शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६

महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम-2015 ; अधिसूचित सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलचा वापर करावा -विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांचे आवाहन

महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियम-2015 अधिसूचित सेवांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ‘आपले सरकार’ पोर्टलचा वापर करावा -विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांचे आवाहन
* ऑनलाईन समस्या निवारण प्रणाली पोर्टलवर उपलब्ध अमरावती दि. ९ : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अन्वये नागरिकांना शासनाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या विविध अधिसूचित सेवा विहित कालावधीत पारदर्शक, सुलभ व वेळेत उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. सदर अधिनियमांतर्गत महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण इत्यादी विभागांमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या असून, त्या सेवा ठराविक कालमर्यादेत देणे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. नागरिकांनी या सेवांचा लाभ घेण्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा ऑनलाईन सेवेसाठी महाराष्ट्र शासनाच्या "आपले सरकार" या अधिकृत पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा नाकारली गेल्यास किंवा विलंब झाल्यास नागरिकांना अपील करण्याची तरतूद या अधिनियमात करण्यात आलेली आहे. तसेच, शासनाच्या विविध कामकाजाबाबत नागरिकांच्या समस्यांचे प्रभावी व विहीत वेळेमध्ये निवारण होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने "आपले सरकार" पोर्टलवर ऑनलाईन समस्या निवारण प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. नागरिक आपल्या समस्या पोर्टलवर नोंदवू शकतात, ज्यावर संबंधित विभागातील सक्षम अधिकाऱ्यांना अधिनियमांतर्गत विहित कालावधीत कार्यवाही करून समस्या निकाली काढणे बंधनकारक आहे. समस्या निवारणात दिरंगाई झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करण्याची सुविधा देखील उपलब्ध असून, यामुळे शासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी व उत्तरदायी होण्यास मदत होत आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा तसेच वाशिम या सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. सिंघल यांनी केले आहे. ०००००

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला मुकलो

पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारे डॉ. माधव गाडगीळ व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ म्हणून सदैव स्मरणात राहतील, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, डॉ. गाडगीळ यांनी पर्यावरण विषयक जाणीव जागृती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले. पश्चिम घाटांमधील जैवविविधतेबाबतच्या संवेदना जिवंत ठेवणं आणि त्या प्रगल्भ करणे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. डॉ गाडगीळ यांच्या योगदानाची दखल घेऊन संयुक्त राष्ट्र संघाने त्यांना 2024 मध्ये यूएनईपीच्या ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित केले होते. सहा दशकांच्या वैज्ञानिक कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली. मात्र त्यांनी स्वत:ला ‘जनतेचा वैज्ञानिक’ च मानलं. पर्यावरण क्षेत्रातील कार्याने महाराष्ट्र सुपुत्र डॉ. गाडगीळ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली. या अर्थाने त्यांची पर्यावरण जतन, संवर्धन क्षेत्राला उणीव भासत राहील. त्यांच्या निधनामुळे एका ऋषीतुल्य मार्गदर्शकाला आपण मुकलो असून गाडगीळ कुटुंबीयांवर दुःखाचा आघात झाला आहे. त्यांच्यासह गाडगीळ यांचे चाहते, त्यांचे संशोधक विद्यार्थी यांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी, अशी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

बुधवार, ७ जानेवारी, २०२६

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडमधील भव्य कार्यक्रम यशस्वी करावा -मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी

नांदेड, दि. 7:- ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे सर्वांगीण व काटेकोर नियोजन करण्यात यावे. देशासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असून, त्यांच्या सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सेवा व मूलभूत सोयी-सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिल्या. नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रूचेश जयवंशी, राज्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे कार्यकारी अधिकारी व शासकीय समन्वयक डॉ. जगदीश सकवान, गुरुद्वारा बोर्डाकडून अधीक्षक हरजितसिंघ कडेवाले, राज्य समितीचे डॉ. जगदीश सकवान, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, शिक्षण, परिवहन, अल्पसंख्याक विभागाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी उपस्थित होते. श्रीकर परदेशी म्हणाले की, या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून श्री गुरु तेग बहादूर यांना मानणारे लाखो भाविक नांदेडमध्ये येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव व उदासीन समाज-संप्रदाय असे नऊ एकत्र येणार आहेत. श्री गुरु तेग बहादुर यांच्या त्याग, बलिदान व मानवतेसाठी दिलेल्या शहीदीचा इतिहास देश-विदेशात पोहोचवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी 26 विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सुमारे 10 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन चोख सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक नियोजन, निवास व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आदी मूलभूत सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या. युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांच्या सोयीसाठी https://gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर रस्ते, रेल्वे, बस, वाहतूक व्यवस्था तसेच कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समितीच्या समन्वयाने सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले. सचिव रुचेश जयवंशी म्हणाले की, मराठवाडा विभागातील सर्व जिल्हे, महानगरपालिका, शाळा-महाविद्यालये, पोलीस यंत्रणा व परिवहन विभागाने समन्वयाने काम करत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर कार्यवाही करावी. रामेश्वर नाईक म्हणाले की, श्री गुरु तेग बहादुर यांनी राष्ट्र व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान सर्वसामान्य जनतेपर्यंत, विशेषतः गावपातळीवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्तम संस्था आणि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहूल कर्डिले म्हणाले की, मुख्य कार्यक्रम असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर होणार असून मैदानाचे सपाटीकरण व स्वच्छतेच्या कामासह मुख्य पेंडाल उभारणीसाठी आवश्यक सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. विद्युत व पाणीपुरवठ्याची व्यवस्था लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. भाविकांसाठी जिल्हानिहाय पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून निवासासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये व मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्र नियोजन करण्यात आले असून आवश्यक वाहनांची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. नांदेड हे रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे विभागाच्या सहकार्याने अधिकाधिक भाविकांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लंगर, निवास व वाहतूक व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घेतला जात असून आरोग्य सेवांसाठी 72 रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. कार्यक्रमस्थळी विविध आरोग्य स्टॉल उभारण्यात येणार आहोत. स्वच्छतेसाठी सध्या 100 शौचालयांची व्यवस्था उपलब्ध आहे. यासाठी इतर जिल्ह्यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी विविध शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून 15 जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढण्यात येणार आहेत. तसेच होर्डिंग्सद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व सुरक्षा पासेस याबाबतच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली.

शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला सवलतीच्या प्रस्तावांना वाढीव मुदत · 31 जानेवारी अंतीम मुदत

अमरावती दि. 7 : शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्याध्ययन सवलतीसाठी अतिरिक्त गुण देण्याची कार्यवाही शासन निर्णयानुसार शिक्षण मंडळामार्फत करण्यात येते. इयत्ता दहावीच्या माहे फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे यासंबंधीचे प्रस्ताव माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे राज्यमंडळाचे सचिव दीपक माळी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. यापूर्वी शासन निर्णयानुसार सदर विषयासंबंधीचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी संबंधित माध्यमिक शाळेकडे 15 डिसेंबरपर्यंत व शाळांनी ते प्रस्ताव विभागीय मंडळाकडे 15 जानेवारीपर्यंत सादर करण्याबाबत सूचीत करण्यात आले होते. तथापि, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांनी पत्रान्वये कळविल्यानुसार, शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2025 चा निकाल जानेवारी 2026 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे. त्यामुळे शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला विषयक प्रस्ताव वेळेत सादर करणे शक्य नसल्याने, या वर्षापुरती विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे. शाळांनी विभागीय मंडळांकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख शासन निर्णयानुसार 15 जानेवारी होती तसेच सुधारित अंतिम तारीख ही आता 31 जानेवारी 2026 राहील. या मुदतवाढीचा लाभ संबंधित पात्र विद्यार्थ्यांना होणार असून, शाळा प्रशासनाने दिलेल्या वाढीव मुदतीत सर्व प्रस्ताव पूर्ण करून विभागीय मंडळाकडे सादर करावेत, असे आवाहन मंडळाव्दारे करण्यात आले आहे.

‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा युवकांशी संवाद भारतीय संस्कृतीचा वारसा जपत युवकांनी भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे -राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई, दि. ७ : भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व मोलाची आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी विचार, कृती आणि नव कल्पनांच्य माध्यमातून पुढे येऊन भारतीय संस्कृतीचा वारसा जपत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. राष्ट्रीय युवा महोत्सव-विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५-२६ राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यातून निवड झालेल्या युवकांशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्ती, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, सहाय्यक संचालक मिलिंद दीक्षित, मुंबई विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुवर्णा बारटक्के व राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेले विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभाग हा राज्यातील युवकांसाठी गौरवाची व प्रेरणादायी बाब असल्याचे गौरवोद्गार काढून दिल्ली येथील संवाद कार्यक्रमासाठी निवड झालेल्या युवकांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शुभेच्छा दिल्या. राज्यपाल आचार्य देवव्रत युवकांशी संवाद साधताना म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला नवे स्वरूप देण्यात आले असून देशातील सर्व राज्यातून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात आली. त्यातून निवड झालेल्या तीन हजार गुणवंत युवकांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे. मेहनत, परिश्रम व गुणवत्तेच्या बळावर या स्पर्धेसाठी निवड झालेल्या युवकांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कौतुक केले. ते म्हणाले, या स्पर्धेसाठी झालेली युवकांची निवड ही विकसित राष्ट्र निर्माणातील त्यांच्या कष्टाच्या भूमिकेची पावती आहे. भारत हा युवकांचा देश आहे. युवक देशाच्या विकासाला अधिक गती देण्याची भूमिका बजावू शकतात, असा विश्वास व्यक्त करून राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, भारताचा विकास फक्त आर्थिक किंवा भौतिक उन्नतीपुरता मर्यादित नसून, संस्कृती, सभ्यता, परंपरा व नैतिक मूल्यांचे जतन हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करतो. संपूर्ण विश्व हे एक कुटुंब मानणारी विचारधारा ही भारताची ओळख असून भारताने संत-महात्म्यांच्या माध्यमातून मानवतेचा संदेश जगभर पोहोचविला असल्याचेही राज्यपाल आचार्य देवव्रत यावेळी म्हणाले. राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, देश सर्व क्षेत्रात प्रगती करीत असून स्टार्टअप्स, आत्मनिर्भर भारत अभियानामुळे भारत जागतिक पातळीवर वेगाने प्रगती करत आहे. भारत आज जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असून, तिसऱ्या क्रमांकाकडे वाटचाल करीत आहे. विकासाचा लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत आहे. युवकांमध्ये देशाला आत्मनिर्भर, समृद्ध आणि शक्तिशाली बनविण्याची क्षमता असल्याचे सांगून राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले युवकांनी अपयश आल्यास खचून न जाता परिश्रम, चिकाटी आणि सकारात्मक विचार करून विकसित राष्ट्र निर्माणात आपले योगदान द्यावे. या संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरही राज्यपालांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी निवड झालेल्या युवकांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. २०२५-२६ या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे दिल्ली येथे ९ जानेवारी २०२६ पासून आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव-विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या अंतर्गत ऑन लाईन स्पर्धा प्रथम टप्पा विकसित भारत क्विज, व्दितीय टप्पा निबंध लेखन स्पर्धा, तृतीय टप्पा –विकसीत भारत पीपीटी चॅलेंज अशी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतून राज्यामधून ४५ युवांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय युवा महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक विभागातून २८ कलाकारांची आणि डिझाईन फॉर भारत आणि हॅक फॉर सोशल कॉज या स्पर्धेतून ५ स्पर्धकांची निवड करण्यात आली आली आहे. राज्यातून निवड झालेल्या युवक व त्यांच्यासोबत असलेल्या अधिकारी वर्गासह ८५ जणांचा चमू दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी आज मुंबई येथून रवाना झाला.

मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

विभागीय माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन विभागीय माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा

अमरावती, दि. 6 : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार ‘दर्पणकार’आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विभागीय माहिती कार्यालयात पत्रकार दिन आज साजरा करण्यात आला. यानिमित्त उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी "दर्पण" हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू करत मराठी पत्रकारितेचा पाया रचला. त्याचे स्मरण करण्यासाठी महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस "पत्रकार दिन" किंवा "दर्पण दिन" म्हणून साजरा केला जातो. त्यांनी पत्रकारीतेच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले असून पत्रकारांसाठी त्यांचे कार्य दिपस्तंभाप्रमाणे सदैव मार्गदर्शक ठरेल, असे श्री. आलुरकर यांनी यावेळी सांगीतले. यावेळी सहायक संचालक (माहिती) विजय राऊत, प्रदर्शन सहायक विश्वनाथ धुमाळ, सहाय्यक अधिक्षक विजया लोळगे, वरिष्ठ लिपीक दिनेश धकाते, श्रीमती वैशाली ठाकरे, सुनील काळे, कॅमेरा सहाय्यक मो. शेख हबीब, कुमार हरदुले, छायाचित्रकार मनीष झिमटे, लिपीक जयप्रकाश बानाईत, राहुल साबळे, सिध्दांत गौरखेडे, प्रगती कल्पेकर, अनिल वाडाणे, श्रीमती कांचन अंधारे, दिपाली ढोमणे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

सोमवार, ५ जानेवारी, २०२६

“हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गुरु तेगबहादुर साहिबजींचा गौरवशाली इतिहास पोहचणार

नांदेड, दि. ५ : “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा ‘आरंभता की अरदास’ हा विधी नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर भक्तिमय वातावरणात नुकताच संपन्न झाला. यावेळी मुख्य कार्यक्रमाच्या मंडपाचे भूमीपूजन तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव संप्रदाय व उदासीन संप्रदाय या समाजातील संतांची उपस्थिती लाभली होती. “हिंद-दी-चादर” कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्यासह भाई जोसिंदर सिंगजी, भाई राम सिंगजी, भाई कश्मीर सिंगजी, भाई गुरमीत सिंगजी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे सदस्य बाबुसिंग महाराज (पोहरादेवी), जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, तहसीलदार संजय वारकड, ३५० वा शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, महंत सुनिल महाराज, महंत जितेंद्र महाराज, क्षेत्रीय समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, सरजीत सिंग गिल, क्षेत्रीय समितीचे पदाधिकारी, राज्यस्तरीय समितीचे सदस्य उपस्थित होते. समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहादतीचा गौरवशाली इतिहास समाजासमोर मांडण्यात येणार आहे. अल्पसंख्यांक विकास विभाग आणि नऊ समाजांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात येणार असून गौरवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले. रविवार २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक नियोजन व पूर्वतयारीला गती देण्यात आली आहे. सुरक्षा, वाहतूक व कार्यक्रमस्थळ व्यवस्थापनाबाबत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा, दि. २ : राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यापुढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका निर्मितींचे काम अखंडपणे सुरु राहील. या दर्जेदार सदनिकांमुळे पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सातारा येथील वृंदावन पोलीस टाऊनशिप आणि शाहूपुरी पोलीस ठाणे या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पर्यटनमंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार शशिकांत शिंदे, महेश शिंदे, अतुल भोसले, मनोज घोरपडे, पोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपाधिक्षक अतुल सबनीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. सातारा येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या वृंदावन पोलीस टाऊनशीपमध्ये ६९८ सदनिका असून यामध्ये निवासस्थाने, व्यायामशाळा, वाचनालय, बहुउद्देशिय सभागृह, पॉवर हाऊस अशा अनेक सुविधा आहेत. या प्रक्रल्पाचे अतिशय सुंदर काम केल्याबद्दल पोलीस हाऊसिंग कार्पोरेशनला शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१४ ला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलिसांना उत्तम घरे मिळाली पाहिजेत हा संकल्प केला होता. यासाठी पोलीस हाऊसिंग कार्पोरेशनला प्राधिकृत केले. त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरांची निर्मिती सुरू केली. जुन्या पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या पोलिसांना व त्यांच्या कुटुंबीयांना अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये रहावे लागत होते. पोलीस कुटुंबीयांच्या जीवनात आनंद निर्माण करुन त्यांना राहण्यायोग्य घरे निर्माण व्हावीत यासाठी आपण ही जबाबदारी पोलीस गृह निर्माण आणि कल्याण महामंडळाला दिली. पोलिसांच्या मुलांना व त्यांच्या कुटुंबाला आनंदी वातावरण मिळावे आणि अनेकवेळा तासंतास सेवा बजावणाऱ्या पोलीस बांधवांना घरी गेल्यानंतर सुखाने जगता यावे, यादृष्टीने या सदनिकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून अशाच प्रकारे पोलिसांना उत्तम घर आम्ही देत राहू असा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पाचे उत्तम प्रकारे काम केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्य अभियंता राजाराम पुरीगोसावी, विलास बिरारी यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह प्रकल्पाची पाहणी करुन प्रातिनिधीक स्वरुपात पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिकांच्या चाव्यांचे वितरण केले. यावेळी पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन

मुंबई, दि. १ :- महाराष्ट्र राजभवनाचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आल्यानंतर प्रथमच तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे करण्यात आले. यावेळी राज्यपाल देवव्रत यांनी दिनदर्शिकेच्या माध्यमातून इतिहास पुढे आणल्याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. अनेक नामांकित छायाचित्रकारांनी वेळोवेळी काढलेल्या लोकभवनातील ऐतिहासिक वास्तूंच्या उत्कृष्ट छायाचित्रांचा दिनदर्शिकेमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुंबई लोकभवनाशिवाय दिनदर्शिकेमध्ये नागपूर, पुणे व महाबळेश्वर येथील लोकभवनांच्या वास्तूंची देखील आणि मुंबई येथील लोकभवनामध्ये मुक्त संचार असलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या नव्या छायाचित्रांसोबतच संबंधित वास्तूंच्या जुन्या छायाचित्रांचा देखील दिनदर्शिकेमध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक छायाचित्राला ऐतिहासिक संदर्भ देण्यात आला आहे. दिनदर्शिकेत सुधारक ओलवे, नवीन भानुशाली, सचिन वैद्य, प्रतिक चोरगे, हनीफ तडवी, संदीप यादव, वैभव नाडगावकर, रमण कुलकर्णी, नागोराव रोडेवाड, आकाश मनसुखानी, सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खंडागळे यांच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव राममूर्ती व जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर उपस्थित होते.

गुरुवार, १ जानेवारी, २०२६

राजीव गांधी गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेचे ऑनलाईन प्रस्ताव स्विकारण्यासाठी १२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 31 : ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ सन 2025-26 या स्पर्धेचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यासाठी 12 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे अपर आयुक्त संजय जाधव यांनी एका पत्राव्दारे कळविले आहे. दि. 3 फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार या योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी सर्व स्तरावर प्रस्ताव स्विकारण्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ अशी होती. तथापी विधिमंडळाचे अधिवेशन व राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका यामुळे हे प्रस्ताव सादर करण्याकरीता आता दिनांक १२ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित विभागांनी अधिनस्त सर्व कार्यालयांना आवश्यक त्या सूचना देण्याबाबत विभागीय आयुक्तालयाव्दारे कळविण्यात आले आहे. ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ या स्पर्धेचे प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने सादर करणे.तसेच अभियान व स्पर्धेशी संबंधित सर्व अनुषंगिक बाबींवर कार्यवाही करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदर पोर्टलच्या संकेतस्थळाची लिंक “pragatiabhiyan.maharashtra.gov.in” अशी आहे, असेही विभागीय आयुक्तालयाव्दारे कळविण्यात आले आहे.