शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’ - विभागीय आयुक्त नयना गुंडे

 

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी

अमरावती विभागात महा-साधना सप्ताह’

                                                                - विभागीय आयुक्त नयना गुंडे


 

·         विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी 'iGOT कर्मयोगी' पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 03 : केंद्र शासनाचा क्षमता विकास आयोग (CBC) आणि 'कर्मयोगी भारत' यांच्या संयुक्त विद्यमाने दि.2 ते 8 एप्रिल, 2026 या कालावधीत देशभरात 'साधना सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने राज्यभर ‘महा-साधना सप्ताह’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे ठरवले आहे. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अंगभूत कर्मक्षमतेचा विकास व्हावा आणि त्यांच्या निरंतर ज्ञानसंवर्धनातून प्रशासकीय कार्यात गुणात्मक वाढ व्हावी, हा या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. यानुषंगाने  विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘महा-साधना सप्ताहात’ सक्रियरित्या सहभाग नोंदवून 'iGOT कर्मयोगी' पोर्टलवर उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम पूर्ण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

 

या सप्ताहाअंतर्गत अमरावती विभागातील सर्व शासकीय, निमशासकीय विभागांच्या अधिनस्त कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'iGOT कर्मयोगी' पोर्टलवर उपलब्ध असलेले विविध अभ्यासक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे. हे अभ्यासक्रम देशातील नामांकित संस्थांकडून तयार करण्यात आले असून ते विनामूल्य उपलब्ध आहेत. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने 'iGOT कर्मयोगी' पोर्टलवर नोंदणी करुन उपरोक्त कालावधीत (दि.2 ते 8 एप्रिल 2026) किमान 4 तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.

 

या प्रशिक्षणांमुळे प्रशासनात तंत्रज्ञान (Technology), परंपरा (Tradition) आणि दृश्यमान परिणाम (Tangible Outcomes) या त्रिसूत्रीचा प्रभावी अवलंब होईल. प्रत्येक शासकीय विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणांचा विभागीय आुयक्तांनाकडून आढावा घेण्यात येणार आहे. विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या व्यावसायिक क्षमतेचा आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी राज्य शासनाव्दारे आयोजित या 'महा-साधना सप्ताहात' उर्त्स्फुतपणे सहभाग घेऊन प्रशिक्षण पूर्ण करावे, असे  आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे यांनी केले आहे.

 

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा