प्रभावी जनसंपर्कासाठी तंत्रज्ञान आणि मानवी
संवेदनांचा समन्वय आवश्यक
- निवासी आयुक्त आर. विमला
§ 'माहिती आणि जनसंपर्क 'च्या राष्ट्रीय जनसंपर्क परिषदेस प्रारंभ
दिल्ली, दि. 9 : समाजात माहितीचा प्रसार
वेगाने होत असतांना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जनसंपर्क प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याची गरज
आहे. त्यादृष्टीने जनसंपर्क क्षेत्रात
कार्य करणाऱ्या प्रत्येकाने तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा समन्वय साधून काम
करावे, असे आवाहन महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर.
विमला यांनी केले. माहिती युगातील जनसंपर्काची दिशा निश्चित करण्यासाठी माहिती आणि
जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित राष्ट्रीय जनसंपर्क परिषद उपयुक्त ठरेल,
असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क
महासंचालनालयाच्या नवी दिल्ली येथील
महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे आयोजित 'जनसंपर्क परिषद-2026' च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास महाराष्ट्र
सदनाच्या विशेष निवासी आयुक्त श्वेता सिंघल, कर्नाटकच्या
माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर, महाराष्ट्र
परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल आदी यावेळी उपस्थित होते.
माहिती प्रसार क्षेत्रातील अधिकाऱ्यांना एका
व्यासपीठावर आणण्याचा महाराष्ट्र परिचय केंद्राचा हा प्रयत्न स्तुत्य असून माणसाला
माणसाशी जोडण्याचा हा प्रयत्न असल्याचे नमूद करून निवासी आयुक्त आर. विमला
म्हणाल्या, केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना
जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक प्रभावी प्रयत्न करण्याची आवश्यकता
आहे. माहिती क्षेत्रातील अधिकारी
प्रशासनाचा महत्वाचा कणा असतो, तो समाजातील बदलाचा अग्रदूत
आहे. यादृष्टीने आपली तंत्रज्ञान युगातील भूमिका निश्चित करण्यासाठी या परिषदेत
साधक बाधक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विशेष निवासी आयुक्त श्वेता सिंघल म्हणाल्या, गेल्या काही
वर्षात माध्यम व्यवस्थापन वेगाने बदलले आहे. तंत्रज्ञानाच्या उपयोगमुळे माहितीचा
प्रसार वेगाने होत असतांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग प्रभावी ठरू शकेल. तसेच
समाजमाध्यमाद्वारे माहितीचा प्रसार वेगाने करता येईल. भविष्यातील नव्या
तंत्रज्ञानाला सामोरे जातांना या ज्ञानाचा प्रसार आणि उपयोग महत्वाचा आहे.
त्यादृष्टीने एक संवादशृंखला तयार करण्यासाठी दोन दिवसाची ही कार्यशाळा उपयुक्त
ठरेल आणि एकमेकांशी संवाद साधून माहितीच्या देवाणघेवाणीची मोठी शृंखाला यातून
निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या
क्षेत्रात वेगाने बदल होत असतांना वस्तुनिष्ठ माहितीचे व्यवस्थापन ही आजची
महत्वाची गरज आहे. फेक न्यूज वेळेवर ट्रॅक करून जनतेला त्यातील खोटेपणा त्याचवेळी
सांगणे हे आजचे आव्हान आहे,
असे आयुक्त हेमंत निंबाळकर म्हणाले. जाणीवपूर्वक पसरविण्यात
येणाऱ्या खोट्या बातम्या राज्यासाठी हानिकारक ठरू शकतात. अशा बातम्यांना वेळीच
रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करून माहिती व जनसंपर्क
क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी जनतेतही या संदर्भातील जागरूकता निर्माण करावी. प्रभावी
संवाद द्वारे हे शक्य असून अशा संवादाच्या विविध पैलूंवर परिषदेत विचार व्हावा,
अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकात संचालक हेमराज बागुल म्हणाले, जनसंपर्काच्या
क्षेत्रात वेगाने होणारे बदल आत्मसात करणे आणि त्यासोबत संवाद प्रक्रिया गतिमान
करणे गरजेचे आहे. त्यासाठी नव्या युगातील तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता
क्षेत्रातील नवे बदल जाणून घेणेही महत्वाचे आहे. त्यादृष्टीने या राष्ट्रीय
परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जनसंपर्क
अधिकाऱ्यांच्या परस्पर संवादातून या क्षेत्रातील चांगल्या प्रयोगाची माहिती
परस्परांना होण्यासोबत भविष्यातील वाटचालीसाठी नवा दृष्टीकोन मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत देशातील 25
राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत.
००००
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा