असल्याचे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.
0000
महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनी विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व मानवंदना
महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनी
विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व मानवंदना
अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनोत्सवा निमित्त अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. विभागीय आयुक्तांनी यावेळी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, उपायुक्त (साप्रवि) अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त सुशील आग्रेकर, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार मधुकर धुळे, श्याम देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
00000
भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ (वेव्हज) चे प्रधानमंत्री यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
मुंबई, दि. १ : भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे यशाचे दार उघडले जात असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात ‘वेव्हज’ परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.
भारतीय चित्रपट आता जगभरात सर्वदूर पोहोचले आहेत. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात. परदेशातील प्रेक्षक भारतीय चित्रपट केवळ बघत नाहीत, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक विदेशी प्रेक्षक आता सबटायटल्ससह भारतीय कंटेंट पाहतात हे भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. भारत आज फिल्म प्रॉडक्शन, डिजिटल कंटेंट, गेमिंग, फॅशन आणि म्युझिक यांचे जागतिक केंद्र बनले असल्याचे श्री.मोदी यांनी यावेळी सांगितले.
मानवाला यंत्र न बनू देता अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवणे गरजेचे - नरेंद्र मोदी
आपल्याला माणसाला यंत्र बनू द्यायचे नाही, तर त्याला अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवायचे आहे. माणसाची प्रगती केवळ माहिती, तंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही तर त्यासाठी संगीत, कला, नृत्य यांना सुद्धा महत्त्व द्यावे लागेल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी केले. क्रिएटिव्ह व्यक्ती त्यांच्यातील ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे आपल्यातील सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त करून जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह लोकांनी भारताला सर्जनशीलतेचे केंद्र बनविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आज जग नवीन पद्धतीने कथा, संकल्पना सांगण्याचा मार्ग शोधत आहे. अशा वेळी भारताकडे हजारो वर्षांचा जागतिक स्वरूपाचा कथा, संकल्पनांचा अमूल्य ठेवा असल्याचा उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी केला. या खजिन्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे आणि येणाऱ्या पिढीसमोर त्याचे सादरीकरण नव्या व रंजक पद्धतीने करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भारत सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. आजच्या डिजिटल युगात, आशय (कंटेंट) कोणत्याही वस्तूपेक्षा वेगाने प्रवास करतो.या सगळ्यात महाराष्ट्र या क्रांतीच्या अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. भारत आता सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. वेव्हज परिषद हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर ही एक चळवळ असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून ही महाराष्ट्रात साकार होत असल्याचे ते म्हणाले.
आज डिजिटल आशय, संगीत, अॅनिमेशन, गेम्स याला जागतिक स्तरावर आकार दिला जात आहे. राज्य शासन या परिवर्तनाला पोषक वातावरण तयार करत असून यासाठी सक्षम धोरण राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, ५०० एकर क्षेत्रफळ असलेली मुंबईतील चित्रपट नगरी आता पुढील पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टमसाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित केली जात आहे. यातील १२० एकरमध्ये माध्यम व करमणूक शहर उभारण्यात येऊन यात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंगवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईत साकारणार आयआयसीटी - माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संस्थेच्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.
अभिनेते अनुपम खेर यांनी प्रस्तावनेद्वार वेव्हज आयोजनाचा उद्देश सांगितला. एम.एम.किरवाणी, श्रेया घोषाल, मांगली यांनी स्वागत गीत सादर केले. तर, वेव्हज सल्लागार मंडळाचे सदस्य मोहनलाल, हेमामालिनी, कार्तिक आर्यन, एस.एस.राजामौली, रजनीकांत, अनिल कपूर, भूमी पेडणेकर, रणबीर कपूर, आमिर खान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अडोबी चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु नारायण आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गुरुदत्त, श्रीमती पी.भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक, सलील चौधरी यांच्या भारतीय सिनेमा मधील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
000
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हुतात्म्यांना अभिवादन भारताच्या निरंतर विकासामध्ये महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह राज्याच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राला सातत्याने पुढे नेण्याचा निर्धार आहे. राज्याला ट्रिलियन डॉलर ईकॉनॉमी करण्याचा संकल्प आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा आहे, असा निर्धार आणि निश्चय महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करत असल्याची भावना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले. याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी कार्यरत अधिकारी, कर्मचारी व पोलीस दलातील अधिकारी, जवान उपस्थित होते.
0000
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग
गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन
मुंबई, दि 1 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन आज जाहीर करण्यात आले. यामध्ये महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला आहे.
भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) मार्फत या मोहिमेचे मूल्यांकन करण्यात आले. वेबसाईट कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले की , "ही मोहिम म्हणजे केवळ व्यवस्थापन नाही, तर उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि लोकहितासाठी कार्यक्षम प्रशासनाचे प्रतिबिंब आहे. या उत्कृष्ट अधिकाऱ्यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे."
शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे (78%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित 196 उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील.
एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.
या मूल्यमापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालय, अधिकारी यादी पुढीलप्रमाणे, कंसात टक्केवारी दिली आहे.
सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी
ठाणे (९२.००), नागपूर (७५.८३), नाशिक (७४.७३), पुणे (७४.६७), वाशिम (७२.००)
सर्वोत्तम महापालिका आयुक्त
उल्हासनगर (६५.२१), पिंपरी-चिंचवड (६५.१३), पनवेल (६४.७३), नवी मुंबई (६४.५७)
सर्वोत्तम पोलिस आयुक्त
मीरा भाईंदर (६८.४९), ठाणे (६५.४९), मुंबई रेल्वे (६३.४५)
सर्वोत्तम विभागीय आयुक्त
कोकण (७५.४३), नाशिक (६२.२१), नागपूर (६२.१९)
सर्वोत्तम पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक/उपमहानिरीक्षक
कोकण (७८.६८), नांदेड (६९.८७)
सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग
महिला व बाल विकास (८०.००), सामाजिक न्याय विभाग (७७.९४), कृषी (६६.५४), ग्रामविकास (६३.५८), परिवहन व बंदरे (६२.२६)
सर्वोत्तम आयुक्त / संचालक
संचालक, तंत्र शिक्षण (७७.१३), आयुक्त, जमाबंदी (७२.६६), आदिवासी विकास (७२.४९), राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (७०.२८), वैद्यकीय शिक्षण (६८.५३)
सर्वोत्तम जिल्हाधिकारी
चंद्रपूर (६८.२९), कोल्हापूर (६२.४५), जळगाव (६०.६५), अकोला (६०.५८), नांदेड (५६.६६)
सर्वोत्तम पोलिस अधीक्षक
पालघर (७०.२१), जळगाव (६०.००), नागपूर ग्रामीण (६०.००), गोंदिया (५६.४९), सोलापूर ग्रामीण (५६.००)
या यादीत चंद्रपूर, ठाणे, पुणे, उल्हासनगर, मीरा भाईंदर, पालघर, गोंदिया, नांदेड, कोल्हापूर, अकोला यांसारख्या जिल्ह्यांतील कार्यालयांनी लक्षणीय गुण मिळवत इतरांसमोर उत्तम आदर्श ठेवला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की "या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. गुणवत्ता मोहिम एक सुरूवात आहे. भविष्यातील महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी ही एक आदर्श कार्यपद्धती ठरेल. नागरिकांना जीवन सुखकर करण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे चळवळीत रुपांतर होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
00000
'विकसित भारता'च्या निर्माणासाठी प्रगत महाराष्ट्र घडवूया - राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिन सोहळा शिवाजी पार्क येथे संपन्न
मुंबई, दि. 1: राज्यातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी आणि विकसित राष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. भारताच्या अमृत काळामध्ये भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याचे ध्येय साध्य करताना महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे असेल. महाराष्ट्राला आधुनिक, बलशाली आणि प्रगत राज्य बनविण्यासाठी आपण सर्वांनी काम करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, बृहन्मुंबई आयुक्त भूषण गगराणी,पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, शासनाच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मल्लिकार्जुन प्रसन्न, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे प्रधान सचिव, वरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारी, तिन्ही सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळ राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायनाने मानवंदना देण्यात आली.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करीत राज्यपाल म्हणाले, राज्य शासनाने काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. राज्य शासनाने सर्व विभागांना लोककल्याणकारी लक्ष केंद्रित करणारे उपक्रम जलद गतीने राबविण्यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले असून यामध्ये समाविष्ट बाबींमध्ये विभागांनी समाधानकारक काम केले आहे.
सुरक्षित व उद्योगस्नेही महाराष्ट्र
राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा मंडळ तसेच महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण व कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण विकसित करण्यासाठी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत राज्य शासनाने 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांच्या 63 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारांमुळे राज्यात 15 लाख 95 हजार 960 रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
स्टील, माहिती तंत्रज्ञान, हरीत ऊर्जा, ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रिक वाहने, वस्त्रोद्योग, डेटा सेंटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश आणि संरक्षण, जैवतंत्रज्ञान, औषध निर्मिती, पायाभूत सुविधा, ड्रोन उत्पादन, शिक्षण आदी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तेथे नऊ स्टील उत्पादन प्रकल्पांना देकारपत्रे दिली आहेत. या उपक्रमामुळे एक लाख 60 हजार 238 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि जवळपास 50 हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्यात 78 उद्योग घटकांना देकारपत्रे देण्यात आली असून त्यामुळे सुमारे सहा लाख 55 हजार 84 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे दोन लाख 47 हजार 400 लोकांना रोजगार मिळणार आहे, असेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.
कल्याणकारी योजनांचा लाभ आणि शेतकऱ्यांना दिलासा
राज्यपाल म्हणाले, प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी कुटुंबास राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. अडचणीमध्ये आलेल्या धान उत्पादक नोंदणीकृत शेतकऱ्यांना मदतीच्या दृष्टीने 2024-25 या हंगामासाठी प्रती हेक्टर 20 हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 31 लाख 36 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना 3,389 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यात एक लाख सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या 45 लाख कृषी पंप धारकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने मागील हंगामात 11.21 लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली असून, ही देशातील सर्वाधिक खरेदी असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपये इतके निवृत्तीवेतन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी ‘नमो दिव्यांग अभियान’ राबविण्यात आले असल्याचेही राज्यपाल म्हणाले.
राज्यपाल म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा एक अंतर्गत राज्यात 12 लाख 69 हजार 785 म्हणजेच 93.6 टक्के घरे पूर्ण झाली आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात 18 लाख 47 हजार 291 घरे प्रगतीपथावर आहेत. राज्याने नुकतेच सुधारित वाळू निर्गती धोरण जाहीर केले आहे.
सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी
राज्य शासनाने मुंबईत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णयही घेतला आहे. महाराष्ट्रातील सागरी किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळावा, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. हरियाणातील पानिपत येथे 'मराठा शौर्य स्मारक' बांधण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. तसेच आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत असलेल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही राज्यपाल म्हणाले.
शिक्षण व क्रीडा विकास
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे .उत्तराखंड येथे झालेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण 201 पदके जिंकली आहेत. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात 31 खेळाडूंची शासकीय सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जात आहे.
मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद वाचला. यावेळी झालेल्या संचलनात राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, निशाण टोळी (महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, बृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक यांनी सहभाग घेतला.
00000
महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनी विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व मानवंदना
अमरावती, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनोत्सवा निमित्त अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. विभागीय आयुक्तांनी यावेळी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, उपायुक्त (साप्रवि) अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त सुशील आग्रेकर, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार मधुकर धुळे, श्याम देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
00000
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)





















