मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४
बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी १४ आगस्टपर्यंत मुदतवाढ
बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी
अर्ज करण्यासाठी १४ आगस्टपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. ६ : सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा” चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे.
कृषी यांत्रिकीकरण या टायटल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
अर्ज करणेबाबतची कार्यवाही
अर्ज करणे साठी वेबसाईट
“https://mahadbt.maharashtra.gov.in”
लाभार्थी (शेतकरी ) “युजर आयडी व पासवर्ड” टाकणे
“अर्ज करा” या बाबीवर क्लिक करणे
“कृषी यांत्रिकीकरण” बाबीवर क्लिक करणे
“मुख्य घटक” बाबीवर क्लिक करणे
“तपशील” बाबीवर क्लिक करून -
“मनुष्यचलित औजारे घटक निवड”
“यंत्र / औजारे व उपकरणे - पिक संरक्षण औजारे”
“बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन)” बाब निवडणे
जतन करणे.
०००००
--
डी. एल. एड् परीक्षेचा निकाल जाहीर
डी. एल. एड् परीक्षेचा निकाल जाहीर
www.mscepune.in या संकेतस्थावर निकाल उपलब्ध
अमरावती, दि. 6 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद, पुणेच्यावतीने डी.एल.एड् परीक्षा जून 2024 चे आयोजन 6 जून ते 14 जून 2024 या कालावधीत करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल 6 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता परिषदेच्या www.mscepune.in व www.deledexam.in या संकेतस्थळाावर जाहीर करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळेल व उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी अर्ज करण्याचा अंतिम दि. 21 ऑगस्ट 2024 असा राहील, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी आहे.
०००००
सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - पालकमंत्री चंद्रकांत (दादा ) पाटील
अमरावती, दि. 04 (जिमाका): जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये 79 कोटींची (20 टक्के) वाढ करुन सर्वसाधारण योजनेत 474 कोटी निधी, अनुसूचित जाती उपयोजना 102 कोटी व आदिवासी उपयोजनासाठी 103 कोटी 59 लाख असे एकूण 679 कोटी 59 लाख निधी मंजूर आहे. तरी सर्व शासकीय यंत्रणांनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत निविदा प्रक्रिया राबवून विकास कामांचे कार्यारंभ आदेश दिले गेले पाहिजेत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे दिले.
जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार बळवंत वानखडे, दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, आमदार सुलभा खोडके, आमदार रवी राणा, आमदार यशोमती ठाकूर, आमदार प्रताप अडसड, आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, महापालिका आयुक्त सचिन कलंत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, सहायक जिल्हाधिकारी पि. मिनू, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के तसेच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनांचे नियोजन करताना शाश्वत विकासाचे ध्येय, जिल्ह्याचे व्हिजन, पायाभूत सुविधांमध्ये भर देण्यावर प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच विहित कालावधीमध्ये गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे पूर्ण करण्यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी समन्वयाने कामे करावी. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नियोजन समिती सदस्यांनी मंजूर निधी अंतर्गत विविध विकासात्मक कामाचे प्रस्ताव दिनांक 10 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रशासकीय यंत्रणांकडे सादर करावेत. महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता आगामी काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी मंजूर केलेल्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत त्या कामांचे कार्यारंभ आदेश .देण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 अंतर्गत कृषी व संलग्न सेवा क्षेत्र 46.96 कोटी, ग्राम विकास 31.37 कोटी, नागरी क्षेत्राचा विकास 88.84 कोटी, पाटबंधारे व पूर नियंत्रण 17.32 कोटी, ऊर्जा विकास 35 कोटी, रस्ते विकास 38 कोटी, सामान्य शिक्षण 21.30 कोटी, आरोग्य क्षेत्र 58 कोटी, तीर्थक्षेत्र पर्यटन व गड किल्ले 27.18 कोटी, महिला व बाल विकास 14.19 कोटी, व्यायामशाळा व क्रीडांगण विकास 7.68 कोटी अशा महत्त्वाच्या क्षेत्रासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली असल्याची माहिती पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिली. तसेच केंद्र सरकारच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमास अमरावती जिल्ह्यातील चिखलदारा व धारणी हे दोन आकांक्षित तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी दहा कोटीचा निधी ठेवण्यात आलेला आहे. तसेच ज्या यंत्रणांनी अद्याप सन 2023-24 मधील मंजूर कामासाठी आवश्यक दायित्वाच्या निधीची मागणी केली नाही ती मागणी लवकरात लवकर करावी. तसेच प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही केलेली नाहीत, त्यांनी ती तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी निर्देशित केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण', 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' व 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' संदर्भातील सादरीकरण केले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतंर्गत जिल्ह्यात 4 लाखापेक्षा जास्त महिलांची नोंदणी झाली असून त्यापैकी 1 लाख 35 हजारापेक्षा जास्त प्रकरणांची पडताळणी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पडताळणी झालेल्या 10 लाडक्या बहिणींना पालकमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेल्या 30 प्रशिक्षणार्थींना पालकमंत्र्याच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यानंतर श्री. कटियार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील विविध विषयाची माहिती सादर केली. जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चा माहे मार्च 2024 अखेर सर्वसाधारण योजना 395 कोटी अनुसूचित जाती उपायोजना 102 कोटी आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 103.59 कोटी असा एकूण मंजूर निधीच्या 600.59 कोटीच्या अंतर्गत 600.56 कोटी खर्च झाल्याची माहिती देऊन खर्चाची टक्केवारी 99.99% इतके असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजनातील कामे करताना सर्व यंत्रणांनी प्रस्ताव सादर करताना कामांची निकड , लोकप्रतिनीधींनी दिलेल्या शिफारशी, सूचना तसेच सामान्य जनतेच्या मागण्यांना महत्त्व देऊन कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन प्रस्ताव सादर करावे. आगामी काळातील आचारसंहिता विचारात घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करुन निधी खर्ची पडेल, असे नियोजन करण्याच्या यंत्रणांना सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना मुलभूत सुविधा, पावसाळात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगासाठी स्वतंत्र वार्ड, औषधे व मनुष्यबळासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिल्या जाईल. यासाठी आवश्यक बाबीचा प्रस्ताव तातडीने सादर करुन निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबंधितांना यावेळी देण्यात आले.
अतिवृष्टीमुळे नाल्यांना पूरस्थिती निर्माण होऊन नाल्याकाठी असलेल्या घरांना नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे नाल्याना संरक्षण भिंत उभारणे आवश्यक असून यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव तयार करावा. तसेच अतिवृष्टीच्या काळात ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने विशेष दक्षता बाळगावी. जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी आवश्यक जागा निश्चित करुन धर्मशाळेची निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्री. पाटील यांनी संबंधितांना दिले.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के यांनी सर्व लोकप्रतिनिधी व सर्व समिती सदस्यांचे स्वागत केले. नियोजन समितीच्या बैठकीतील विविध विषयांची माहिती त्यांनी सादर केली.
000000
नैसर्गिक खते व औषधी तयार करण्याविषयीचे प्रशिक्षण शिबिर संपन्न
नैसर्गिक खते व औषधी तयार करण्याविषयीचे प्रशिक्षण शिबिर संपन्न
· शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती
अमरावती, दि. 5 : शेतकऱ्यांचा शेती मशागतीवरील खर्च कमी व्हावा यादृष्टीने शेत बांधावर प्रयोगशाळा स्थापन करुन अल्प खर्चात शेतातच नैसर्गिक खते व औषधे तयार करावीत तसेच ग्रामीण भागातच रोजगार निर्मितीचे तंत्रज्ञान विकसीत करण्याच्या दृष्टीने कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांच्या संकल्पनेतून व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिलेच प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर रविवारी (4 ऑगस्ट रोजी) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी प्रशिक्षण केंद्र, शिवाजी कृषि महाविद्यालय येथे संपन्न झाले. जिल्ह्यातील सुमारे तीनशे शेतकरी बांधवांनी या शिबिराला उपस्थिती लावून तज्ज्ञांकडून संबंधित विषयाची माहिती घेतली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अमरावतीचे विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे, नागपूरचे विभागीय विभागीय कृषि सहसंचालक शंकर तोटावर होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोल्याचे डॉ. सतीश निचळ, डॉ. मंगेश दांडगे, डॉ. राजीव घावडे, डॉ. संतोष चव्हाण, विकास सावरकर आदींनी शिबिरात उपस्थित शेतकरी बांधवांना शेतातच नैसर्गिक खते व औषधे तयार करण्याविषयी प्रक्रिया, साधन सामुग्री व फायदे याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्न व शंकांचे निरसनही तज्ज्ञ मार्गदर्शनकांकडून करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन पुरवठा व मूल्य साखळी तज्ज्ञ निलेश राठोड यांनी केले. कार्यक्रमास कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र गायकवाड, स्वीय सहायक अतुल बुटे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठातील संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र प्रमुख प्रा.डॉ.दिलीप काळे, राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी उज्वल आगरकर, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच तीनशे अधिक शेतकऱ्यांची भर पावसात उपस्थिती होती
0000
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे एकदिवसीय जनजागृती कार्यशाळा; विधवा महिलांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे हक्क यावर मान्यवरांचे मार्गदर्शन
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे एकदिवसीय जनजागृती कार्यशाळा;
विधवा महिलांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे हक्क यावर मान्यवरांचे मार्गदर्शन
अमरावती, दि. 28 (जिमाका): महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे एकदिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधवा महिलांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे हक्क अशा विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार मार्गदर्शन करताना म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्येला आळा घालणे आणि झाल्यास उपचार या दोन विषयावर मार्गदर्शन केले. आत्महत्यांमागील कारण समजून घेण्यावर त्यांनी भर दिला.
न्यायमूर्ती के.के. टाटेड यांनी संघर्ष करणाऱ्या वर्गाला सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी भाषा हा कसा अडथळा आहे यावर प्रकाश टाकला आणि स्वयंसेवी संस्थांनी त्यांना या योजनांबद्दल जागरुक करणे आवश्यक असल्याने त्यानी सांगितले. आयोगामध्ये तक्रार कशी करावी, शेतकऱ्यांच्या समस्यांवरही त्यानी भाष्य केले.
सदस्य एम.ए. सईद यांनी स्वयंसेवी संस्थांना विधवांचा संघटनात्मक कामकाजाच्या मुळाशी समावेश करण्याचा सल्ला दिला. अधिकारांसोबत कर्तव्ये येतात यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाची भूमिका स्पष्ट केली, जेव्हा ही कर्तव्ये लोकसेवक पार पाडत नाहीत, तेव्हा आयोग त्यांना त्यासाठी निर्देश देतो. चांगल्या परिणामांसाठी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वयंसेवी संस्थांसोबत हातमिळवणी करून काम करावे, असे ही त्यांनी सांगितले. "लोकांना आपल्याकडे न बोलवता आपण त्यांच्या कडे जाऊ" असे सांगून त्यांनी शेवट केला.
सचिव नितीन पाटील MSHRC यांनी उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे जारी करताना येणाऱ्या अडचणी काय असतात हे सांगितले. अशी कागदपत्रे देण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना कशी माहिती नाही, हे त्यांनी नमूद केले. समाजाच्या भल्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे जाऊन काम केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्यातील एकल महिला आणि स्वयंसेवी संस्था कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कार्यक्रमासाठी आपली नोंदणी केली. MSHRC सदस्य, YRA (युवा ग्रामीण असोसिएशन) सदस्य आणि भागधारक यांच्यात संवादात्मक सत्र झाले. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या गीताने व राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन सोहळा झाला. अनुभव शिक्षा केंद्राच्या विद्यार्थ्यांनी एका शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संघर्षावर डोळे उघडणारे पथनाट्य सादर केले. शेतकऱ्यांच्या विधवांना त्यांच्या पतीच्या मृत्यूसाठी कसे जबाबदार धरले जाते आणि समाजात महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल कशी माहिती नसते याचे चित्रणही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अँकरने डायसवरील सर्व मान्यवरांचा परिचय करून दिला आणि त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालक देवराज पाटील यांनी युवा ग्रामीण असोसिएशन (2002) आणि त्यांच्या 70 लोकांच्या टीमबद्दल थोडक्यात माहिती दिली जे प्रामुख्याने ग्रामीण भागातील एकल महिला आणि शेतकऱ्यांसाठी काम करतात. त्यांचे ब्रीदवाक्य आहे “UNITE. AWARE. ACT”.
शेतकऱ्यांच्या विधवांचा जीवन प्रवास
वर्ध्यातील अरुणा बहादुरे, बांदीपोहरा येथील वैशाली शिंदे आणि कोकिळा राठोड आणि वर्ध्यातील वर्षा हटवाल यांनी त्यांच्या पतीच्या मृत्यूपूर्वी आणि नंतर त्यांचे जीवन कसे होते याचा प्रवास सांगितला. YRA चे मुख कार्यकारी अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रावर भाष्य केले. त्यांनी असेही नमूद केले की "एखाद्या व्यक्तीचा मानवी हक्क ज्यामध्ये दुसऱ्याचा मानवी हक्क डावलण्यात येत आहे तो मानवी हक्क नाही" कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते यांनी उपेक्षित वर्गातील लोकांचे जीवन समजून घेण्याचा एकत्रित प्रयत्न कशाप्रकारे ग्राउंड रिॲलिटी देतो याचा उल्लेख केला. शिक्षण हाच संकटावर उपाय आहे आणि विद्यापीठ त्यांच्या संशोधनातून योगदान देईल यावर त्यांनी प्रकाश टाकला. डॉ. दिलीप काळे, स्टडी सेंटरचे प्रमुख यांनी नानी पालखीवाला यांच्या “आम्ही, लोक: भारत, सर्वात मोठी लोकशाही” चे महत्त्व स्पष्ट केले. "नाम" या संस्थेने 7 लाख रुपयांचे योगदान दिले जे 28 महिलांना वाटण्यात आले. प्रत्येकाला 25 हजार रुपये संस्थेने ग्राम लेखापरीक्षण कसे होत नाही यावर लक्ष केंद्रित करणारे विविध सामाजिक कार्यक्रमही आयोजित केले.
00000
*महसूल पंधरवड्यामध्ये विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा* - विभागीय आयुक्त डॉ निधी पाण्डेय
*महसूल पंधरवड्यामध्ये विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा*
- विभागीय आयुक्त डॉ निधी पाण्डेय
अमरावती दि.२:- यावर्षीपासून महसूल सप्ताह ऐवजी 'महसूल पंधरवडा' साजरा केला जात आहे. या कालावधीत शासनाच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन डॉ निधी पाण्डेय यांनी केले आहे.
राज्यस्तरीय महसूल दिन तसेच महसूल पंधरवडा व पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ चा शुभारंभ कार्यक्रम मंत्रालयातील परिषद सभागृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल आणि पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांची प्रमुख उपस्थिती तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त ,सर्व जिल्हाधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पंधरवड्याबाबत अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वयोश्री, लेक लाडकी, अन्नपूर्णा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसेच शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजनांची चांगली अंमलबजावणी करून शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी असे आवाहन करण्यात आले.
नागरिक व ग्रामीण भागातील जनतेसाठी महसूल व पशुसंवर्धन देखील अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत. महसूल पंधरवड्यामध्ये शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने अग्रेसर राहून सर्व विभागांसह चांगले काम करावे. शासनाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून लोकाभिमूख काम करावे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी लोकांपर्यंत जावे.
विविध उपक्रमांच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी, सैनिकांचे कुटुंबीय, महाविद्यालयीन युवक, वयोवृद्ध नागरिक , महिला समाजातील विविध घटक यांना सामावून घेत महसूल पंधरवड्याचा हा उपक्रम यशस्वी करावा.असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी केले.
०००००
शिवाजी कृषी महाविद्यालयात रविवारी (4 ऑगस्ट) ‘नैसर्गिक खते व औषधे तयार करणे’ याबाबत मार्गदर्शन शिबीर
शिवाजी कृषी महाविद्यालयात रविवारी (4 ऑगस्ट)
‘नैसर्गिक खते व औषधे तयार करणे’ याबाबत मार्गदर्शन शिबीर
अमरावती, दि. 2 : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या लक्षात घेता त्यांचा शेती मशागतीवरील खर्च कमी व्हावा, यादृष्टीने शेत बांधावरील प्रयोगशाळा स्थापन करून अल्प खर्चात शेतातच नैसर्गिक खते व औषधे तयार करण्याचे तसेच ग्रामीण भागातच रोजगार निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचा मानस आहे. शेतकऱ्यांपर्यंत ही कल्पना पोहोचविण्यासाठी येत्या रविवारी (दि. 4 ऑगस्ट) दुपारी 1 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी प्रशिक्षण केंद्र. शिवाजी कृषि महाविद्यालय, वेलकम पॉईंटजवळ, मोर्शी रोड, अमरावती येथे 'शेतातच नैसर्गिक खते व औषधे तयार करण्यासाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.
या शिबीरात उपरोक्त विषयातील संशोधकांव्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्या मार्गदर्शन शिबीराचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनव्दारे करण्यात आले आहे.
0000
--
पालकमंत्र्यांच्या हस्ते रिध्दपूर येथील पोलीस चौकीचे लोकार्पण, रिध्दपूरच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
पालकमंत्र्यांच्या हस्ते रिध्दपूर येथील पोलीस चौकीचे लोकार्पण
रिध्दपूरच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार
-पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील
अमरावती, दि. 04 : महानुभाव पंथाची काशी म्हणून रिध्दपूर सर्वदूर प्रसिध्द आहे. तसेच जगातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ या ठिकाणी स्थापित होत आहे. या पार्श्वभूमीवर येथे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस चौकी स्थापित होवून त्याचे लोकार्पण आज होत आहे, ही अतिशय आनंदाची व अभिनंदनाची बाब आहे. रिध्दपूरच्या सर्वांगिण विकासासाठी नागरिकांच्या मागण्यांना प्राधान्य देत सीएसआर फंड व अन्य योजनांतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिध्दपूर येथे उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अमरावती ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, महापालिका आयुक्त सचिन कलंत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह अन्य विभागप्रमुख आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळख असणाऱ्या रिध्दपूर हे मराठी वाड्मयाची सुध्दा काशी आहे. या पावन भूमीत मराठीतील लिळाचरित्र आद्यग्रंथ लिहीला गेला आहे. मराठी भाषेचा उगम याठिकाणी झाला असून जगातील पहिले मराठी भाषेचे विद्यापीठ येथे निर्माण होत आहे. जगभरातील संशोधक व अनुयायी मराठी भाषेच्या संशोधनासाठी याठिकाणी भेट देतील. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस चौकी स्थापन करणे हा शासनाचा मानस होता. त्यानुसार आज याठिकाणी भाड्याच्या ईमारतीत पोलीस चौकी स्थापित होऊन त्याचे लोकार्पण आज होत आहे, त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.
ते पुढे म्हणाले की, यापुढेही रिध्दपूरच्या सर्वांगिण विकासासाठी नागरिकांच्या मागणीनुसार आवश्यक सोयी-सुविधांच्या निर्मितीसाठी शासनाकडून निधी पुरविण्यात येईल. अद्ययावत पोलीस स्टेशन हे लोकांच्या संरक्षण व सुविधेची हमी असते. त्यानुषंगाने पोलीस चौकीच्या निर्मितीमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने येथील नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध झाली आहे. रिध्दपूर येथे आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबाबत मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनास सादर करावा, त्यानुषंगाने निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
रिध्दपूर येथे पोलीस चौकी उभारण्यासंबंधी मागणी व त्यानुषंगाने पोलीस विभागाकडून करण्यात आलेली कार्यवाही याबाबत पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी प्रास्ताविकातून माहिती यावेळी दिली.
0000
रविवार, २८ जुलै, २०२४
राज्य अधिस्वीकृती समितीने घेतले श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन
अमरावती, दि. 28 : राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले.
श्री अंबादेवी संस्थानच्यावतीने समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक (माहिती/प्रशासन) तथा समितीचे सदस्य सचिव हेमराज बागुल तसेच समितीच्या सर्व सदस्यांचा शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.
अंबादेवी संस्थानच्या विश्वस्त श्रीमती दिपा खांडेकर, दैनिक हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे व श्रीमती विद्या देशपांडे यांच्यासह अन्य विश्वस्त यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.
अमरावतीचे माहिती उपसंचालक अनिल आलुरकर व अन्य विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे, राजू पाटोदकर सुनील सोनटक्के, संप्रदा बिडकर आदी अधिकारी, अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाखोडे, सदस्य गोपाल हरणे तसेच गिरीश शेरेकर जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, सहाय्यक संचालक विजय राऊत आणि सहकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
000000
शनिवार, २७ जुलै, २०२४
राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीस प्रारंभ; लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती दि. २७ : पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. प्रशासन आणि नागरिकांमधील पत्रकार हा महत्त्वाचा दुवा असून प्रशासनामधील उणिवा दर्शविणे तसेच नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांच्यामार्फत होत असते. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी पत्रकाराची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या पाचव्या बैठकीच्या कामकाजास येथील दि प्राईम पार्क रिसोर्टच्या सभागृहात आमदार सुलभाताई खोडके, संजय खोडके, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(प्रशासन) तथा समितीचे सदस्य सचिव हेमराज बागुल, अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रवीद्र लाखोडे, सदस्य जयराम आहुजा, उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर तसेच राज्य अधिस्वीकृती समितीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, शासनाच्या विविध लोकहितकारी निर्णय व योजनांची प्रशासनाकडून प्रभावी अंमलबाजवणी करताना प्रसारमाध्यमांसोबत समन्वय ही महत्त्वाची बाब आहे. नि:पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासनातील उणिवा दूर होऊन संबंधितांना न्याय मिळवून दिला जाऊ शकतो. तसेच विकासात्मक कामे पूर्ण होण्यासाठी सहाय्यता होते, असे त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त श्री. रेड्डी यांनी पोलीस प्रशासनातील कारकीर्दीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबतच्या सौहार्दपूर्ण संवादाचे अनुभव कथन केले. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वृत्तपत्रातील माहिती ही अत्यंत उपयुक्त ठरते. घटना व प्रसंगा संबंधीची सत्य माहिती वृत्तपत्रातून मिळत असते. त्यामुळे करिअरच्या दृष्टीकोनातून माध्यमांचे महत्व अधोरेखित होते. पत्रकारांजवळ लेखणीचे शस्त्र असून त्याचा सुयोग्य उपयोग व्हावा. राज्य अधिस्वीकृती समितीने पात्र व योग्य पत्रकारास अधिस्वीकृती पत्रिका देणे व त्याचा सुयोग्य वापर व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय संबोधनात यदूनाथ जोशी म्हणाले, अमरावती ही संत व समाजसुधारकांची भूमी म्हणून सर्वदूर परीचित आहे. तसेच पत्रकारितेचीही दीर्घ परंपरा या जिल्ह्याला लाभलेली आहे. संत गाडगेबाबा, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची साधेपण व समाज प्रबोधनाची शिकवण अमरावतीकरांच्या प्रवृत्तीतून दिसून येते. राज्य अधिस्वीकृती समितीच्या कामकाजाबाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच, अधिस्वीकृती पत्रिका योग्य पत्रकारांना मिळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
हेमराज बागुल यांनी राज्य अधिस्वीकृती समितीच्या कामाकाज संदर्भातील माहिती प्रास्ताविकातून दिली. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी सूत्रसंचालन केले तर उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर यांनी आभार मानले. अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य गोपाल हरणे, सुरेंद्र आकोडे यावेळी उपस्थित होते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अमरावती विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने अधिस्वीकृती समितीच्या पाचव्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या समितीचे राज्याच्या विविध विभागातील सदस्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागाचे संचालक, उपसंचालक या बैठकीसाठी उपस्थित असून २८ जुलैपर्यंत ही बैठक चालणार आहे.
०००००
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

























