शुक्रवार, २ मे, २०२५

Making India AI Ready माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एआय तंत्रज्ञानामुळे क्रांती; ‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत

Making India AI Ready माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात एआय तंत्रज्ञानामुळे क्रांती; ‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात तज्ज्ञांचे मत मुंबई, दि. २ : ‘एआय’ तंत्रज्ञान हे जगभरात मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. मनोरंजन क्षेत्रात या तंत्रज्ञान वापरामुळे मोठी क्रांती होत असल्याचे मत ‘मेकिंग इंडिया एआय रेडी’ चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. वेव्हज परिषदेत वेव्हज एक्स संवादामध्ये गुगलच्या तंत्रज्ञांचे ‘एआय’ विषयी चर्चासत्र झाले. ‘एआय’ तंत्रज्ञानाने चित्रपट निर्मिती क्षेत्रात मोठे बदल घडून येत असल्याचे सांगून गुगलचे व्यवस्थापक म्हणाले की, या माध्यमातून चांगल्या प्रकारे कल्पना पडद्यावर मांडता येतात. ‘एआय’चा वापर करून एका फोटोपासून कल्पनातीत व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात. ‘एआय’ तंत्रज्ञान, रिल्स आणि चित्रपटनिर्मिती याबाबत या चर्चासत्रात माहिती देण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कल्पना शब्दात मांडून व्हिडिओ तयार करता येतात याचे प्रात्यक्षिकही यावेळी सदर करण्यात आले. देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि व्यक्ती यांनी आता ‘एआय’ आत्मसात करून प्रगती साधण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य'चा वेव्हज विशेषांक प्रकाशित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य'चा वेव्हज विशेषांक प्रकाशित मुंबई, दि. २ : मुंबईत सुरू असलेल्या 'वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट' अर्थात 'वेव्हज् २०२५' या जागतिक परिषदेच्या निमित्ताने ‘लोकराज्य’ आणि ‘महाराष्ट्र अहेड’च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या 'वेव्हज' परिषदेत आयोजित या प्रकाशन सोहळ्यास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन , एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, सिडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, 'लोकराज्य' चे प्रबंध संपादक तथा संचालक (माहिती) हेमराज बागुल, संचालक (माहिती) तथा वेव्हजविषयक प्रसिद्धी मोहिमेचे समन्वयक किशोर गांगुर्डे, संचालक (वृत्त-जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे, उपसंचालक (वृत्त) श्रीमती वर्षा आंधळे आदी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि 'लोकराज्य'चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या या विशेषांकात 'वेव्हज'शी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे महत्त्वपूर्ण लेख आहेत. यासोबतच या अंकात सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, सिंहस्थ कुंभमेळा, अन्नसुरक्षा, जलसाक्षरतेतून जल व्यवस्थापन अशा विविध विषयांचा देखील मागोवा घेण्यात आला आहे.

मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक, असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात

मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक, असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात पॅन इंडियन सिनेमा या विषयावरील चर्चासत्राने दुसऱ्या दिवसाच्या सत्राचा प्रारंभ मुंबई, दि.२: देशात विविध भाषा, जाती, धर्माचे नागरिक राहतात. भाषा कुठलीही असो, चित्रपटात जर मानवी भाव-भावना, सहज सुंदर अभिनय आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. भाषा, प्रेक्षक कोणतेही असले तरी तो भारतीय सिनेमा असतो हे महत्वाचे असल्याचे मत दाक्षिणात्य अभिनेते, अभिनेत्री यांनी व्यक्त केले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये आयोजित 'पॅन इंडियन सिनेमा माइथ ऑर मोमेंटम' या विषयावर चर्चासत्र झाले. चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन, कारथी, अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सहभाग घेतला तर त्यांना नमन रामचंद्रन यांनी बोलते केले. काही वेळा फक्त हिंदी कलाकार घेऊन किंवा सिनेमा डब करून तो पॅन-इंडिया ठरत नाही. कथेला सर्व भारतीय प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवे, असाही सूर चर्चासत्रात उमटला. श्रीमती खुशबू म्हणाल्या, आजच्या काळात प्रेक्षकांना भावणारी कथा वेगळी नसते तर तिची मांडणी वेगळी असते, साऊथ आणि हिंदी सिनेमात जास्त फरक नाही. विविध कलाकार साऊथमधून आले आणि हिंदी सिनेमात स्थिरच नाहीतर नावही कमावले. प्रादेशिक भाषेतील सिनेमाला वेगळे समजू नये, तोही भारतीय सिनेमा आहे. नागार्जुन म्हणाले की, चित्रपटाची भाषा महत्वाची नसते, तर त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि मानवी भावना यांचा स्पर्श असेल तर तो सिनेमा अधिक लोकप्रिय होतो. तो सिनेमा बॉलिवूड असो की टॉलिवूड फरक पडत नाही. विविध प्रादेशिक भाषेतील सिनेमांचे हिंदीमध्ये डबिंग झाले आहे, होत आहेत. कारथी म्हणाले की, प्रामाणिकपणा हा कोणताही सिनेमा असो थोडा रंगवलेला असला तरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच प्रत्येक दिग्दर्शक यशस्वी होतोच असं नाही. पहिला चित्रपट प्रामाणिक असतो, त्यातला अभिनय स्वतःच्या अनुभवांवर आधारित असतो. त्यानंतर कलाकार त्याच भावनेची नक्कल करत राहतो आणि तेव्हा ते खोटं वाटायला लागतं. अनुपम खेर म्हणाले की, आता कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ विविध भाषांमध्ये सहज काम करत आहेत. यामुळे प्रादेशिक भिंती कमी होत आहेत. मी तेलगू, तमिळमध्ये काम केले, मात्र हिंदीवर जास्त प्रेम आहे. दाक्षिणात्य सिनेमामध्ये कोविडनंतर खूप बदल पाहायला मिळतात, मात्र तो कोणत्याही भाषेतील असला तरी तो भारतीय सिनेमा म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. चित्रपट केवळ भारतापुरता मर्यादित न ठेवता जगभर पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

वेव्हज 2025 ने अधोरेखित केले भारताचे बदलणारे प्रसारण नियामक परिदृश्य आणि भविष्यातील आव्हाने

वेव्हज 2025 ने अधोरेखित केले भारताचे बदलणारे प्रसारण नियामक परिदृश्य आणि भविष्यातील आव्हाने मुंबई,दि.२: मुंबईत कालपासून सुरू झालेल्या वेव्हज 2025 (WAVES 2025) या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचा भाग म्हणून आयोजित केलेल्या ब्रेकआउट सत्रांमध्ये माध्यम आणि मनोरंजन (M&E) क्षेत्रातील बदलणारे परिदृश्य आणि नियामक आराखड्याची गरज यांना महत्त्व प्राप्त झाले. 'डिजिटल युगातील प्रसारण नियमन - चौकटी आणि आव्हाने' या ब्रेकआउट सत्रात आंतरराष्ट्रीय आणि भारतीय माध्यम नियामक संस्थांमधील प्रमुख व्यक्तींनी आपले विचार व्यक्त केले. पॅनेल सदस्यांमध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) चे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी; आशिया-पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट (AIBD) च्या संचालक फिलोमेना ज्ञानप्रगासम; आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन (ABU) चे सरचिटणीस अहमद नदीम आणि मेडियासेटच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीचा संचालक कॅरोलिना लोरेन्झो यांचा समावेश होता. लाहोटी यांनी भारतातील नियामक उत्क्रांतीचा आलेख सादर केला, ज्यात 1995 च्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायद्यापासून ते केबल टीव्हीच्या डिजिटायझेशनपर्यंत आणि आता ग्राहक निवड व सेवेच्या गुणवत्तेवर ट्राय भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) सध्या देत असलेला भर यांचा समावेश होता. त्यांनी समान संधी सुनिश्चित करण्याच्या (TRAI) प्रयत्नांवर भर दिला आणि जिथे ग्राहकांच्या हिताशी तडजोड केली जात नाही, तिथे नियम शिथिल करण्याचा पुरस्कार केला. पॅनेल सदस्यांनी ओव्हर-द-टॉप (OTT) प्लॅटफॉर्म्सच्या झपाट्याने झालेल्या वाढीवर आणि त्यांनी निर्माण केलेल्या गुंतागुंतीवर चर्चा केली. 2024 मध्ये भारताची डिजिटल मीडिया बाजारपेठ 9.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचल्यामुळे, संतुलित नियमनाची गरज सर्वोच्च आहे. लाहोटी यांनी डिजिटल रेडिओ, सिंप्लिफाईड नेटवर्क आर्किटेक्चर आणि राष्ट्रीय प्रसारण धोरणासंबंधी या प्राधिकरणाच्या प्रस्तावांना अधोरेखित केले. ज्ञानप्रगासम यांनी नियमनासोबतच माध्यम साक्षरतेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. अहमद नदीम यांनी जबाबदारी सुनिश्चित करताना नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी नियमनाच्या टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीचा पुरस्कार केला. मेडियासेटच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या संचालक कॅरोलिना लोरेन्झो यांनी स्मार्ट टीव्हीसारख्या तंत्रज्ञानातील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये नेटवर्क इफेक्ट्सच्या उदयास येत असलेल्या आव्हानांवर प्रकाश टाकत, प्लॅटफॉर्मच्या जबाबदारीबाबत युरोपमधील अनुभवाकडे लक्ष वेधले. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे आणि नियामक गुंतागुंत कमी करणे यासोबतच सुसंगत नियमनाची गरज यावरील सहमतीने या सत्राचा समारोप झाला.

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमध्ये (WAVES 2025) मुकेश अंबानी यांनी मांडली भारताच्या नेतृत्वातील जागतिक मनोरंजन विश्वाच्या क्रांतीची कल्पना

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमध्ये (WAVES 2025) मुकेश अंबानी यांनी मांडली भारताच्या नेतृत्वातील जागतिक मनोरंजन विश्वाच्या क्रांतीची कल्पना मुंबई,: दि.२ : भारत केवळ एक देश नाही ती कथांची एक अशी समाजव्यवस्था आहे, जिथे कथात्मक मांडणी ही एक जीवनशैलीच आहे," असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी नुकतेच जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील भाषणात केले. कथात्मक मांडणी ही भारतीय जीवनशैलीशी घट्टपणे विणलेली वीण असून, इथल्या महाकाव्यांपासून पौराणिक कथांपर्यंत, कथात्मक मांडणी हा भारताचा वारसा राहिला. आशय हा महत्वपूर्ण असून, चांगल्या कथांना कायमच बाजारपेठेत मोल मिळते. हे कालातीत तत्त्व असून, हेच जागतिक मनोरंजनाचा आधार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी अंबानी यांनी भारत हा जगाच्या मनोरंजन उद्योग क्षेत्राचे मुख्य केंद्र बनणार असल्याची कल्पना उपस्थितांसमोर मांडली. आपल्या संबोधनातून त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनाची प्रेरणा देणार्‍या दृष्टिकोनाबाबत प्रशंसा केली तसेच वेव्हज शिखर परिषद ही याच भविष्याच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे गौरवोद्गारही काढले. आपल्या भाषणातून अंबानी यांनी जागतिक संस्कृती आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात भारताचा वाढत्या प्रभावावावरही शिक्कामोर्तब केले. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र ही भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ अर्थात राजकीय क्षेत्रापलीकडची सांस्कृतिक ताकद असल्याचे लोक म्हणतात, मात्र ही भारताची खरी ताकद असल्याचे आपण मानतो असे त्यांनी सांगितले. श्री.अंबानी म्हणाले की, आकर्षक आशय मांडणी, गतिमान लोकसंख्याशास्त्र आणि तंत्रज्ञानात्मक नेतृत्व या तीन स्तंभांनी बळकट असलेल्या मनोरंजन क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी देश सज्ज आहे. भारताची डिजिटल क्रांती ही केवळ व्यापकतेची कथा नाही तर ती आकांक्षा, महत्त्वाकांक्षा आणि परिवर्तनाची कहाणी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पारंपारिक माध्यमे व डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे माध्यम विश्वास क्रांतिकारी बदल - गॅझप्रोम मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी

पारंपारिक माध्यमे व डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे माध्यम विश्वास क्रांतिकारी बदल - गॅझप्रोम मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई, दि.२ : पारंपरिक प्रसारमाध्यमे आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स यांच्या एकत्रीकरणामुळे माध्यम जगतात क्रांतिकारक बदल घडून येत असून यामुळे सशक्त ‘माध्यम इकोसिस्टम’ तयार होत आहे, असे प्रतिपादन गॅझप्रोम मीडिया होल्डिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर झारोव्ह यांनी केले. वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये सुरू असलेल्या भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (WEAVES) शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘माध्यम सामग्रीच्या एकत्रित शक्ती’ या विषयावर आयोजित विशेष सत्रात ते बोलत होते. श्री. झारोव्ह म्हणाले, भारत-रशिया सहनिर्मितीचा ‘द लिट्ल किंग ऑफ माय हार्ट’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, त्याचे चित्रीकरण मुंबई आणि जोधपूर येथील ऐतिहासिक स्थळांवर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात भारतीय कलाकारांनी रशियन कलाकारांसोबत एकत्रित काम केले आहे. यामध्ये भारतीय सिनेमातील भावनात्मक शैली आणि रशियन विनोद यांचा सुरेख संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. भारत आणि रशिया या दोन्ही प्राचीन आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभलेले देश आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीत दोन्ही देशांमधील कलावंत एकमेकांच्या संस्कृती समजून घेऊन काम करत होते,असेही झारोव्ह यांनी यावेळी नमूद केले. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावरील ब्लॉगर आणि कंटेंट क्रिएटर्सनी मोलाची भूमिका बजावली आहे. या माध्यमातून दोन्ही देशांमधील मैत्री आणि सांस्कृतिक संबध अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास श्री.झारोव्ह यांनी यावेळी व्यक्त केला.

गुरुवार, १ मे, २०२५

मुंबईत साकारणार आयआयसीटी -केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

मुंबईत साकारणार आयआयसीटी -केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संस्थेच्या स्थापनेसाठी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. व्हेव्ज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे केंद्रीय रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले. अभिनेते अनुपम खेर यांनी प्रस्तावनेद्वार व्हेव्ज आयोजनाचा उद्देश सांगितला. एम.एम.किरवाणी, श्रेया घोषाल, मांगली यांनी स्वागत गीत सादर केले. तर, व्हेव्ज सल्लागार मंडळाचे सदस्य मोहनलाल, हेमामालिनी, कार्तिक आर्यन, एस.एस.राजामौली, रजनीकांत, अनिल कपूर, भूमी पेडणेकर, रणबीर कपूर, आमिर खान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, अडोबी चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु नारायण आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी गुरुदत्त, श्रीमती पी.भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक, सलील चौधरी यांच्या भारतीय सिनेमा मधील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण पंतप्रधान श्री.मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. 000

भारत सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारत सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. आजच्या डिजिटल युगात, आशय (कंटेंट) कोणत्याही वस्तूपेक्षा वेगाने प्रवास करतो.या सगळ्यात महाराष्ट्र या क्रांतीच्या अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. भारत आता सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. व्हेव्ज परिषद हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर ही एक चळवळ असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून हे महाराष्ट्रात साकार होत असल्याचे ते म्हणाले. आज डिजिटल आशय, संगीत, अ‍ॅनिमेशन, गेम्स याला जागतिक स्तरावर आकार दिला जात आहे. राज्य शासन या परिवर्तनाला पोषक वातावरण तयार करत असून यासाठी सक्षम धोरण राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, सुमारे ५०० एकर क्षेत्रफळ असलेली मुंबईतील चित्रपट नगरी आता पुढील पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टमसाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित केली जात आहे. यातील १२० एकरमध्ये माध्यम व करमणूक शहर उभारण्यात येऊन यात अ‍ॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंगवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जातीनिहाय जनगणनेतून प्रत्येक वर्गाला न्याय मिळणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. १ : केंद्र शासनाने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रत्येक घटकाचे प्रतिनिधित्व माहिती होण्यास मदत मिळणार आहे. यातून आलेल्या संख्यात्मक आकडेवारीतून त्या-त्या घटकांसाठी विकासात्मक योजना राबविण्यास मदत होईल. यातून मागास वर्गासह प्रत्येक वर्गाला न्याय मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. वरुड तहसील कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान घेण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुधाकर कोहळे, उमेश यावलकर, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार आदी उपस्थित होते. श्री. बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांचे जीवन सुखकर करण्यात येत आहे. जिवंत सातबारा ही मोहीम राबवून सातबारावरील मृत्यू झालेल्यांची नावे वगळून केवळ जिवंत व्यक्तींच्या नावांचे सातबारे शेतकऱ्यांना घरपोच वितरित करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पांदण रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात येत आहे. बंधारे बांधणे, नाला खोलीकरणनातून काढण्यात आलेले गौण खनिज या रस्त्यासाठी उपयोगात आणले जात आहे. शेतकऱ्यांना दुपारी 12 तास वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा फायदा प्रत्येक नागरिकांनी घ्यावा. प्रशासनाने ही त्यांना सहकार्य करून त्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्यावी. नागररिकांना शासनाच्या सुविधा मिळण्यास अडचणी येत असल्यास थेट संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान, मतदान कार्ड वाटप, पीएम किसान सन्मान निधीची वाटप, ट्रॅक्टर वाटप आदी योजनांच्या लाभाचे वाटप करण्यात आले. ०००००

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन

अमरावती, दि. १ : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. या कक्षाच्या माध्यमातून आता गंभीर व खर्चिक आजारांवर उपचारासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी, एक खिडकी प्रणालीद्वारे दिला जाणार आहे. यापूर्वी या सेवेसाठी नागरिकांना मंत्रालय गाठावे लागत होते, मात्र दि. १ मे २०२५ पासून ही सुविधा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध झाली असून लवकरच ती ऑनलाईन स्वरूपातही सुरू होणार आहे. दि. २७ मार्च ते ३० एप्रिल दरम्यान एकूण ४७ रुग्णांनी कक्षाशी संपर्क साधला आहे. त्यापैकी १५ जणांवर मेंदू, कॅन्सर, प्लास्टिक व हृदयविकार अशा जटिल आजारांवरील मोठ्या शस्त्रक्रिया करून लाभ देण्यात आला. उर्वरित रुग्णांना मोफत औषधोपचार व मोफत कंजर्वेटिव्ह मॅनेजमेंट करता भरती करणे व इतर वैद्यकीय लाभ मिळवून देण्यात आले आहे. या कक्षा अंतर्गत राबवण्यात येणारी ‘आरोग्यदूत’ संकल्पना गावागावात आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य आहे. यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अधीक्षक डॉ. निलेश खटके, कक्षाचे अध्यक्ष व तज्ज्ञ डॉक्टर डॉ. श्याम गावंडे, समाजसेवा अधीक्षक पवन गुल्हाणे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी फित कापून उद्घाटन केले. त्यांनी कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या मदतीची माहिती घेतली. जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 0000