शुक्रवार, १६ जानेवारी, २०२६

विशेष वृत्त “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रम

विशेष वृत्त “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी नांदेड जिल्ह्यात विविध उपक्रम नांदेड, दि. 15 : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त “हिंद दी चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार-प्रसिद्धीसाठी जिल्ह्यात शालेय स्तरावर विविध स्पर्धाच्या माध्यमांतून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व तसेच ‘हिंद दी चादर’ या विषयावरील डॉक्युमेंट्री, चित्रपट व गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग, बलिदान व धर्मनिष्ठेचा संदेश देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या अनुषंगाने लोहा तालुक्यातील पेनूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली तसेच चित्रफित दाखविण्यात आली. कंधार तालुक्यातील फुलवळ केंद्रांतर्गत असलेल्या जि. प. शाळेत चित्रकला व भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जैतापूर व जि.प. प्राथमिक शाळा रहाटी बु. येथे “हिंद दी चादर” ही माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. जि.प. केंद्र प्राथमिक शाळा चिखली, जि.प. केंद्र प्राथमिक शाळा कौठा व जि.प. कन्या शाळा कौठा (ता. कंधार) येथील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या महान कार्याची माहिती देण्यात आली. जि.प. नवीवाडी, जि.प. प्राथमिक शाळा बळीरामपूर (केंद्र वसरणी), जि.प. प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा तसेच जिल्हा परिषद हायस्कूल भायेगाव येथे हिंद दी चादर गीत व व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकांडी येथे हिंद दी चादर गीत व कथा सादरीकरण टीव्हीच्या माध्यमातून सादर करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद नागापूर व जि.प. प्राथमिक शाळा तुप्पा येथे विद्यार्थ्यांना हिंद दी चादर चित्रपट दाखविण्यात आला. या कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार व प्रसिद्धीसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, आश्रमशाळा व महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक व जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. जनजागृती मोहीम १५ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जानेवारी २०२६ पर्यंत शाळांमधील परिपाठाच्यावेळी श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या कार्यावर आधारित गीतांचे सादरीकरण करण्याबाबत सूचना निर्गमित,डॉक्युमेंटरी प्रदर्शन, घोषवाक्याचा प्रसार : “हिंद दी चादर- श्री गुरु तेग बहादुर” तालुकास्तरीय स्पर्धा (१५ ते १७ जानेवारी २०२६) चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे २० जानेवारी २०२६ रोजी गुरु ग्रंथसाहेबजी भवन, सचखंड पब्लिक स्कूलजवळ हिंगोली गेट, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागाची संधी असून, जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मुख्य कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. हिंद दी चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीद्वारे आजपासून जिल्हाभर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. ००००००

विशेष लेख श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव : भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम

विशेष लेख श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव : भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि संत नामदेव यांच्या भारतीय संत परंपरेतील धर्म, मानवता व बलिदानाचा संगम याविषयी या लेखातून ऊहापोह करण्यात आला आहे. भारतीय आध्यात्मिक आणि संत परंपरा ही विविध काळात, विविध प्रदेशात जन्मलेल्या थोर विभूतींनी समृद्ध झालेली आहे. या परंपरेत शीख धर्माचे नववे गुरू, हिंद दी चादर म्हणून ओळखले जाणारे श्री गुरू तेग बहादूर साहिबजी आणि महाराष्ट्रातील म्हणजेच हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथील वारकरी संप्रदायातील महान संत नामदेव महाराज यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दोघांचे कार्य, विचार आणि त्याग हे धर्मरक्षण, मानवता, समता आणि नैतिक मूल्यांचे प्रतीक मानले जातात. संत नामदेव महाराज हे १३ व्या-१४ व्या शतकातील महान भक्त संत असून त्यांनी विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून समाजात समता, नामस्मरण आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. जात-पात, उच्च-नीच भेद नाकारून त्यांनी सामान्य जनतेला ईश्वरभक्तीचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांनी रचलेल्या अभंगांमधून मानवता, करुणा आणि सामाजिक ऐक्याचे तत्त्व प्रभावीपणे मांडले गेले. संत नामदेव महाराजांची कीर्ती महाराष्ट्राच्या सीमांपुरती मर्यादित न राहता उत्तर भारतापर्यंत पोहोचली. त्यांचे अनेक अभंग पंजाबी भाषेत आहेत. दुसरीकडे, १७ व्या शतकात शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांनी धर्मस्वातंत्र्य, मानवाधिकार आणि धार्मिक सहिष्णुतेसाठी अद्वितीय बलिदान दिले. तत्कालिन शासकाच्या धार्मिक अत्याचारांविरुद्ध उभे राहत, त्यांनी काश्मिरी पंडितांच्या धर्मरक्षणासाठी प्रसंगी आपले प्राण अर्पण केले. धर्मासाठी शिश कापले गेले, परंतु त्यांनी कधीही अन्यायासमोर शरणागती पत्करली नाही. त्यामुळेच त्यांना हिंद दी चादर ही गौरवपूर्ण उपाधी प्राप्त झाली आहे. संत नामदेव आणि श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या काळात सुमारे तीन शतकांचे अंतर असले, तरी त्यांच्या विचारांमध्ये मूलभूत समानता आढळून येते. दोघांनीही ईश्वर एकत्व, मानवमूल्ये, अन्यायाविरुद्ध संघर्ष आणि धार्मिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. संत नामदेवांनी भक्तीच्या मार्गाने समाजपरिवर्तन घडविले, तर गुरू तेग बहादूर साहिबजी यांनी त्याग आणि बलिदानाच्या मार्गाने धर्मरक्षणाचा आदर्श निर्माण केला. विशेष म्हणजे, संत नामदेव महाराजांचे अभंग शीख धर्माच्या पवित्र ग्रंथ गुरुग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. यावरून संत नामदेव यांच्या विचारांचा शीख धर्मपरंपरेवर झालेला प्रभाव स्पष्ट होतो. हा संबंध भारतीय संत परंपरेतील सांस्कृतिक एकात्मतेचे आणि सर्वसमावेशकतेचे उत्तम उदाहरण आहे. आजच्या काळात श्री गुरू तेग बहादूर आणि संत नामदेव यांच्या विचारांचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. धार्मिक सहिष्णुता, सामाजिक सलोखा, मानवाधिकार आणि नैतिक मूल्यांची जोपासना करण्यासाठी त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळते. श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांचे बलिदान आणि संत नामदेव यांची भक्तीपर परंपरा ही भारतीय समाजाला एकता, सद्भावना आणि राष्ट्रभावनेच्या दिशेने नेणारी दीपस्तंभ ठरते. त्यामुळे आज त्यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतवर्ष विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवून त्यांना अभिवादन करत आहे. - चंद्रकांत कारभारी, उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली 0000000

विशेष लेख शिख धर्माची सेवा,समता आणि शौर्याची परंपरा

विशेष लेख शिख धर्माची सेवा,समता आणि शौर्याची परंपरा शिख धर्म हा केवळ धार्मिक श्रद्धांचा समूह नसून तो एक जीवनमार्ग आहे. सेवा, समता, शौर्य, सत्य आणि मानवतेचा आदर्श जपणारा शिख धर्म १५व्या शतकात पंजाबमध्ये उदयास आला. श्री गुरु नानक देव जी यांनी स्थापन केलेला हा धर्म आज जगभर पसरलेला असून शिख धर्माची संस्कृती आणि परंपरा मानवी मूल्यांचे जिवंत उदाहरण आहेत. गुरु परंपरा आणि गुरु ग्रंथ साहिब शिख धर्मात दहा गुरुंची परंपरा आहे. श्री गुरु नानक देव जी ते श्री गुरु गोबिंद सिंग जी यांच्यापर्यंत दहा गुरुंनी शिख धर्माचा पाया मजबूत केला. दहावे गुरु श्री गुरु गोबिंद सिंग जी यांनी श्री गुरु ग्रंथ साहिब यांना शाश्वत गुरु घोषित केले. आज शिख धर्मात ग्रंथालाच गुरु मानले जाते, ही एक अद्वितीय धार्मिक परंपरा आहे. गुरुद्वारा संस्कृती गुरुद्वारा हे शिख धर्माचे प्रमुख उपासना स्थळ आहे. येथे कोणत्याही जाती, धर्म, लिंग अथवा वर्गभेदाशिवाय प्रत्येकाला प्रवेश आहे. गुरुद्वारात डोके झाकणे, जोडे बाहेर ठेवणे व नम्रतेने वर्तन करणे ही परंपरा आहे. गुरुद्वारा म्हणजे केवळ प्रार्थनास्थळ नव्हे, तर सामाजिक समतेचे प्रतीक आहे. लंगर परंपरा शिख धर्मातील लंगर ही जगातील अद्वितीय सामाजिक परंपरा आहे. गुरुद्वारात सर्वांना एकाच पंक्तीत बसून मोफत भोजन दिले जाते. राजा–रंक, श्रीमंत–गरीब असा कोणताही भेद नसतो. लंगर ही समतेची, बंधुत्वाची आणि सेवाभावाची जिवंत शिकवण आहे. सेवा भाव “सेवा परमोधर्म” हा शिख संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे. शारीरिक सेवा, आर्थिक सेवा व मनाची सेवा—अशा विविध प्रकारे सेवा केली जाते. गुरुद्वारातील स्वच्छता, लंगर सेवा, आपत्तीग्रस्तांसाठी मदतकार्य हे सेवा परंपरेचे उत्तम उदाहरण आहे. पाच ककार खालसा पंथातील शिखांनी पाळावयाची पाच प्रतीके म्हणजे— केस – नैसर्गिक रूपाची स्वीकृती कंघा – स्वच्छतेचे प्रतीक कडा – शिस्त व नैतिकतेची आठवण कच्छा – संयम व चारित्र्य कृपाण – अन्यायाविरुद्ध संरक्षण ही पाच ककार शिखांच्या धार्मिक व सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहेत. खालसा परंपरा १६९९ साली बैसाखीच्या दिवशी श्री गुरु गोबिंद सिंग जी यांनी खालसा पंथाची स्थापना केली. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, निर्भयपणे सत्यासाठी लढणे आणि मानवतेचे रक्षण करणे हे खालसा परंपरेचे मूलतत्त्व आहे. स्त्री–पुरुष समता शिख धर्मात स्त्री–पुरुष समानतेला विशेष महत्त्व आहे. स्त्रियांना धार्मिक, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात समान अधिकार देण्यात आले आहेत. ही समतावादी दृष्टी त्या काळात अत्यंत क्रांतिकारी होती. सण आणि उत्सव बैसाखी, गुरुपर्व, होला मोहल्ला, दीवाळी (बंदी छोड़ दिवस) हे शिख धर्मातील प्रमुख सण आहेत. हे सण केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहेत. शिख पोशाखामध्ये पगडी (दस्तार) हा शिख धर्मातील आत्मसन्मान व स्वाभिमानाचे प्रतीक आहे. साधी जीवनशैली, प्रामाणिक कष्ट आणि सत्यनिष्ठा हे शिख संस्कृतीचे महत्त्वाचे पैलू आहेत. शिख धर्माची संस्कृती आणि परंपरा मानवतेला केंद्रस्थानी ठेवणारी आहे. सेवा, समता, शौर्य आणि सत्य यांच्या आधारावर उभी असलेली ही संस्कृती आजच्या जगाला शांतता, बंधुत्व आणि सामाजिक न्यायाचा संदेश देते. शिख धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय नसून तो एक जागृत जीवनदृष्टी आहे. राहुल शोभाबाई लक्ष्मणराव भालेराव जिल्हा माहिती अधिकारी पालघर  

विशेष लेख. ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सेवेच्या माध्यमातून साक्षीदार होवू या*

विशेष लेख. *सेवेतून भक्तीचा मार्ग* ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सेवेच्या माध्यमातून साक्षीदार होवू या* भारतीय इतिहासात धर्म, मानवता, त्याग आणि बलिदान यांचे अद्वितीय प्रतीक म्हणून श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांचे नाव अजरामर आहे. धर्मस्वातंत्र्य, मानवमूल्ये आणि सत्यासाठी प्राणार्पण करणारे ते “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या महान शहिदीच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात २४ व २५ जानेवारी रोजी एक भव्य, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य समागम असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे ५३ एकर विस्तीर्ण मैदानावर संपन्न होणार असून, देश-विदेशातून जवळपास १० लाखांहून अधिक भाविक या पवित्र समागम कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, सेवा, समानता आणि मानवतेचा महासंगम ठरणार आहे. नऊ समाजांचा ऐतिहासिक सहभाग या ऐतिहासिक शहीदी समागमाचे आयोजन नऊ समाजांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. राज्य शासनाचा अल्पसंख्याक विभाग, “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेगबहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम समिती तसेच सीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव वारकरी समाज या सर्व समाजांनी एकत्र येत एकतेचा आणि समतेचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ही संयुक्त रचना स्वतःतच गुरूंच्या विचारांची जिवंत साक्ष आहे. “सर्व धर्म समान, सर्व मानव समान” हा संदेश या आयोजनातून ठळकपणे अधोरेखित होतो. मुख्य मंडप, अनवाणी चालण्याची परंपरा आणि श्रद्धेचा सन्मान कार्यक्रम स्थळी उभारण्यात येणाऱ्या मुख्य मंडपात दोनही दिवस श्री गुरु ग्रंथसाहिब विराजमान राहणार आहे. गुरूंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणारे सर्व भाविक, मान्यवर, पदाधिकारी व अतिथी कार्यक्रम स्थळी अनवाणी चालणार आहेत. ही परंपरा केवळ धार्मिक शिस्त नसून अहंकार त्याग, नम्रता आणि गुरूचरणी समर्पणाची भावना व्यक्त करणारी आहे. लाखो भाविक अनवाणी चालत गुरूच्या दर्शनासाठी येणार, हे दृश्यच सेवेतून भक्तीचा खरा अर्थ उलगडून दाखवणारे ठरणार आहे. तसेच संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जन्म गाव नरसी नामदेव येथून वारकरी दिंड्या पायी चालत नांदेड येथे समागम स्थळी येणार आहे श्रमदानातून उभी राहणारी सेवा संस्कृती या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा एक अत्यंत प्रेरणादायी प्रसंग म्हणजे नुकतेच पार पडलेले भव्य श्रमदान. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम स्थळी श्रमदान करण्यात आले. मैदानावरील खडे उचलणे, जमिनीची स्वच्छता करणे, चालण्यासाठी सुरक्षित व्यवस्था करणे ही सर्व कामे सेवाभावाने करण्यात आली. प्रशासन, विद्यार्थी,स्वयंसेवक आणि भाविकांनी एकत्र येऊन केलेले हे श्रमदान सेवेतून भक्तीचा प्रत्यक्ष अनुभव देणारे ठरले. गुरूंच्या शिकवणीनुसार सेवा हीच खरी साधना असल्याचा संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचला. लंगर : समानतेचा आणि मानवतेचा महासागर या भव्य शहीदी समागमात भाविकांच्या सोयीसाठी १२ भव्य लंगर उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक लंगरमध्ये एकावेळी सुमारे ३,००० भाविक बसून भोजन करू शकतील, अशी उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. २४ व २५ जानेवारी रोजी हे लंगर सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत अखंड सुरू राहणार आहेत. लंगर म्हणजे केवळ अन्नसेवा नाही, तर समानतेची शिकवण आहे. येथे जात, धर्म, भाषा, देश, श्रीमंती-गरिबी यांचा कोणताही भेद न ठेवता सर्वजण एकाच पंक्तीत बसून गुरूचा प्रसाद स्वीकारणार आहेत. हा दृश्य अनुभव गुरू नानक देवजींच्या “सर्व मानव समान आहेत” या विचाराचा साक्षात्कार घडवणारा असेल. विनामूल्य सेवा स्टॉल कार्यक्रम स्थळाच्या चारही बाजूंनी दोन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात चहा, पाणी, नाश्ता, फळे यांचे विनामूल्य सेवा स्टॉल उभारण्यात येणार आहेत. ही व्यवस्था लाखो भाविकांच्या सोयीसाठी असून, निःस्वार्थ सेवेचा सर्वोच्च आदर्श समाजासमोर ठेवणारी आहे. सेवा करताना कोणताही मोबदला, मान-सन्मान किंवा प्रसिद्धी अपेक्षित नसून, केवळ गुरूंच्या नावाने सेवा करण्याचा आनंद स्वयंसेवक अनुभवणार आहेत. जुताघर : नम्रतेचा आणि अहंकारत्यागाचा संस्कार कार्यक्रम स्थळी ८ प्रवेशद्वारांवर ८ जुताघरे उभारण्यात येणार असून, गरजेनुसार त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. लाखो भाविकांच्या पादत्राणांची काळजी घेणे ही एक मोठी जबाबदारी असून, ती सेवा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली जाणार आहे. जुताघर सेवा म्हणजे अहंकाराचा त्याग आणि नम्रतेची साधना. गुरूच्या दरबारात प्रवेश करताना पादत्राणे बाहेर ठेवणे म्हणजे बाह्य वैभव आणि गर्व दारातच ठेवणे होय. ही सेवा माणसाला अंतर्मुख करते आणि समानतेचा खरा अर्थ शिकवते. गतका, परंपरा आणि शौर्याचे दर्शन या शहीदी समागमात शीख धर्मीयांचा पारंपरिक युद्धकला प्रकार ‘गतका’ सादर करण्यात येणार आहे. यामध्ये पारंपरिक शस्त्रांचे प्रदर्शन, शौर्य, शिस्त आणि युद्धकलेचे प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे. तसेच नऊ समाजांच्या वतीने पारंपरिक कीर्तन, कथा आणि धार्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यातून गुरूंच्या जीवनकार्याचा आणि बलिदानाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. या सामगमासाठी दिल्ली अमृतसर, चंदीगड, मुंबई, हैद्राबाद येथून मोफत रेल्वे सेवा राहणार असून तसेच विशेष विमानसेवा दोन्ही दिवस असणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी दहा हजार भाविकांच्या निवासासाठी सर्व सुविधायुक्त आदर्श टेन्ट सिटी उभी करण्यात येणार आहेत हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी : श्रद्धेचा अभिषेक या ऐतिहासिक कार्यक्रमात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. गुरूंच्या प्रतिकृतीवर आणि भाविकांवर होणारी ही पुष्पवृष्टी म्हणजे श्रद्धेचा, सन्मानाचा आणि कृतज्ञतेचा अभिषेक असेल. सेवेतून इतिहासाचे साक्षीदार होवू या नांदेड येथे होणारा हा ३५० वा शहीदी समागम म्हणजे केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, सेवा, समानता, बलिदान आणि मानवतेचा महासोहळा आहे. “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांचा संदेश आजही तितकाच जिवंत असून, तो या भव्य आयोजनातून संपूर्ण जगाला पुन्हा एकदा दिशा देणार आहे.तसेच या कार्यक्रमासाठी विविध राज्यांचे मुख्यमंत्री, बागेश्वरचे आचार्य , महंत आदी उपस्थित राहणार आहे चला तर मग, या गौरवशाली ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार बनूया, सेवेत सहभागी होऊया आणि गुरूंच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी सज्ज होऊया. अलका पाटील उपसंपादक जिमाका,नांदेड ०००००

हिंद दी चादर: श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग आणि बलिदानाची अमर गाथा

हिंद दी चादर: श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग आणि बलिदानाची अमर गाथा मानवतेच्या इतिहासात काही अशी व्यक्तिमत्वे होऊन गेली, ज्यांनी केवळ स्वतःच्या धर्मासाठी नव्हे, तर दुसऱ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि मानवाधिकारांसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी हे त्यापैकीच एक महान युगपुरुष आहेत. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या अतुलनीय बलिदानाचे स्मरण करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. "हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर व नवी मुंबई येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग आणि "हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहिदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती", शीख- सिकलीकर, बंजारा लबाना, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. श्री गुरु तेग बहादुर हे शिख धर्माचे ९ वे गुरू होते, त्यांना हिंद दी चादर म्हणून ओळखले जाते. श्री गुरु तेग बहादुर यांनी शिख धर्मात प्रार्थना, परोपकार, सेवा, साधेपणा, इतरांच्या सेवेला महत्‍त्व आणि निर्भीडपणा यांचा प्रचार केला, त्यांचे प्रवचन व भजन यांचा "गुरु ग्रंथ साहिब" यामध्ये देखील समावेश आहे. श्री गुरु तेग बहादुर यांनी १७ व्या शतकामध्ये तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरूद्ध आवाज उठवून धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी बलिदान देऊन भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात तसेच शिख धर्मात शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक मजबूत झाली. मुघल सम्राटांच्या विरोधात जाऊन भाई लकीशा बंजारा यांनी नववे गुरु तेग बहादूर यांच्या पवित्र शरीरास आपला तांडा व घर जाळून अग्नी दिला. या बाबीस भारतीय इतिहासात अनन्य साधारण महत्‍त्व आहे. 'हिंद दी चादर' उपाधीचा अर्थ गुरु तेग बहादूर यांना 'हिंद दी चादर' (भारताची ढाल) असे आदराने संबोधले जाते. जेव्हा मुघल शासकाच्या अत्याचाराने सीमा ओलांडली होती आणि बळजबरीने धर्मांतर सुरू होते, तेव्हा त्यांनी निधड्या छातीने उभे राहून भारतीय संस्कृतीचे रक्षण केले. अतुलनीय बलिदान आणि धैर्य गुरुंना आणि त्यांच्या अनुयायांना दिल्लीत कैद करण्यात आले. त्यांना धर्मांतरासाठी प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला. मनोधैर्य खचवण्यासाठी त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या तीन प्रिय शिष्यांना क्रूरपणे शहीद करण्यात आले. तरीही, गुरु तेग बहादुरजी आपल्या तत्त्वांवर ठाम राहिले. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी दिल्लीतील चांदणी चौकात (आजचे शीशगंज साहिब) त्यांनी शीश दिले, पण आपला धर्म आणि तत्व (सार) सोडले नाही. गुरु तेग बहादुर शिकवण : निर्भयता गुरु तेग बहादूर यांची शिकवण आजही तितकीच प्रासंगिक आहे. त्यांनी संदेश दिला: "भै काहू को देत नहि, नहि भै मानत आन" (अर्थात: ना कोणाला भीती दाखवा, ना कोणापासून घाबरा.) त्यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नव्हते, तर ते धार्मिक स्वातंत्र्य, मानवाधिकार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रतीक होते. ३५० व्या शहिदी दिनाचे महत्त्व आज जेंव्हा आपण त्यांचा ३५० वा शहिदी दिवस साजरा करत आहोत, तेव्हा आपण केवळ एका ऐतिहासिक घटनेची आठवण काढत नाही आहोत, तर त्या विचारांना नमन करत आहोत, ज्यांनी भारताचा आत्मा जिवंत ठेवला. आजच्या समाजात जेव्हा द्वेष आणि असहिष्णुता डोकं वर काढते, तेव्हा गुरु तेग बहादुर साहिबजींचा त्याग आपल्याला आठवण करून देतो की, "दुसऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे, हाच खरा धर्म आहे." प्रशांत सातपुते जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी 00000

बुधवार, १४ जानेवारी, २०२६

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडमधील भव्य कार्यक्रम यशस्वी करावा - मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडमधील भव्य कार्यक्रम यशस्वी करावा - मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी दि. १३ जानेवारी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे सर्वांगीण व काटेकोर नियोजन करण्यात यावे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असून, त्यांच्या सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा व मूलभूत सोयी-सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिल्या. नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, राज्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे कार्यकारी अधिकारी व शासकीय समन्वयक डॉ. जगदीश सकवान, गुरुद्वारा बोर्डाकडून अधीक्षक हरजितसिंघ कडेवाले, राज्य समितीचे डॉ. जगदीश सकवान, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, शिक्षण, परिवहन, अल्पसंख्याक विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते. श्रीकर परदेशी म्हणाले की, या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून श्री गुरु तेग बहादूर यांना मानणारे लाखो भाविक नांदेडमध्ये येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन समाज-संप्रदाय असे नऊ एकत्र येणार आहेत. श्री गुरु तेग बहादुर यांच्या त्याग, बलिदान व मानवतेसाठी दिलेल्या शहीदीचा इतिहास देश-विदेशात पोहोचवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी 26 विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सुमारे १० लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन चोख सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक नियोजन, निवास व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आदी मूलभूत सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या. युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांच्या सोयीसाठी https://gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर रस्ते, रेल्वे, बस, वाहतूक व्यवस्था तसेच कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समितीच्या समन्वयाने सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले. सचिव रुचेश जयवंशी म्हणाले की, मराठवाडा विभागातील सर्व जिल्हे, महानगरपालिका, शाळा-महाविद्यालये, पोलीस यंत्रणा व परिवहन विभागाने समन्वयाने काम करत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर कार्यवाही करावी. रामेश्वर नाईक म्हणाले की, श्री गुरु तेग बहादुर यांनी राष्ट्र व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान सर्वसामान्य जनतेपर्यंत, विशेषतः गावपातळीवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्तम संस्था आणि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहूल कर्डिले म्हणाले की, मुख्य कार्यक्रम असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर होणार असून मैदानाचे सपाटीकरण व स्वच्छतेच्या कामासह मुख्य पेंडाल उभारणीसाठी आवश्यक सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. विद्युत व पाणीपुरवठ्याची व्यवस्था लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. भाविकांसाठी जिल्हानिहाय पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून निवासासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये व मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्र नियोजन करण्यात आले असून आवश्यक वाहनांची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. नांदेड हे रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे विभागाच्या सहकार्याने अधिकाधिक भाविकांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लंगर, निवास व वाहतूक व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घेतला जात असून आरोग्य सेवांसाठी 72 रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. कार्यक्रमस्थळी विविध आरोग्य स्टॉल उभारण्यात येणार आहोत. स्वच्छतेसाठी सध्या 100 शौचालयांची व्यवस्था उपलब्ध आहे. यासाठी इतर जिल्ह्यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी विविध शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून 15 जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढण्यात येणार आहेत. तसेच होर्डिंग्सद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व सुरक्षा पासेस याबाबतच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. ०००

श्री गुरू तेग बहादूर यांचा 350 वा शहिदी समागम विशेष लेख

350 वा शहिदी समागम विशेष लेख शीख बांधवांची अखंड लंगर सेवा… निस्वार्थ सेवा आणि एकाच देवाची उपासना सामाजिक सेवेत समुदायाचा सहभाग या सुत्रांनी समाज उभारणी करून श्री गुरू नानक देव यांनी शीख धर्माची स्थापना केली. धर्म पुढे नेताना मुगल सम्राट औरंगजेब याचा काळ आला त्यावेळी धर्माची धुरा श्री गुरू तेग बहादूर साहेब यांच्याकडे आलेली होती. कश्मीरी पंडितांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायावर तोडगा काढावा यासाठी बलिदान देण्याची तयारी श्री गुरू तेग बहादूर यांनी दाखवली व त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. त्यामुळे मुगल सैन्याचा त्रास कमी झाला. त्यामुळे श्री गुरू तेग बहादूर यांना हिंद दी चादर म्हंटले जाते. आपला धर्म सर्वसमावेशक अर्थात समाजातील सर्व घटकांना सामावणारा बनविण्याचे मोठे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. त्यांनी इ.स.1621 ला जन्म झालेल्या श्री गुरू तेग बहादूर यांनी 1675 साली सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या बलिदानानंतर त्यांचे पुत्र श्री गुरू गोविंदसिंह हे दक्षिणेत आले आणि नांदेड येथे अखेरपर्यंत निवास केला. कोणतीही व्यक्ती यापुढे गुरूपदी येणार नाही तर श्री गुरू ग्रंथ साहिब हे यापुढे गुरू असे जाहिर केले. त्यानंतर एक ईश्वर अर्थात ओंकार आणि गुरू ग्रंथ साहेब याचीच पूजा शीख धर्मात होते. श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागमाचा मोठा कार्यक्रम या निमित्ताने नांदेड येथे 24 व 25 जानेवारी, 2026 या काळात होणार आहे. च्या आयोजनात महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे. शीख समाजाची उभारणी सामुदायिक आणि निस्वार्थ सेवा कार्यावर आधारित आहे. यामध्ये लंगर सेवा, गुरूद्वारा सेवा, शिक्षण व युवा विकास तसेच आपत्तीच्या काळात मदत यांचा प्रामुख्याने समावेश आहे. लंगर सेवा खऱ्या अर्थाने वेगळ्या प्रकारची सेवा आहे. एकता, समानता योच दर्शन आपण होईल प्रत्येक व्यक्ती स्वयंसेवक होवून जेवण बनविण्यापासून ते सर्वांना मोफत देण्याचे काम होते. अगदी भांडी स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवक होण्यासाठीही सर्व जण पुढाकार घेतात. अमृतसर येथील श्री हरिमंदीर अर्थात सूवर्ण मंदीर येथे 24 तास कोणताही खंड न पडू देता ही लंगर सेवा चालते. या ठिकाणी जगभरातील शीख धर्मिय तसेच इतर धर्माचेही लाखो भाविक, पर्यटक येत असतात. येथे कोणताही जात, धर्म याच्या पलिकडे जाण्यायेणाऱ्या प्रत्येकास ही लंगर सेवा उपलब्ध आहे. गुरूद्वारा हुजूर साहिब अर्थात नांदेड येथे गुरूद्वारा ते सुवर्ण मंदीर अशी थेट रेल्वे सेवा सुरू झालेली आहे. ही रेल्वे नांदेड स्थानकातून निघण्यापूर्वी रेल्वेतील प्रत्येक प्रवाशाला लंगर प्रसाद शीख बांधव पूरवित आहे. या रेल्वेच्या मार्गावर थेट अमृतसर पर्यंत दुपारचे तसेच रात्रीचे जेवण या स्वरूपात लंगर प्रसाद दिला जातो. असे असणारी ही भारतातील एकमेव रेल्वे आहे. श्री गुरू तेग बहादूर यांचा 350 वा शहिदी समारंभ याच नांदेड नगरीत होणार आहे हे इथे विशेष. प्रशांत दैठणकर 9823199460 ०००००

विशेष वृत्त श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्

विशेष वृत्त श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त मैदानावर भव्य श्रमदान दोन हजार विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक श्रमदानात सहभाग नांदेड येथील "हिंद-दी-चादर" कार्यक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन नांदेड, दि. 13 जानेवारी :- श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (मोदी मैदान) येथे भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सिख धर्माच्या मर्यादा व परंपरांचे पालन करून पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या कालावधीत सदर मैदानावर गुरुद्वारा प्रतिकृती (दरबार साहिब) असणार असल्याने भाविकांना चप्पल अथवा बूट न वापरता अनवाणी प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे भाविकांना चालताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत विशेष श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. या श्रमदानात नांदेड जिल्ह्यातील सुमारे १,५०० विद्यार्थी, ॲकॅडमीचे ५०० विद्यार्थी महापालिकेचे कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. श्रमदानाद्वारे मैदानावरील खडे वेचून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, क्षेत्रीय धर्मजागरण समितीचे प्रमुख महेंद्रजी रायचुरा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, तहसीलदार आनंद देवूळगावकर, शिक्षणाधिकारी माधव सलगर, रेडक्रॉसचे हर्षद शहा, मनपा अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पांचगे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात खालसा हायस्कूल, राजर्षी पब्लिक स्कूल, नागार्जुना हायस्कूल, सचखंड पब्लिक स्कूल यांसह पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, विविध एनजीओ, सोल्जर ॲकॅडमी, तोटेवाड फिजिकल ॲकॅडमी, नांदेड फिजिकल व गरुडा फिजिकल ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी या श्रमदानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या श्रमदानातून गुरुप्रती सेवा, समर्पण व प्रेमाची अनुभूती अनुभवास मिळाली. नांदेड येथे सिख धर्मियांचे एक महत्त्वाचे तख्त असल्याने या शहीदी समागम कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कार्यक्रमात विविध धर्म व समुदायांचे भाविक सहभागी होणार आहेत. तरी सर्वांनी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले. येणाऱ्या भाविकांना अनवाणी चालताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी असर्जन परिसरातील मोदी मैदान पूर्णतः स्वच्छ करण्यात आले. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सेवाभावातून श्रमदान केले, याबाबत विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. 00000

श्री गुरु तेग बहादुर साहिब : सत्य आणि मानवतेचा अमर संदेश

: श्री गुरु तेग बहादुर साहिब : सत्य आणि मानवतेचा अमर संदेश भारतीय इतिहासात काही अशी महान व्यक्तिमत्त्वे आहेत, ज्यांचे कार्य आणि विचार केवळ एका धर्मापुरते मर्यादित न राहता संपूर्ण मानवजातीसाठी दिशादर्शक ठरले आहेत. अशाच महान संतांपैकी एक म्हणजे शीख धर्मातील नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब. शांत, साधे, संयमी आणि अत्यंत दयाळू स्वभावाचे असलेले गुरु तेग बहादुर साहिब हे सत्य, प्रेम, सहिष्णुता आणि मानवतेचे मूर्तिमंत प्रतीक होते. कोणाच्याही भावना दुखावू नयेत, सर्वांनी परस्पर सन्मान राखून शांततेने आणि सौहार्दाने एकत्र राहावे, हाच त्यांच्या शिकवणीचा गाभा होता. श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचा जन्म १ एप्रिल १६२१जी अमृतसर येथे झाला. ते शीख धर्माचे सहावे गुरु श्री गुरु हरगोबिंद साहिब आणि माता नानकी यांचे सुपुत्र होते. लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, गंभीर आणि विचारशील होता. ध्यान, प्रार्थना आणि सेवा यांमध्ये त्यांना विशेष रस होता. सांसारिक आकर्षणांपेक्षा आध्यात्मिक जीवनाकडे त्यांचा कल अधिक होता. ते फारसे बोलत नसत; मात्र जे बोलत, ते नेहमी मनापासून आणि सत्य असायचे. त्यांच्या या स्वभावामुळे लोक त्यांचा अत्यंत आदर करत आणि त्यांच्या वर्तनातून प्रेरणा घेत. इ.स. १६६४ मध्ये श्री गुरु तेग बहादुर साहिब यांना शीख धर्माच्या गुरु पदाची जबाबदारी मिळाली. गुरु झाल्यानंतर त्यांनी भारतातील विविध भागांत व्यापक प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी सामान्य जनतेशी संवाद साधत जीवनमूल्यांची शिकवण दिली. खरे बोलणे, साधे आणि प्रामाणिक जीवन जगणे, परिश्रम आणि सेवा करणे, तसेच सर्व माणसांशी समानतेने वागणे यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या मते, समाजात कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते; सर्व मानव समान आहेत आणि प्रत्येकाने प्रेम, आदर व करुणेने एकमेकांशी वागले पाहिजे. त्या काळात धार्मिक कारणांवरून मोठ्या प्रमाणावर अन्याय होत होता. अनेकांना त्यांच्या श्रद्धेमुळे छळ सहन करावा लागत होता आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकारही घडत होते. ही परिस्थिती पाहून श्री गुरु तेग बहादुर साहिब अत्यंत व्यथित झाले. त्यांनी ठामपणे मांडले की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणावरही धर्म लादता येत नाही किंवा कोणालाही जबरदस्तीने धर्म बदलायला भाग पाडता येत नाही. धर्मस्वातंत्र्याचा हा विचार त्यांनी निर्भयपणे मांडला आणि तो आजही तितकाच महत्त्वाचा व मार्गदर्शक आहे. सत्य आणि मानवतेच्या रक्षणासाठी श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी इतरांच्या हक्कांसाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांचे बलिदान कोणाविरुद्ध नव्हते, तर संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी होते. त्यामुळेच संपूर्ण देशाने त्यांना प्रेमाने आणि सन्मानाने “हिंद की चादर” ही गौरवशाली उपाधी दिली. त्यांचे बलिदान हे धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि मानवतेच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. गुरु तेग बहादुर साहिब यांच्या महान बलिदानाच्या ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने ‘हिंद दी चादर’ हा महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश गुरु तेग बहादुर साहिब यांचे जीवन, विचार आणि बलिदान केवळ धार्मिक चौकटीत न ठेवता सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रेरणा म्हणून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता, विविधतेतील एकात्मता आणि मानवतेचा सन्मान ही मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीत शीख समाजासह गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ऐतिहासिक कार्याचे साक्षीदार आणि गुरु ग्रंथ साहिबमध्ये उल्लेख असलेले सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव तसेच उदासीन समाज-संप्रदाय सक्रियपणे सहभागी होत आहेत. शासनाच्या या पुढाकारामुळे इतिहासातील हा तेजस्वी अध्याय केवळ स्मरणापुरता न राहता समाजाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. ‘हिंद दी चादर’ उपक्रमांतर्गत राज्यभर विविध स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. गुरु तेग बहादुर साहिब यांच्या स्मृती जपण्यासाठी विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाणे जारी करण्यात आले आहे. तसेच त्या काळातील ऐतिहासिक शस्त्रे, दस्तऐवज आणि सांस्कृतिक वारसा मांडणारी प्रदर्शने आयोजित करण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि विविध समाजघटकांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक कार्यक्रम, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक सादरीकरणे राबवली जात आहेत. या राज्यस्तरीय उपक्रमाची सुरुवात ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे झालेल्या भव्य कार्यक्रमाने झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम सामाजिक एकात्मतेचे प्रभावी प्रतीक ठरला. यानंतर २४ व २५जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे आणि १८ व १९फेब्रुवारी २०२६ रोजी नवी मुंबई येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांचा एकत्रित परिणाम असा होईल की, गुरु तेग बहादुर साहिब यांचा इतिहास पुस्तकांपुरता मर्यादित न राहता सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडला जाईल. महाराष्ट्र शासनाच्या या व्यापक प्रयत्नांमुळे गुरु तेग बहादुर साहिब हे संपूर्ण भारतीय समाजासाठी धर्मस्वातंत्र्य, सहिष्णुता आणि मानवतेचे कालातीत प्रतीक म्हणून नव्या पिढीच्या मनात अढळ स्थान मिळवतील. हीच त्यांच्या महान बलिदानाला खरी आदरांजली ठरेल. संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग 0000000

मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

विशेष लेख धर्म, मानवता व स्वातंत्र्याचे प्रतीक श्री गुरु तेगबहादुर साहिब जी ! शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादुर साहिब जी हे धर्म, मानवी मूल्ये व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महान गुरु होते. शीख इतिहासातच नव्हे तर संपूर्ण भारतीय इतिहासात त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हणून सन्मानाने ओळखले जाते. श्री गुरु तेगबहादुर साहिब जी यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे वैशाख कृष्ण पंचमी या पवित्र तिथीला झाला. बालपणी त्यांना त्यागमल या नावाने ओळखले जात होते. लहानपणापासूनच ते निर्भय, शूर, विचारशील व उदार स्वभावाचे होते. त्यांचे शिक्षण मीरी-पीरीचे स्वामी, गुरु-पिता श्री गुरु हरगोबिंद साहिबजी यांच्या छत्रछायेत झाले. अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी वडिलांसोबत परकीय आक्रमणाविरुद्ध लढा देत पराक्रम गाजवला. त्यांच्या शौर्याने प्रभावीत होऊन गुरु हरगोबिंद साहिबजी यांनी त्यांना ‘तेगबहादुर’ हे नाव दिले, ज्याचा अर्थ ‘तलवारीचा धनी’ असा होतो. या काळात त्यांनी गुरुबाणी, धर्मग्रंथांचे अध्ययन तसेच अस्त्र-शस्त्रविद्या व घोडेस्वारीचे शिक्षण आत्मसात केले. शीख (सिख) धर्माचे आठवे गुरु श्री गुरु हरिकृष्णजी यांची आत्मज्योति विसर्जित झाल्या नंतर श्री गुरु तेगबहादुर साहिब जी यांची नववे गुरु म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आपल्या गुरुपदाच्या कार्यकाळात संस्कृती रक्षक, सामाजिक समता, मानवी मूल्ये व धार्मिक स्वातंत्र्य यासाठी अखंड प्रयत्न केले. 17 व्या शतकामध्ये तत्कालिन शासन कर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरुध्द आवाज उठवून मानवी हक्कांसाठी बलिदान देवून भारताच्या सांस्कृतिक व आध्यामिक अस्मितेचे त्यांनी रक्षण केले. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात तसेच शीख धर्मात शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक दृढ (मजबुत) झाली. त्यांच्या या त्यागामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘हिंद-दी-चादर’ ठरले. गुरु तेगबहादुर साहिब जी यांच्या शिकवणीत क्षमा, करुणा, समता, प्रेम व मानवतेचा संदेश आहे. चुका स्वीकारण्याचे धैर्य असल्यास क्षमा शक्य आहे, हा त्यांचा विचार आजही मार्गदर्शक आहे. त्यांनी 15 रागांमध्ये रचलेले 116 शबद (गुरुबाणी) श्री गुरु ग्रंथसाहिबमध्ये संकलित असून ते आध्यात्मिक प्रेरणेचा अमूल्य ठेवा आहे. श्री गुरु तेगबहादुर साहिब जी यांचे सन 2025 हे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहिती व्हावा तसेच त्यांनी केलेला प्रचार व दिलेले योगदान स्मरण होण्यासाठी नांदेड येथे दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात निशान साहिबांना चोला अर्पण करण्याची सेवा, श्री अखंडपाठ साहिब, कीर्तन, धार्मिक दीवान भरवण्यात येणार आहे. तसेच देशातील नामवंत रागी जत्थ्यांकडून शबद गायन होणार आहे. त्यांच्या अद्वितीय बलिदानाच्या स्मरणार्थ यावर्षी 350 वा शहीदी समागम वर्ष साजरा होत असून त्या निमित्ताने राज्यात तीन ठिकाणी श्री तेगबहादुर साहिब जी 350 वी शहीदी समागम शताब्दी कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. यापुर्वी नागपूर येथे हा कार्यक्रम 7 डिसेंबर 2025 रोजी साजरा करण्यात आला. आता दिनांक 24 व 25 जानेवारी रोजी नांदेड येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभाग, हिंद-दी-चादर श्री गुरु तेगबहादुर साहिब जी 350 वी शहीदी समागम समिती तसेच शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी वाल्मिकी, उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव वारकरी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे मामा चौक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदानावर या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. नांदेडच्या या कार्यक्रमानंतर नवी मुंबई येथे 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी हिंद-दी-चादर या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य आयोजन करण्यात येणार आहे. या पवित्र प्रसंगी सिख धर्मीय बांधवांसह सर्व धर्मीय भाविक गुरु घरात उपस्थित राहून मत्था टेकणार असून श्रद्धा, भक्ती व ऐक्याचे दर्शन घडणार आहे. धर्म, मानवता व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या या महान गुरूंच्या स्मरणार्थ नांदेड येथे होणारा हा शहीदी समागम समाजाला सत्य, त्याग व साहसाचा संदेश देणारा ठरणार आहे. अलका पाटील उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड 00000